ग्रामीण उद्योग अर्थव्यवस्था पाच लाख कोटींच्या घरात नेणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020

उद्योगांची व्याप्ती अधिक वाढणार आहे. ऍग्रो एमएसएमई अंतर्गत गावातील उद्योगांना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आहे.

नागपूर : देशातील ग्रामीण उद्योग अर्थव्यवस्था आज 88 हजार कोटी रुपयांची आहे. ती 5 लाख कोटींपर्यंत नेण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागात रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण होतील, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांशी गडकरींनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. संपूर्ण जग कोरोनाच्या प्रभावाखाली असताना आपल्यालाही कोरोनाशी प्राधान्याने यशस्वी लढा द्यायचा आहे. जोपर्यंत यावर प्रतिबंधक लस निघत नाही तोपर्यंत यशस्वी झुंज द्यायची आहे.

कोरोनामुळेच अर्थव्यवस्थेसमोरही आव्हाने उभी झाली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनाही या स्थितीचा फटका बसत आहे. तसेच स्थलांतरित मजुरांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी लोकांच्या मनातील भीती आणि नैराश्‍य दूर करावे लागेल. सकारात्मकता आणि आत्मविश्वास लोकांमध्ये जागृत करावा लागेल, असेही ते म्हणाले. 

एमएसएमईमध्ये करण्यात आलेल्या विविध सुधारणांची माहिती देताना गडकरी यांनी सांगितले की, आता एमएसइमईची व्याख्याच बदलली. यामुळे उद्योगांची व्याप्ती अधिक वाढणार आहे. ऍग्रो एमएसएमई अंतर्गत गावातील उद्योगांना अधिक बळकट करण्याचा माझा प्रयत्न आहे.

आज 88 हजार कोटींची ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था आता 5 लाख कोटींपर्यंत नेण्याचे प्रयत्न आहेत. यामुळे रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण होतील. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मितीची क्षमता आहे. मधाची निर्मिती, इथेनॉलची निर्मिती, खादी ग्रामोद्योगाला चालना, हस्तकला, मासेमारी अशा अनेक उद्योगांची भरभराट कशी होईल हे त्यांनी यावेळी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will make economy of rural industry to Rs 5 lakh crore