झाडाच्या सावलीत बसली, डोळा लागला आणि पुढे...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

सुमोली (50) असे अटकेतील महिलेचे नाव सांगण्यात येते. ती मूळची झारखंडची रहिवासी आहे. सुमोली आणि तिची मुलगी रिता (25) उदरनिर्वाहासाठी शरिरावर "गोंदण' करतात. त्यासाठी सतत फिरत असतात. फेब्रुवारी महिन्यात त्या अकोला रेल्वेस्थानक परिसरात होत्या. अपहृत चिमुकला दर्यापूरचा रहिवासी असून त्याचे वडील विजय पवार मजुरी काम करतात. त्यांना 6 मुले आहेत.

नागपूर : दोन वर्षांचा चिमुकला अकोला रेल्वेस्थानकावरून अचानक बेपत्ता झाला. लॉकडाऊनच्या काळात तो नागपूर रेल्वेस्थानक परिसरात रामझुल्याखाली एका महिलेसोबत वावरत होता. नंतरच्या काळात महिला बेपत्ता झाली. महिला व बालकल्याण विभागामार्फत चिमुकल्याची रवानगी शिशुगृहात करण्यात आली. अकोला लोहमार्ग पोलिसांचे पथक महिलेच्या शोधात होते. बुधवारी पथकाने रामझुला परिसरातूनच त्या महिलेला अटक केली.

सुमोली (50) असे अटकेतील महिलेचे नाव सांगण्यात येते. ती मूळची झारखंडची रहिवासी आहे. सुमोली आणि तिची मुलगी रिता (25) उदरनिर्वाहासाठी शरिरावर "गोंदण' करतात. त्यासाठी सतत फिरत असतात. फेब्रुवारी महिन्यात त्या अकोला रेल्वेस्थानक परिसरात होत्या. अपहृत चिमुकला दर्यापूरचा रहिवासी असून त्याचे वडील विजय पवार मजुरी काम करतात. त्यांना 6 मुले आहेत.

फेब्रुवारीत विजयची पत्नी वडिलांच्या भेटीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी निघाली. मुलालाही तिने सोबत घेतले. अकोला रेल्वेस्थानक परिसरातील झाडाच्या सावलीत बसली असताना तिचा डोळा लागला. त्याचवेळी मुलगा बेपत्ता झाला. विजय पवार यांनी लोहमार्ग ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली. शोधाशोध करण्यात काही दिवस गेले. त्याच सुमारास प्रारंभी संचारबदी आणि नंतर लॉकडाउन झाले. पोलिस तपासात सुमोली आणि रिता या मायलेकी मुलाला घेऊन नागपूरच्या दिशेने गेल्याचे पुढे आले. सीमोली चिमुकल्याचा सांभाळ करीत होती.

अवश्य वाचा- झणझणीत सावजी रश्‍श्‍यासाठी खवय्यांना तरसावे लागणार, हॉटेल होणार बंद...

याबाबत माहिती मिळताच चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी विचारपूस करण्यासाठी गेले असता मुलगा एकटाच कचऱ्यात खेळताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन महिलेचा शोध घेण्यात आला. पण, भीतीपोटी सुमोली पुढे आली नाही. गणेशपेठ पोलिसंच्या मदतीने मुलाला शिशुगृहात ठेवण्यात आले. गणेशपेठ पोलिसांकडून चिमुकल्याचे छायाचित्र अकोला लोहमार्ग पोलिसांना पाठविण्यात आले. हरवलेला मुलगा तोच असल्याची खात्री करीत अकोला पोलिसांचे पथक नागपुरात पोहोचले. त्यांनी शोधाशोध करीत सुमोलीला हुडकून काढत अटक केली. या प्रकरणात तिच्या मुलीचाही शोध घेतला जात आहे. त्या दोघींनी मुलाचे जाणीवपूर्वक अपहरण केले की चिमुकल्याला आधार दिला, हा पैलू पडताळून बघितला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman arrested in boy kidnapping case