बाळाचा जन्म झाल्यावर कुठे मिळेल दाखला? वाचा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नातेवाइकांना प्रचंड त्रास होतो. एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यावर केंद्र सरकारने राज्य शासनाला व राज्य शासनाने आरोग्य खात्याला प्रत्येक शासकीय रुग्णालयातूनच नागरिकांना जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र देण्याचे निर्देश या निर्णयातून दिले आहेत.

नागपूर :  राज्य शासनाने प्रत्येक शासकीय रुग्णालयातील प्रमुख अधिकाऱ्यांना जन्म-मृत्यू नोंदणी करण्यासाठी आवश्यरक असलेल्या निबंधक पदाचा दर्जा दिला आहे. यामुळे ज्या ठिकाणी बाळ जन्माला आले, त्याच रुग्णालयातूनच बाळाच्या जन्माचा तसेच मृत्यूचा दाखला देण्यात येईल. तशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत मेयो, मेडिकल, डागा तसेच इतर शासकीय रुग्णालयांत जारी केल्या आहेत. गुरुवारी मेडिकलमध्ये या विषयावर बैठक घेण्यात आली.

हाय दुर्बुद्धी  - ६५० रुपयांची लाच घेताना वनाधिकारी जाळ्यात

जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नातेवाइकांना प्रचंड त्रास होतो. एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यावर केंद्र सरकारने राज्य शासनाला व राज्य शासनाने आरोग्य खात्याला प्रत्येक शासकीय रुग्णालयातूनच नागरिकांना जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र देण्याचे निर्देश या निर्णयातून दिले आहेत. यामुळे ज्या ठिकाणी बाळ जन्माला आले, त्यांनी जन्माचे प्रमाणपत्र द्यावे असा आदेश जारी केला. या निर्णयाची अंमलबजावणी शासनाने सुरू केली आहे. प्रत्येक शासकीय रुग्णालयांतील प्रमुख अधिकाऱ्याला जन्म-मृत्यू निबंधकाचा दर्जा दिला. प्रमाणपत्रावर त्यांना स्वाक्षरीचे अधिकार दिले आहेत. या निर्णयानुसार जिल्ह्यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रापासून, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालयासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रमाणपत्र कसे असावे याची माहिती सादर केली.

पहिला मान मोवाड आरोग्य केंद्राला

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्याप हे प्रमाणपत्र देण्याची सोय करण्यात आली नाही, मात्र गावखेड्यातून याला सुरुवात झाली आहे. पहिले प्रमाणपत्र मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 जानेवारी 2020 रोजी जन्मलेल्या बाळाची 4 जानेवारीला नोंदणी केली. आणि 6 जानेवारीला आईला सुटी झाली त्यावेळी या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले.
मेयो, मेडिकल अद्याप दूर दरम्यान, मेडिकल आणि मेयोत मोठ्या प्रमाणात प्रसूती होतात. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या नियमाची माहिती देत दोन्ही रुग्णालयांना तातडीने हे प्रमाणपत्र उपलब्ध करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार गुरुवारी या प्रमाणपत्राच्या विषयावर मेडिकलमध्ये संबंधित विभागाचे प्रमुख यांनी बैठक घेतली. ही बैठक बराच वेळ सुरू होती. यामुळे या बैठकीत नेमके काय झाले हे मात्र कळू शकले नाही. सध्या तरी मेयो आणि मेडिकल असे प्रमाणपत्र देण्यापासून दूर आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where to get the certificate after the baby is born? Read ...