जाणून घ्या वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या भारतीयाला मिळाला!

Har-Gobind-Khorana
Har-Gobind-Khorana

नागपूर : यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार शास्त्रज्ञ हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना जाहीर झाला आहे. नुकतीच या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या तिघांना हिपॅटायटिस सी या विषाणूच्या शोधासाठी नोबेल पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या आजारांशी लढा देण्यासाठी या तिनही शास्त्रज्ञांनी मोलाचे योगदान दिल्याने त्यांचा हा बहुमूल्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार याआधी जन्माने भारतीय असलेल्या एका शास्त्रज्ञाला त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील बहुमोल कामगिरीसाठी मिळाला आहे, त्यांचे नाव आहे डॉ. हर गोविंद खुराना.

डॉ. हर गोविंद खुराना हे भारतीय वंशाचे अमेरिकन जीवरसायन शास्त्रज्ञ होते. त्यांनी जीवरसायन शास्त्रात केलेल्या संशोधनामुळे आज ते पूर्ण जगभर ओळखले जातात. हर गोविंद खुराना यांचा जन्म ९ जानेवारी १९२२ रोजी अविभाजित भारतातील पंजाब राज्याच्या मुल्तान जिल्हातील रायपुर या गावी झाला होता. खुराना यांचे वडिल पटवारी होते. डॉ. खुराना हे आपल्या चार भावंडांपैकी सर्वात लहान होते. कौटुंबिक परिस्थिती बेताची असतांना देखील, त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष दिल.

डॉ. खुराना केवळ १२ वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांचे मोठे भाऊ नंदलाल यांनी सांभाळली. अश्या परीस्थितीत डॉ. खुराना यांनी शालेय तसचं महाविद्यालयीन शिक्षण आपल्या प्रतिभेच्या बळावर स्कॉलरशिप मिळवून पूर्ण केलं.

डॉ. खुराना यांचे प्रारंभिक शिक्षण स्थानिक शाळेतच पूर्ण केलं होत. यानंतर त्यांनी मुल्तान येथील डी. ए. वी. माध्यमिक शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. डॉ. खुराना दरवर्षी आपल्या गुणवत्तेच्या आधारे स्कॉलरशिप मिळवीत असत.

यानंतर खुराना यांनी, सन १९४३ साली पंजाब मधील विश्वविद्यालयामधून बी. एस. सी. आणि सन १९४५ साली एम. एस. सी ची पदवी प्राप्त केली. डॉ. खुराना उच्च शिक्षणाकरिता भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंडमध्ये गेले. त्याठिकाणी त्यांनी लिवरपूल विश्वविद्यालयामधून प्रा. रॉजर जे. एस. बियर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली.
यानंतर डॉ. खुराना यांना भारत सरकारतर्फे संशोधन करण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली. यावेळी ते झ्यूरिक (स्वित्झर्लंड) मधील फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्रोफेसर व्ही. प्रेलॉग यांच्या सोबत संशोधन करू लागले.

आपलं संशोधन पूर्ण झाल्यानंतर डॉ. खुराना भारतात परत आले. परंतु, त्यांना आपल्या जोगे काम न मिळाल्यामुळे ते इंग्लड देशांत गेले. त्याठिकाणी त्यांना कैम्ब्रिज विद्यापीठाची सदस्यता मिळाली तसच, लॉर्ड टाद यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
सन १९५२ साली डॉ. खुराना यांना कॅनडा मधील व्हँकुव्हर कोलंबिया विद्यापीठामार्फत बोलावणे आले. डॉ. खुराना त्याठिकाणी गेल्यानंतर त्यांना जैव रसायनशास्त्र विभागाचे अध्यक्षपद देण्यात आले. सन १९६० साली संयुक्त राज्य अमेरिका येथील विस्कॉन्सिन विद्यापीठातील एंझाइम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सन १९६६ साली डॉ. खुराना यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.डॉ. खुराना यांची मॅसॅच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सन १९६८ साली डॉ. खुराना यांना अनुवांशिक संहिताची भाषा समजण्यासाठी आणि प्रथिने संश्लेषणातील भूमिकेबद्दल वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. हरगोविंद खुराना हे नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय वंशाचे तिसरे व्यक्ती होते.
९ नोव्हेंबर २०११ साली डॉ. खुराना यांनी अमेरिकेतील मॅसाचूसिट्स या ठिकाणी अंतिम श्वास घेतला.

सविस्तर वाचा - माडिया समाजातील पहिले वकील लालसू नागोटी

डॉ. हर गोविंद खुराना यांना मिळालेले पुरस्कार

  • डॉ. हरगोविंद खुराना यांना त्यांच्या संशोधन व कार्याबद्दल अनेक पुरस्कार व सन्मानाने गौरविण्यात आले.
  • सन १९६८ साली त्यांना वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पारितोषिक प्राप्त झाले.
  • सन १९५८ साली कॅनडा देशातील मार्क मेडल्स प्रदान करण्यात आले.
  • सन १९६० साली कॅनडियन पब्लिक सर्विस तर्फे त्यांना स्वर्ण पदक देण्यात आले.
  • सन १९६७ साली डॅनी हॅनमन पुरस्कार मिळाला.
  • सन १९६८ साली लॉस्‍कर फेडरेशन पुरस्‍कार आणि लूसिया ग्रास हारी विट्ज पुरस्‍कार द्वारे सन्मानित करण्यात आलं.
  • सन १९६९ साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं.
  •  

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com