नागपूर : सद्रक्षणायचे ब्रीद असलेले पोलिस खातेही भ्रष्ट्राचारात मागे नाही. इथेही बढती मिळण्यासाठी एम व्हिटॅमिनच काम करीत असल्याचे पुढे आले आहे. आपले संपूर्ण आयुष्य पोलिस सेवेत खर्च करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना बढतीची आस असते. आणि त्या आशेवरच प्रत्येकजण जीव ओतून काम करीत असतो, मात्र आपली सेवा ज्येष्ठता आणि आपले काम याचा बढतीशी संबंध नसून वशिला आणि पैसा या गोष्टींवरच बढती अवलंबून असल्याने अनेक पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
राज्य पोलिस दलात मुंबई आयुक्तालय वगळता एकाही पोलिस आयुक्तालयात सेवाजेष्ठता यादी लागत नाही. केवळ राजकीय दबाव आणि "व्हिटामिन एम'च्या प्रभावाखाली कनिष्ठ पोलिस निरीक्षकांना ठाणेदारी मिळत असल्यामुळे राज्यभरातील शेकडो पोलिस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या ज्युनियरच्या हाताखाली काम करावे लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वच्छ प्रतिमा आणि पारदर्शक कारभार असलेल्या मुंबई पोलिस आयुक्तालयात दर वर्षी सेवा जेष्ठता यादी जाहीर केली जाते. त्यामध्ये कोणत्या बॅचचा अधिकारी कुठे नेमणूकीस आहे आणि त्याचा सेवा जेष्ठता यादीनुसार क्रमांक कुठे आहे? याबाबत प्रत्येक पोलिस निरीक्षकांना कळविले जाते. पोलिस आयुक्तालयाच्या मार्फत दरवर्षी यादी जाहीर होत असल्यामुळे पोलिस निरीक्षकांच्या मनात कोणतीही शंका-कुशंका नसते. पारदर्शक यादीनुसारच शहरातील पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर नियुक्ती केल्या जाते. त्यामुळे कुणालाही ज्यूनियर असलेल्या अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करावे लागत नाही. याच बाबींमुळे मुंबई पोलिस आयुक्तालयाला आदर्श आयुक्तालय मानल्या जाते.
याच धर्तीवर राज्यातील सर्वच आयुक्तालयात पोलिस निरीक्षक तसेच तत्सम दर्जाच्या अधिकाऱ्यांची सेवा जेष्ठता यादी प्रकाशित होणे अपेक्षित आहे. त्यानुसारच प्रत्येक ठाण्याचा इंचार्ज म्हणून सेवाजेष्ठतेनुसार सीनियर असलेल्या अधिकाऱ्यांनाच ठाणेदारी देणे अपेक्षित असते. मात्र, मुंबई वगळता राज्यातील अन्य आयुक्तालयात सेवाजेष्ठता यादी लागत नाही. त्यामुळे आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये ठाणेदार पद देताना वशिला किंवा "व्हिटॅमिन एम'चा विचार केल्या जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
ग्रामीणमध्ये जास्त घोळ
आयुक्तालयात आस्थापना मंडळ असते. त्यामुळे ठाणेदारकी देताना किमान सहआयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांचे मत विचारात घेतल्या जाते. मात्र, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांमध्ये "ओनली वन' पोस्ट असल्यामुळे साहेब म्हणतील त्याला ठाणेदारी असा नियम असतो. त्यामुळे अनेक ज्युनियर साहेबांकडे वशिला लावतात तर काही अधीक्षकांवर राजकीय दबाव आणून ठाणेदारकी मिळवतात. ग्रामीणमध्ये अनेक सिनीयर साईड पोस्टींगला तर ज्युनियर अधिकाऱ्याला ठाणेदार बनविण्यात येत असल्याचे कळते.
तपास आणि गुन्हेसिद्धीवर परिणाम
ज्यूनियरच्या हाताखाली काम करणे अनेकांच्या जिव्हारी लागते. त्याचा परिणाम थेट गुन्ह्याचा तपास आणि गुन्हे सिद्धीच्या परिणामावर होते. अनुभवी अधिकारी दुय्यम निरीक्षक म्हणून काम करीत असताना केवळ दिवस काढत असतो. त्यामुळे पोलिस खात्याचे नुकसान होते. ज्युनियर असूनही "सॅल्यूट' करावा लागत असल्यामुळे अनेक अधिकारी थेट आजारी रजेवर जाण्याचा मार्गही स्विकारत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.