वृद्धांचा सर्वाधिक छळ कोणाकडून?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

हेल्पेज इंडियाकडून जून 2019 मध्ये विविध ठिकाणातील वृद्धांशी केलेल्या चर्चा आणि प्रश्‍नोउत्तरांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले गेले. या सर्वेक्षणात ज्येष्ठांबाबत त्यांच्या नातेवाइकांना काय वाटतं यावर प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणात 72 टक्के वृद्धांनी आपल्याच कुटुंबातील व्यक्तीविरोधात संस्थेकडे तक्रारी नोंदवित मुलगा आणि सुनेमुळे त्रास होत असल्याचे सांगितले आहे.

नागपूर : घरात ज्येष्ठ नागरिक असतील तर घराला घरपण येतं असं म्हणतात. पण, ज्यांच्यासाठी ज्येष्ठ आयुष्यभर झटत असतात त्यात मुलांमुळे ज्येष्ठांना सर्वाधिक त्रास होत असल्याचं हेल्पेज इंडियाने केलेल्या अहवालातून समोर आले आहे.

मुंढे इफेक्ट - साडेनऊच्या ठोक्याला कर्मचारी हजर!

हेल्पेज इंडियाकडून जून 2019 मध्ये विविध ठिकाणातील वृद्धांशी केलेल्या चर्चा आणि प्रश्‍नोउत्तरांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले गेले. या सर्वेक्षणात ज्येष्ठांबाबत त्यांच्या नातेवाइकांना काय वाटतं यावर प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणात 72 टक्के वृद्धांनी आपल्याच कुटुंबातील व्यक्तीविरोधात संस्थेकडे तक्रारी नोंदवित मुलगा आणि सुनेमुळे त्रास होत असल्याचे सांगितले आहे. सुना, भावंडे, पुतणे, भाचे, नातवंडे, नोकर आदीकडून होत असलेल्या हेटाळणीमुळे आयुष्याचा एक एक दिवस मोजत असल्याचे यावेळी ज्येष्ठांनी सांगितले. 72 टक्के वृद्धांना वाईट वागणूक, हेटाळणी, शिवीगाळ होत असल्याचे सांगितले. सर्वेक्षणानुसार वृद्धांवर अत्याचार करणाऱ्यांपैकी 32.5 टक्के हे जवळचे नातेवाईक असतात. टोमणे मारणे, शिळे अन्न खायला देणे, उशिरा जेवण, चहा देणे, वाईट बोलणे, खिल्ली उडवणे, टीव्ही पाहू न देणे आदी प्रकारचा त्रास होत असल्याचे ज्येष्ठांनी सांगितले.

ज्येष्ठांच्या काळजीसाठी निरुत्साही

यातून समोर स्पष्ट झालं की, त्रास देणाऱ्यांपैकी प्रामुख्याने मुलगा आणि सून हे आहेत. तर, जे लोक ज्येष्ठांचा सांभाळ करतात अशा 35 टक्के केअर गिव्हर्सना ज्येष्ठांची काळजी घेण्यास अजिबातच उत्साह वाटत नाही, तर 29 टक्के लोकांना ज्येष्ठांचा सांभाळ म्हणजे करणे ओझे वाटते. तसेच 30 टक्के व्यक्तींना ज्येष्ठांना वृद्धाश्रमात ठेवून भेटायला जायला आवडतं. 25 टक्के देखभाल करणारे सांगतात की, आपल्या कामाचा किंवा इतर राग ते ज्येष्ठांवर काढतात. तसंच, सर्वांत जास्त 68 टक्के सुना ज्येष्ठांची जबाबदारी आपल्या नोकरांवर सोपवतात. 70 टक्के ज्येष्ठांना देखभाल करणाऱ्यांकडून भावनिक आधाराची गरज असते, असेही अहवालात नमूद आहे.

सार्वजनिक ठिकाणीही होतो अपमान

ज्येष्ठ नागरिकांना बॅंकेत, पोस्ट ऑफिसमध्ये, बसमध्ये, सार्वजनिक उद्यानात इत्यादी ठिकाणीही तरुणांकडून अपमानास्पद वागणूक दिल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट केले आहे. सर्वाधिक तुसडेपणाची वागणूक पोस्टात होत असल्याचे ज्येष्ठांनी सांगितले. कुटुंबातील ज्येष्ठांनी चांगले कपडे न घातल्यास, व्यसन केल्यास, अधिक बोलल्यास अथवा औषधांची वारंवार मागणी केल्यास त्यांना कुटुंबीयाकडून वाईट वागणूक मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

काळजी वाहकांची कमतरता

नागपूर शहरात अनेक एकटे राहणारे ज्येष्ठ आहेत मात्र, त्यांची काळजी घेणाऱ्या संस्था आणि स्वयंसेवक शहरात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. अशा प्रकारच्या काळजी वाहकांचे प्रशिक्षण खासगी रुग्णालय अथवा शासकीय आरोग्य यंत्रणेनेने उपलब्ध करून दिल्यास, ज्येष्ठ नागरिकांना सोयी सुविधा देणे सोयीस्कर होईल.

शासनाने आखावे धोरण
कुटुंबाने ज्येष्ठांची काळजी घेणे गरजेचे आहेच. त्यांचे व्याप सांभाळून त्यांना जमत नसेल तर, त्यांची चांगली व्यवस्था करावी, शासनानेही ज्येष्ठ नागरिकांबाबत धोरण आखून, त्याच्या उतारवयातील काळ सुसह्य करता येईल यासाठी उपाययोजना करावी.
-सुनील ठाकूर, व्यवस्थापक, हेल्पेज इंडिया, नागपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is most harassed by the elderly?