...आणि सरन्यायाधीश झाले भावुक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

माझा शपथविधी सोहळा दिल्लीत राष्ट्रपती भवनात झाला. परंतु आज खऱ्या अर्थाने सरन्यायाधीश झाल्यासारखे वाटते, अशा भावुक शब्दात सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आज नागपूरकरांनी केलेल्या सत्त्काराला उत्तर दिले.

नागपूर : आजच्या सत्काराने मी निःशब्द झालो. नागपूरकरांनी माझ्यावर दाखविलेले प्रेम, आपुलकी व सन्मानाला शब्दात उत्तर देणे कठीण आहे. माझा शपथविधी सोहळा दिल्लीत राष्ट्रपती भवनात झाला. परंतु आज खऱ्या अर्थाने सरन्यायाधीश झाल्यासारखे वाटते, अशा भावुक शब्दात सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आज नागपूरकरांनी केलेल्या सत्त्काराला उत्तर दिले. उत्तुंग व्यक्तिमत्त्व घडविण्याचे सामर्थ्य नागपूरच्या मातीत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

महापालिकेतर्फे रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात त्यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. मानपत्र, दुपट्टा व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार, उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायाधीश रवी देशपांडे उपस्थित होते. महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सत्कार सोहळ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रवासादरम्यान जेव्हा आव्हाने आलीत, त्यावेळी येथील सल्ले व शिकवण आठवली. शहराने शिक्षण, राजकारण, न्याय, क्रीडा, विज्ञान अनेक क्षेत्रात काम करणारे व्यक्ति दिले. उत्तम वकील, न्यायमूर्ती या शहराने दिले. एखाद्या व्यक्तिच्या यशाबाबत बोलताना त्याच्या संस्काराकडे लक्ष जाते. माझे सर्व संस्कार नागपुरातून आले, असे गौरवोद्गार काढताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. बालपणी पुलापलिकडे व पुलाच्या अलिकडे, असा नागपूरचा परिचय झाला. पुलाच्या अलीकडे महाराजबाग, तेलंगखेडीत खेळताना सी. के. नायडूसारखे स्टार भेटले. ही परंपरा आजही कायम आहे. नागपूर खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटियन शहर आहे. या शहरात देशातील सर्व समुदाय गुण्यागोविंदाने नांदत असून राज्य पुनर्रचनेचा नागपूरवर काहीही परिणाम झाला नाही. जनार्दन स्वामींनी योग शिकवला, तुकडोजी महाराजांनी धर्माच्या खऱ्या भावना प्रसारित केल्या, नकलाकार नाना रेटर यांनी मनोरंजन केले, असे नमुद करीत त्यांनी शहराच्या आठवणींना उजाळा दिला. नागपूर अनेकांची कर्मभूमी आहेच, शिवाय धर्मभूमीही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 मध्ये उपेक्षितांना सन्मानाचा हक्क दिला. या घटनांमधून मला नेहमीच प्रेरणा मिळाली. न्यायदान हे पवित्र कर्तव्य आहे. ही सामाजिक स्पंदने वडीलांकडून मिळाली, असेही त्यांनी स्पष्ट केले. ग्लोबल वार्मिंगच्या काळातही नागपूरचे वेगळेपण कायम आहे. येथील वने पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. अधिकारासोबत कर्तव्यही महत्त्वाची आहे. कर्तव्य विसरल्यास असंतुलन निर्माण होईल, असेही ते म्हणाले.

सविस्तर वाचा - लाखोंच्या मानवी साखळीचा अनोखा उपक्रम

कार्यक्रमात खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री रमेश बंग यांच्यासह न्यायमूर्ती, वकील, विविध क्षेत्रातील मातब्बर उपस्थित होते. प्रास्ताविक महापौर जोशी यांनी केले तर आयुक्त अभिजित बांगर यांनी मानपत्राचे वाचन केले. आभार उपमहापौर मनीषा कोठे यांनी मानले.

महापालिकेला दिला सल्ला
शहरातील फुटाळा, तेलंगखेडी व गांधीसागर तलाव भूमिगतरित्या एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे. याशिवाय नाग नदीतील पाण्याचा प्रवाह शुद्ध करावा. नागपूरचे हे वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी महापालिकेला दिला.

संवेदनशील व्यक्तिमत्व : गडकरी
सरन्यायाधीश बोबडे हे संवेदनशील व्यक्तिमत्व असल्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. सरन्यायाधीश म्हणून न्यायदानाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. न्यायालयीन व्यवस्थेत त्यांच्या नेतृत्त्वात गुणात्मक बदल होईल, असा विश्‍वास गडकरींनी व्यक्त केला.

"सरन्यायाधीश बोबडे यांच्यामुळे गेले सभापतीपद'
1992 मध्ये नरखेड पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शेतकरी संघटना विरोधात होती. निवडणुकीत एका सदस्याने मला मतदानासाठी शिक्का मारला. हा शिक्का 70 टक्के माझ्याकडे तर 30 टक्के बाहेर होता. त्यामुळे शेतकरी संघटना न्यायालयात गेली. सरन्यायाधीश बोबडे यांनी त्यावेळी माझे सभापतीपद रद्द केले, अशी आठवण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितली.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When Chief Justice of India got sentimental in Nagpur