‘ते’ पाच मृतदेह पाहून गहिवरले वडगावचे अख्खे शिवार, थरथरल्या हातांनी केले सामूहिक अंत्यसंस्कार...

उत्तम पराते
रविवार, 2 ऑगस्ट 2020

स्फोटाची घटना समजताच वडगाव येथील नागरिक काम सोडून घरी परतले. रविवारी ते कामावर न जाता या कामगारांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावातच उपस्थित होते. वडगाव बेला येथून हाकेच्या अंतरावर अवघ्या दोन किलोमीटरवर आहे. वडगावला जाताना रस्त्यावरून जथ्थेच्या जथ्थे वडगावकडे जाताना दिसत होते. दुचाकीच्या ठिकठिकाणी रांगा लागल्या होत्या. गावात स्मशान शांतता पसरली होती. बायाबापे गोळा होऊन दुःखद घटनेची चर्चा करत होते.

बेला (जि.नागपूर): खुर्सापार येथील मानस अग्रो ॲंड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत शनिवारी बायोगॅसच्या टाकीवर स्फोट होऊन वडगावच्या पाच जणांचा आकस्मिकपणे करून अंत झाला. मृतदेह उशिरा रात्रीला शवविच्छेदनास गेल्यामुळे रविवारी दुपारी चार वाजता मृतदेहावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रफुल्ल पांडुरंग मुन, लीलाधर वामन शेंडे, मंगेश प्रभाकर नौकरकर, वासुदेव विठ्ठल लडी व सचिन प्रकाश वाघमारे यांचे मृतदेह घरी येताच उपस्थित अक्षरशः गहिवरले. आप्तस्वकीयांनी हंबरडा फोडला.
अधिक वाचा  :  शहरातील वाढत्या प्रकोपाला बळ मिळते; हे असू शकते कारण...

निराधार कुटुंबीयांचे सांत्वन
स्फोटाची घटना समजताच वडगाव येथील नागरिक काम सोडून घरी परतले. रविवारी ते कामावर न जाता या कामगारांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावातच उपस्थित होते. वडगाव बेला येथून हाकेच्या अंतरावर अवघ्या दोन किलोमीटरवर आहे. वडगावला जाताना रस्त्यावरून जथ्थेच्या जथ्थे वडगावकडे जाताना दिसत होते. दुचाकीच्या ठिकठिकाणी रांगा लागल्या होत्या. गावात स्मशान शांतता पसरली होती. बायाबापे गोळा होऊन दुःखद घटनेची चर्चा करत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजेंद्र मुळक यांनीमृतांचे कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले. गावात तणाव होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त होता. सदया आरोपींना अटक केली नाही. याप्रकरणी स्फोटास कारणीभूत असणाऱ्या दोन आरोपींवर बेला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे समजते. यातील आरोपीचे नाव अद्याप कळले नाही. कंपनीचे ठेकेदार बेजबाबदारपणे वागले, म्हणून पाच जणांना जीव गमवावा लागला. तरीपण आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंकाकुशंका व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक वाचा  : डॉ, मी पोटातील बाळाला रोज समजाविते, तुला बाहेर यायचे नाही आता, तुझ्या आईला कोरोना झालाय...
 

असा आहे ‘त्या़’ मृत कामगारांचा जीवनपट

मंगेश प्रभाकर नौकरकर (वय२०)
मंगेश नौकरकर हा वीस वर्षाचा तरुण. आईवडिलांचा तो एकमेव लाडका होता. आयटीआय इलेक्ट्रीशियन प्रशिक्षित झालेल्या मंगेशला केवळ दोन महिन्यांपासून बायोगॅस युनिटमध्ये कंत्राटीत नोकरी लागली होती. मूळचे बेल्ल्याचे असतानाही रोजगाराच्या उद्देशाने वडील प्रभाकर नोकरकरने शेतातच वडगावला लागूनच घर बांधून वीस वर्षांपासून वास्तव्य करणे सुरू केले होते. मंगेशच्या आकस्मिक ‘एक्झिट़़' ने नागरिकांचे दुःख अनावर झाले.

प्रफुल्ल पांडुरंग मून (वय२५)
२५ वर्षीय प्रफुल्ल हा अविवाहित होता दोन्ही लहान भाऊ बेरोजगार आहेत. त्यामुळे मिळेल ते काम करतातआईवडिलांचे पाचही जण एका टिनाच्या या शेडमध्ये आबाजी जागेवर अत्यंत गरिबीची हलकी जीवन जगत आहेत. प्रफुल्ल मोठा असल्याने त्याचे पुढच्या वर्षी लग्न करायचे, असा आई-वडिलांचा बेत होता. पण अखेर ते स्वप्नच ठरले. कुटूंबीयांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.

अधिक वाचा : नागपूर जिल्हयातील बेल्यामधील कारखान्यात ब्लास्ट, पाच ठार

लीलाधर वामन शेंडे (वय४८)
लीलाधरला पत्नी व तीन मुली आहेत. आईवडील व लहान भाऊ वेगळे राहतात. लीलाधरच्या आकस्मिक मृत्यूमुळे तीन मुलींचे शिक्षण संगोपन व लग्नाची जबाबदारी पत्नी सुरेखावर येऊन पडली आहे. मात्र ती अज्ञानी असल्यामुळे शेत व मजुरीशिवाय तिचे पुढे पर्याय नाही. आकस्मिक संकटांमुळे जीवनापुढेही संकट उभे ठाकले आहे.

वासुदेव विठ्ठल लडी (वय३०)
वासुदेवाचे सहा वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन लहान मुले आहेत. सुजित पाचव्या वर्गात येथील विमलाबाई तिडके शाळेत शिकत आहे. लहान पियुष वडगावचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिलीच्या शिक्षणाचे धडे घेत आहेत. वासुदेवची नावे फक्त तीन एकर शेती आहे. ऐन तारुण्यात मुलांना सोडून जीवनसाथी गेल्याने पत्नी धाय मोकलून रडत होती.

सचिन प्रकाश वाघमारे (वय३०)
प्रकाश वाघमारे या ५८ वर्षीय सालगडी मजुराचा सचिन हा मोठा मुलगा असून लहान दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. सचिन हाच वृद्ध आई-वडिलांचा एकमेव आधार होता. त्याचे लग्नसुद्धा व्हायचे होते. मात्र अपघाती निधनाने एकमेव आधारवड ठरवला. त्याच्याकडे शेती नाही. तो तीन-चार वर्षांपासून अस्थायीपणे नोकरीवर प्लांटमध्ये काम करत होता.  

 

संपादन  : विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The whole Shivar of Wadgaon was overwhelmed by the sight of five bodies