काय सुरू आहे वाडीत ? नाल्या झाल्या वर अन् दुकाने खाली !

विजय वानखेडे
Wednesday, 14 October 2020

रस्त्याच्या या बांधकामासोबतच कडेला असलेल्या दोन्ही बाजूच्या नाल्यांचेही बांधकाम सुरू आहे. परंतू नालीचे बांधकाम करत असताना ते जमिनीपासून २ ते ३ फूट वर आल्याने आजूबाजूला असलेली दुकाने नाली पातळीच्या खाली गेली आहेत. या नाल्याची उंची वाढल्यामुळे दुकानात येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. व्यवसाय कसा करावा, घरात कसे जावे, ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

वाडी (जि.नागपूर):वाडी स्थित खडगाव मार्गावरील व्यावसायिक नवनिर्मित नालीच्या उंचीने संकटात सापडले आहेत. या रस्त्याचे बांधकाम मागील ३ महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू असून दुकानासमोर मोठमोठ्या नाल्या खोदल्या असल्याने येथील व्यावसायिकांसमोर भविष्यात रोजगार कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 अधिक वाचाः ‘कृषीभूषण’ सुधाकरराव कुबडे यांचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग; आत्मनिर्भर होण्याचा सल्ला
 

भविष्यात दुकानात पाणी जमा होण्याची दाट शक्यता
रस्त्याच्या या बांधकामासोबतच कडेला असलेल्या दोन्ही बाजूच्या नाल्यांचेही बांधकाम सुरू आहे. परंतू नालीचे बांधकाम करत असताना ते जमिनीपासून २ ते ३ फूट वर आल्याने आजूबाजूला असलेली दुकाने नाली पातळीच्या खाली गेली आहेत. या नाल्याची उंची वाढल्यामुळे दुकानात येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. व्यवसाय कसा करावा, घरात कसे जावे, ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे घरात व दुकानात पाणी साचून या पावसाळ्यातही नुकसान झाले असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. भविष्यात दुकानात पाणी जमा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याने येथील व्यावसायिकांसमोर आपला रोजगार, व्यवसाय वाचविण्याचे संकट निर्माण झाले आहे.

अधिक वाचाः दांडीबहाद्दर पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा दणका; अधिकाऱ्यांशी करायचे सेटिंग

रस्ता बांधकामात अनियमितता
निर्माण होत असलेला रस्ता हा २४ मीटरचा असून सगळीकडे सारखा असावा, असे गृहीतच आहे. परंतू हा रस्ता २४ मीटर ऐवजी कुठे १८ मीटर तर कुठे १५ मीटर झाल्याने रस्त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून येत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. यात संबंधित अधिकाऱ्यांनी आपले हितसंबंध जपले असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.

काही दिवसांतच सत्य उघडकीस येईल !
रस्ता व नाली बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. या नालीच्या उंचीमुळे आमचा व्यवसाय डबघाईस आला. भविष्यात पाणी साचण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत अधिकाऱ्यांना अवगत केले असता त्यांनी हेतुपुरस्सर आतापर्यंत दुर्लक्ष केले. कामात हितसंबंध जपण्याचे काम सुरू आहे. माहिती अधिकारात माहिती मागवली असून येणाऱ्या काही दिवसातच सत्य उघडकीस आणणार आहे.
रत्नाकर लोहकरे
व्यावसायिक

कुटुंब कसे चालवावे?
आधीच कोरोनाच्या संकटाने कुटुंब रस्त्यावर आले आहे. त्यातच आता हे मागील तीन महिन्यांपासून नाली खोदून ठेवल्याने परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय कसा करावा व कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासन याची दखल केव्हा घेईल.?
चंद्रकला मोहर्ले
हातठेला व्यवसायी

वाजवीपेक्षा नाली जास्त उंच
वाजवीपेक्षा नाली जास्त उंच बांधल्याने आमच्या दुकानात पावसाचे पाणी जाण्याची दाट संभावना निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना बरेचदा अवगत केले परंतू ते ऐकायला तयार नाहीत. कामगार मुजोरी करतात.
शेख सादिक
व्यवसायी

प्रशासनाने  तातडीने लक्ष द्यावे !
नागरिकांच्या हितासाठी नाली बांधकाम होत असेल तर योग्य आहे. परंतू नुकसान होत असेल तर ते अयोग्य आहे. नाली उंच झाल्याने पावसाच्या पाण्यासह इमारतीचे पाणी आमच्या दुकानात साचणार असून ते आम्हाला नुकसानकारक होणार आहे. आमच्या दुकानाला यामुळे मोठा धोका झाला असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे.
दुर्गेश लखेरा
स्थानिक व्यवसायी

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What's going on in the village? After the nallas, the shops are down!