भावाला ओवाळून त्याच्यासोबत निघालेल्या बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

रूपेश खंडारे
Monday, 23 November 2020

पारशिवनी येथे नातेवाईकांच्या चौदावीच्या कार्यक्रमाला यायचे असल्याने उमाबाई सावरगाववरून सावंगी येथे राहणाऱ्या भावाकडे भाऊबीज आटोपून पारशिवनीला चौदावीच्या कार्यक्रमासाठी  सोमवारी सकाळी सावंगी येथून भावासह त्याच्या मोटारसायकलने   पारशिवनीला निघाले.

पारशिवनी (जि. नागपूर)  ः भाऊबीज आटोपून नातेवाईकांच्या  घरी चौदावीच्या कार्यक्रमाला  भाऊ-बहीण मोटारसायकलने सावनेरमार्गे पारशिवनीला येत असताना सावळी गावाजवळ मोटरसायकलवरून पडून  सावरगाव निवासी उमाबाई अशोक कुडे (वय 60) यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारच्या  सकाळी अकरा वाजतादरम्यान घडली.

पारशिवनी येथे नातेवाईकांच्या चौदावीच्या कार्यक्रमाला यायचे असल्याने उमाबाई सावरगाववरून सावंगी येथे राहणाऱ्या भावाकडे भाऊबीज आटोपून पारशिवनीला चौदावीच्या कार्यक्रमासाठी  सोमवारी सकाळी सावंगी येथून भावासह त्याच्या मोटारसायकलने   पारशिवनीला निघाले.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! शेतात कामासाठी गेला शेतकरी; सापाने तब्बल तीन वेळा दंश केल्याने गेला जीव
 

पारशिवनीजवळील सावळी गावाजवळ अचानक मोटारसायकलवरून पडल्याने त्याचा जागीच मुत्यू झाला. बहीण मोटारसायकलवरून पडल्याचे पाहून  भाऊ मदतीला गेला असता उमाबाईचा मृत्यू झाला होता. लागलीच पारशिवनी पोलिसांना घटनेची माहिती देण्यत आली. वाहतूक पोलिस शिपाई प्रवीण मरसकोल्हे व त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळावर दाखल झाले. 

उमाबाईला पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पारशिवनी पोलिस करीत आहेत.

भाऊबीज ठरली अखेरची

भावाला ओवाळून त्याच्या  उज्ज्वल भविष्याची कामना करणाऱ्या बहिणीचा आपल्याच डोळ्यांदेखत मृत्यू होईल, याची साधी कल्पनाही  भावाच्या ध्यानीमनी नसताना अचानक काळाने झडप घातली. भाऊ-बहिणीची अखेरची भाऊबीज ठरली. या घटनेने दोन्ही कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman dies after falling from two-wheeler incident at parshivani