डॉ. आंबेडकर चरित्र साधने समिती कधी होईल तयार?

When will the Ambedkar Charitra Sadhane Samiti be formed?
When will the Ambedkar Charitra Sadhane Samiti be formed?

नागपूर :  भाजपप्रणित सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष देशविदेशात "समता वर्ष' म्हणून साजरे केले. शतकोत्तर जयंती वर्षात १२५ कोटीचा निधी खर्च केला, मात्र बाबासाहेबांच्या साहित्याचा एकही खंड त्यांनी प्रकाशित केला नाही. २०१४ पासून २०२० या कालावधीत जयंती वर्षाचा नुसता जल्लोष साजरा करण्यात घालवला. भाजपच्या काळात तयार करण्यात आलेली समिती बरखास्त झाली. आता महाआघाडीचं सरकार आहे. वर्ष होत आहे, मात्र अद्याप डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती नव्याने तयार करण्यात आली नाही.कधी समीती तयार होईल आणि कधी बाबासाहेबांच्या साहित्याचे खंड प्रकाशित होतील याचे कोणतेही नियोजन विद्यमान सरकारने केले नाही. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशीत साहित्य प्रकाशनाचा वसा महाराष्ट्र शासनाने स्वीकारला. १९७९ साली बाबासाहेबांच्या साहित्याचा पहिला खंड प्रकाशीत झाला. ४१ वर्षात केवळ २२ खंड प्रकाशीत झाले. सर्वच खंड संपले. परंतु या खंडाच्या पुनर्मुद्रणाचेही काम मागील ४१ वर्षात शासनाला आले नाही. भाजपप्रणित काळातील उच्च व तंत्रशित्रण मंत्री विनोद तावडे यांनी राज्यात कॉंग्रेसचे सरकार असताना बाबासाहेबांचे खंड प्रकाशन करण्यात यावे यासाठी दरवर्षी होणाऱ्या अधिवेशनात खंड प्रकाशनासाठी अनेकदा लक्षवेधी लावल्या, परंतु सत्तेवर आल्यानंतर समितीचे अध्यक्षदेखील तावडेच होते, त्यांना त्यावेळी बाबासाहेबांचे साहित्य खंड रुपाने प्रकाशित करण्याच्या कार्याकडे साफ दुर्लक्ष केले, असा आरोप दलित पॅंथरतर्फे करण्यात आला. 
बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशनासाठी १९७७ साली प्रकाशन समिती स्थापन झाली. समितीचे पहिले सदस्य सचिव वसंत मून यांनी अवघ्या दोन वर्षांत १९७९ साली बाबासाहेबांच्या साहित्याचा पहिला खंड प्रकाशित केला. त्यानंतर सातत्याने २००० सालापर्यंत अतिशय गतीने बाबासाहेबांच्या अप्रकाशित साहित्याचे खंड प्रकाशन सुरू होते. बाबासाहेबांच्या साहित्य खंड विक्रीतून राज्य शासनाला ४ कोटी रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नागपुरातील प्रकाशन सोहळ्यात दिली होती. सदस्य सचिव वसंत मून यांचे निधन झाले आणि साहित्य खंड प्रकाशनाची गती मंद झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीवर प्रा. हरी नरके, प्रा. दत्ता भगत, प्रा. अविनाश डोळस अशा विचारवंतांनी काम पाहिले. मात्र या सदस्य सचिवांनी साहित्य खंड प्रकाशन खंडाच्या कार्याला गती देता आली नाही. मून यांच्या काळातील संशोधित साहित्यच चार खंडरुपाने आले. २०१४ नंतर तर समितीकडून जनतेची दिशाभूल झाली. बाबासाहेबांच्या फोटोच्या खंडामधील त्रृटी दुर करण्यात आल्या. यापलिकेडे कोणतेही मागील पाच वर्षात झाले नाही. यामुळे आंबेडकरी वाचकांमध्ये प्रचंड असंतोष भडकला असल्याची भावना भारतीय दलित पॅंथरचे अध्यक्ष प्रकाश बनसोड यांनी व्यक्त केली. 


 नियोजन आयोगावर डॉ. भालचंद्र मुणगेकर असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशनासाठी ५ कोटीचा निधी समितीला दिला होता. तत्कालिन सदस्यांनी समितीच्या माध्यमातून बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्याचे प्रकाशन करण्यासाठी पुढाकार न घेता यातील ३० लाख रुपयाचा निधील एका संस्थेकडे वळता केला. त्या संस्थेने बाबासाहेबांच्या चित्रांचा खंड प्रकाशित केला. उर्वरित ४ कोटी ७० लाख रुपयाच्या निधीतून बाबासाहेबांच्या साहित्याचा एकही नवीन खंड प्रकाशित झाला नाही. 
-प्रकाश बनसोड, अध्यक्ष, भारतीय दलित पॅंथर  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com