भीषण अपघात : ट्रकने दुचाकीस्वाराला पाचशे मिटर नेले फरफटत; अंगावरचे कपडेही...

सतीश घारड
सोमवार, 22 जून 2020

राष्ट्रीय महामार्गावर कांद्री, टेकाडी फाटा ते एरिगेशन कॉलनीपर्यंत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कोळसाने भरलेले ट्रक उभे असतात. त्यांनी येथे अवैध पार्किंग झोनच तयार केले आहे. कन्हान पोलिसांची कार्यवाही शून्य असल्याने ट्रक संचालकांची मुजोरी वाढलेली आहे. कायद्याला न जुमानता रस्त्यावर बेहिशोबी ट्रक उभे असतात.

टेकाडी (जि. नागपूर) : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील टेकाडी गावानजीक सोमवारी सकाळी ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकने दुचाकीस्वाराला पाचशे मिटर फरफटत नेले. यात दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रकाश सूर्यभान चवरे (वय 37, रा. एरिगेशन कॉलनी, टेकाडी) असे मृत युवकाचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार, प्रकाश चवरे हा रामटेक डेपोमध्ये एसटी महामंडळाच्या बसवर चालक म्हणून कार्यरत होता. नेहमीप्रमाणे प्रकाश सोमवार सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास दुचाकीने कामाला जाण्यास निघाला. राष्ट्रीय महामार्गावरून रामटेककडे जाण्यासाठी टेकाडी फाट्यानजीक असलेल्या महामार्गाच्या पुलाखाली नागपूर मार्गे येणाऱ्या ट्रकने प्रकाशच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की ट्रकच्या मधोमध प्रकाश दुचाकीसह अडकला.

हेही वाचा - काकूच्या प्रेमात आकंठ बुडाला पुतण्या, काका ठरत होता अडसर... मग

अपघात झाल्याचे लक्षात येताच ट्रक चालकाने पळ काढला. मात्र, प्रकाश दुचाकीसह ट्रकच्या मध्ये फसल्याने साधारणतः पाचशे मीटरपर्यंत फरफटत गेला. काही अंतरावर दुचाकी ट्रकबाहेर निघत नसल्याचे निदर्शनास येताच ट्रक चालक ट्रक महामार्गावर सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेतली. परंतु, तोवर ट्रक खाली चेंदामेंदा झालेला मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. 

महामार्ग पोलिस आणि कन्हान पोलिसांनी घटनास्थळ गाठत तासाभराच्या प्रयत्नानंतर ट्रकमध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढला. यानंतर मृतदेह कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन चालकाचा शोध सुरू केला आहे. मृताचा भाऊ गौरव सूर्यभान चवरे याच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे.

अधिक माहितीसाठी - शिक्षकांसाठी शाळा २६ पासूनच, या शाळेतील शिक्षकांना आदेश

अवैध ट्रक पार्किंगने अपघातात वाढ

पुलाखाली नेहमी ट्रक उभे असतात. यामुळे नेहमीच पुलाखालून जाताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. ट्रक उभे असतानाच समोरून येणाऱ्या ट्रकने प्रकाशला फरफटत नेले. अपघात झाल्यानंतर पुलाखाली असलेले अवैध ट्रक चालकांनी कार्यवाहीच्या धाकाने तिथून पळ काढला. अवैध ट्रकांच्या पार्किंगने नेहमीच अपघात होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. 

साहेब, आणखी किती बळी

राष्ट्रीय महामार्गावर कांद्री, टेकाडी फाटा ते एरिगेशन कॉलनीपर्यंत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कोळसाने भरलेले ट्रक उभे असतात. त्यांनी येथे अवैध पार्किंग झोनच तयार केले आहे. कन्हान पोलिसांची कार्यवाही शून्य असल्याने ट्रक संचालकांची मुजोरी वाढलेली आहे. कायद्याला न जुमानता रस्त्यावर बेहिशोबी ट्रक उभे असतात. पोलिसांकडून मात्र कार्यवाही केल्यास गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकीय लोकांचे फोन येत असल्याची बतावणी केली जाते. पोलिस, राजकारण आणि ट्रक संचालक यांच्या चिरीमिरीत मरण मात्र सभोवतालच्या गावकऱ्यांचे आहे. साहेब, आणखी किती बळी असा सवाल स्थानिकांनी करायला सुरुवात केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One died in an accident in Nagpur district