अर्धवट पुलाचा सांगा फायदातरी काय? पुलासाठी एक कोटी चाळीस लाख गेले पाण्यात

रुपेश खंडारे
Tuesday, 13 October 2020

कालांतराने  या पुलाचे बांधकाम पूर्ण न होता सन २०१७ला निधीअभावी कंत्राटदाराने काम बंद केले. ते आजपर्यंत सुरु न होऊ शकल्याने नागरिकांना आजही जीर्ण पुलावरुन ये-जा करावी लागते. जुना पूल हा जीर्ण झाला असून स्वसंरक्षक भिंती ही तुटल्या असून केव्हाही  जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

पारशिवनी (जि.नागपूर) : तालुक्यातील जंगलव्याप्त उमरी- माहुली रस्त्याच्या दम्यानच्या नालावरील नवीन पूल बनविण्याकरीता मोठे प्रयत्न करण्यात आले होते. पूल होणार, जाण्यायेण्याचा प्रश्न सुटणार, या आशेने या पुलाचे बांधकाम होत असताना नागरिकांमध्ये आनंद दिसून येत होता. पण या पुलाचे निधअभावी काम अर्धवट असून मागील तीन वर्षांपासून सद्या पुलाचे काम बंद आहे.

अधिक वाचाः ऐन हंगामात शेतकरी विचारतात, कुठे गेला युरिया?

२०१७ला निधीअभावी कंत्राटदाराने केले काम बंद
उमरी-माहुली हा रस्ता जि.प.बांधकाम विभागाच्या अधिनस्थ असला तरी हा रस्तादुरुस्ती, डांबरीकरण, तसेच नाल्यावरील पूल बांधकामासाठी शासनाच्या आदिवासी उपाययोजनेंर्तगत १ कोटी चाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. १० फेब्रुवारी२०१७ ला तत्कालीन आमदारांच्या हस्ते नवीन पूल बांधकामाचे मोठा गाजावाजा करून उद्घाटन करण्यात आले होते. सा.बा.उप विभाग पारशिवनीच्या देखरेखित पुलाच्या बांधकामाला सुरवात करण्यात आली होती. पण कालांतराने  या पुलाचे बांधकाम पूर्ण न होता सन २०१७ला निधीअभावी कंत्राटदाराने काम बंद केले. ते आजपर्यंत सुरु न होऊ शकल्याने नागरिकांना आजही जीर्ण पुलावरुन ये-जा करावी लागते. जुना पूल हा जीर्ण झाला असून स्वसंरक्षक भिंती ही तुटल्या असून केव्हाही  जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. नवीन पूल तयार करीत असताना जो निधी मंजूर करण्यात आला होता, तो अपुरा पडल्याने कंत्राटदाराने येथील पुलाचे काम बंद केले. तेव्हपासून या पुलाकरिता  एक पैसा या काळात येथील लोकप्रतिनिधी मंजूर करुन आणू शकले नसल्याने आज हा पूल अर्धवट अवस्थेत विणकामाचा असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अधिक वाचाः भिवापूरचे बसस्थानक होणार म्हणजे होणारच, आमदार राजू पारवे यांचा संकल्प

...तरच या पुलाचे बांधकाम होऊ शकते
आदिवासी विभागाकडून या पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर होईल तरच या पुलाचे बांधकाम केले जाऊ शकते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.पण कोट्यवधी रुपये खर्च करुन नागरिकांच्या सुविधेसाठी विकासकाम केले जात असेल, तेही अर्धवट नी विणकामाचे होत असेल तसेच त्याचा फायदा येथील नागरिकांना होत नसेल तर कोट्यवधी रुपये काय पाण्यात वाया घालविण्यासाठी खर्च केले जात आहे का, असा खडा सवाल नागरिक प्रशासनाला करीत आहेत.
 
काम पूर्ण करण्यात कुणालाच रस नाही             
माजी आमदार असो वा आजी आमदार असो, यांनी रखडलेल्या माहुली-उमरी पुलाकरिता निधी उपलब्ध करून द्यायला हवा होता. पूलाचे काम पूर्ण करुन हा पूल नागरिकांना रहदारीकरिता खुला करुन देणे आवश्यक होते. पण कुणीही या पुलाचे अर्धवट काम पूर्ण करण्यात रस दाखविला नसल्याने आजही येथील रहिवाशांना जुन्या पुलावरुन जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. ती धोकादायक आहे.
शुभम राऊत
पारशिवनी

पूल रहदारीकरिता खुला करुन दयावा
हा पूल नागरिकांच्या हिताकरीता  अत्यावश्‍यक आहे. आज अर्धवट बांधकाम  करुन हा पूल मागील तीन वर्षांपासून धुळखात आहे. येथील प्रतिनिधींनी राजकारण बाजूला सारुन नागरिकांना  होणारा त्रास लक्षात घेउन येथील पुलाकरिता निधी उपलब्ध करुन दयावा नि या पुलाचे उरलेले काम पूर्ण करुन नागरिकांना जाण्या-येण्यास हा पूल रहदारीकरिता खुला करुन दयावा.
भूषण  वैरागडे
पारशिवनी

संपादनःविजयकुमार राऊत

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is the benefit of partial bridge? One crore and forty lakhs went into the water for the bridge