अपघातात महिलेच्या डोक्‍याला लागला जबर मार, परंतु डॉक्‍टरांनी कोरोना तपासणीसाठी ठेवले तात्कळत अन्‌...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेवर उपचार न करता आधी कोविड-19 चाचणी करण्यासाठी रेफर करण्यात आले. यामुळे उपचाराला उशीर झाला. त्यातच मेडिकलमध्ये रेफर करण्यात आल्याने रक्तस्राव जास्त झाला.

नागपूर : कोवीड-19 चाचणी करण्यासाठी आईला मेयोतून मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने व्हेंटिलेटरची गरज होती. परंतु, व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले. त्यामुळे हाती अंबू बॅग देण्यात आली. बराचवेळ अंबू बॅग दाबून हात दुखून गेले. परंतु, व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले नाही. तसेच मेडिकलच्या कॅज्युअल्टीमध्ये रुग्णांना आणल्यानंतर मेंदूरोग तज्ज्ञांना कॉल पाठवण्यात येतो. मात्र, पाच तास उलटून गेल्यानंतरही मेंदूरोग तज्ज्ञ पोहचले नाही. गरिबांच्या जीवाची मेडिकल-मेयोत किंमत नसल्याची आपबिती रुग्णाच्या मुलाने व्यक्‍त केली. 

अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेवर उपचार न करता आधी कोविड-19 चाचणी करण्यासाठी रेफर करण्यात आले. यामुळे उपचाराला उशीर झाला. त्यातच मेडिकलमध्ये रेफर करण्यात आल्याने रक्तस्राव जास्त झाला. यामुळे या महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप करीत या प्रकरणाची तक्रार पोलिसांत करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकाने दिली. 

क्लिक करा - भीषण अपघात : ट्रकने दुचाकीस्वाराला पाचशे मिटर नेले फरफटत; अंगावरचे कपडेही...
 

वंदना दाढे असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी रात्री या महिलेचा नागपुरातील दहीबाजार परिसरातील न्यू ओम साईनगर येथे अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्‍याला जबर दुखापत झाली. यामुळे तत्काळ मेयोत दाखल करण्यात आले. मात्र, येथील डॉक्‍टरांनी कोविड चाचणीची सक्ती केली. चाचणीसाठी आवश्‍यक घशातील द्रव पदार्थ घेण्यास उशीर झाला. तोपर्यंत डॉक्‍टरांनी कोणतेही उपचार केले नाही. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. 

यानंतरही उपचार करण्याचे सोडून मेयोत मेंदूरोग तज्ज्ञ नसल्याने मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले. मेडिकलमध्ये या महिलेकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे महिला दगावली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. प्रकरणासंदर्भात डॉक्‍टरांच्या विरोधात पोलिसांत तक्रार 
करण्यात येणार असल्याची माहिती या महिलेच्या मुलाने दिली. 

मेयो, मेडिकल गरिबांसाठी नाही 

आईला मेयोतून मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने व्हेंटिलेटरची गरज होती. परंतु, व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले. व्हेंटिलेटर नसल्याने नातेवाईकांच्या हाती अंबू बॅग देण्यात आली. बराचवेळ अंबूबॅग दाबून हात दुखून गेले. परंतु या महिला रुग्णाला व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले नाही. नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीत फुगा दाबून हात दुखले असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. गरिबांच्या जीवाची मेडिकल-मेयोत किंमत नाही. आता मेयो, मेडिकल गरिबांसाठी राहिले नसल्याचे मृत महिलेच्या मुलाने पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman dies due to delay in treatment, Allegations of relatives