"स्त्री मुक्त' झाली का? "ती' आजही लढतेय...

मनीषा मोहोड
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

शबीना अवघ्या वीस वर्षांची. उच्चभ्रू कुटुंबातील मुली ज्या वयात महाविद्यालयीन फॅशनवर गप्पा करतात त्या वयात शबीनाच्या मांडीवर दोन लेकरं खेळत आहेत. इतक्‍या कमी वयात, दोन मुलांची आई झालेल्या शबिनाला नवऱ्याने घरातून बाहेर काढले. माहेरची परिस्थिती जेमतेम अशा परिस्थिती कुठे जाणार म्हणून तिने मुस्लिम महिला मंचचे दार ठोठावले.

नागपूर : सावित्रीबाई फुले यांनी "स्त्री' शिक्षणासाठी लढा दिल्याने स्त्रियांना सर्वच क्षेत्रात पाय रोवून आत्मविश्‍वासाने उभे राहता येते. परंतु, पुरुषप्रधान संस्कृतीची मानसिकता अद्याप मोडून काढता आली नाही. कुटुंब, नोकरी आणि सामाजिक स्तरावर अजूनही तिला स्वतःला सिद्ध करावे लागते. नागपुरातील निशा, शबीना आणि कुमारी जनकातन या तिघीही आपापल्या स्तरावर संघर्ष करीत आहेत. विविध घटकांतील स्त्रियांचे प्रतिनिधित्व या महिला करीत असून, यांच्यासारख्या हजारो स्त्रिया आत्मसन्मानाचा लढा देत आहेत. त्यांचा संघर्ष पाहता, वास्तविक जीवनात पूर्णतः "स्त्री मुक्त' झाली का, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

हे वाचाच - पावसाचे पाणी शिरले आणि हे बाहेर आले...

"निशा'ने सांभाळली जबाबदारी

डोईवरचा पदर थेट हनुवटीपर्यंत ठेवण्याची पद्धत ज्या समाजात आहे त्या समाजातील निशा मोहनसिंग भाटी या तरुणीने पुढाकार घेत आरोग्य क्षेत्रातील पुरुषांची मक्‍तेदारी असलेल्या "महिला स्वच्छता निरीक्षकाची' जबाबदारी सांभाळण्याचे धाडस दाखवले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम. त्यात चार बहिणी, अशा परिस्थितीत निशाने एम.एससी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. उच्चशिक्षित निशाने स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळविले. नागपूरमधील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात स्वच्छता निरीक्षकपदी तिची निवड झाली. रुग्णालयातील स्वच्छता निरीक्षकाचे काम करायचे नाही, असा सूर कुटुंबात व नातेसंबंधात उमटत असूनही निशाने जबाबदारी स्वीकारली. अपुऱ्या मनुष्यबळात रुग्णालयाची स्वच्छता, दररोजची नवी जबाबदारी सांभाळत तिने स्वत:ची ओळख निर्माण केली.

हक्काच्या घरासाठी शबिनाचा संघर्ष

शबीना अवघ्या वीस वर्षांची. उच्चभ्रू कुटुंबातील मुली ज्या वयात महाविद्यालयीन फॅशनवर गप्पा करतात त्या वयात शबीनाच्या मांडीवर दोन लेकरं खेळत आहेत. इतक्‍या कमी वयात, दोन मुलांची आई झालेल्या शबिनाला नवऱ्याने घरातून बाहेर काढले. माहेरची परिस्थिती जेमतेम अशा परिस्थिती कुठे जाणार म्हणून तिने मुस्लिम महिला मंचचे दार ठोठावले. महिला मंचच्या सदस्यांनी मध्यस्थी केली असता, शबिनाचा नवरा तिला घरात घेण्यास तयार नव्हता. अशा वेळी शबीनानेच स्वतः खंबीर होत घराचा ताबा घेतला. व्यसनी नवऱ्याला घराबाहेर काढून, घराची जबाबदारी स्वत:वर घेतली. अत्यंत पडक्‍या अवस्थेत असलेल्या घरात हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढून तिने परिस्थितीवर मात केली. इतक्‍या कमी वयात शबिना एकटीच घर, मुले आणि दोन वेळेच्या जेवणासाठी संघर्ष करीत आहे.

सामाजिक स्तरावर कुमारी जमकातन यांचा लढाघरातील पुरुषांच्या परवानगीशिवाय दाराबाहेर पाऊल ठेवण्याची परवानगी नाही, अशा समाजातील स्त्री पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध बंड करून उठते. त्यासाठी पदवीधर होते आणि समाजातील इतर स्त्रियांना न्याय हक्क मिळवून देते, ती गडचिरोली जिल्ह्यातील कोरची गावची कुमारीबाई जमकातन, स्त्री सक्षमीकरणासाठी आज भारतभर फिरून व्यासपीठ गाजवत आहे. पंधराव्या वर्षी लग्नबंधनात अडकलेल्या कुमारीबाईं मागास समाज, पुरुषप्रधान संस्कृती, गावातील स्त्रियांची होत असलेली कुचंबणा, त्यांच्यावर सतत होणारा अन्याय सहन करताना, "आम्ही आमच्या आरोग्यासाठी' संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केले.

आदिवासी स्वशासन कायद्याअंतर्गत कुमारीबाईंनी स्त्रियांचा जातपंचायतीतील सहभाग वाढवण्यासाठी कार्यनियोजन तयार केले आणि अखेर कोरची गावातील घराच्या पावतीवर पती-पत्नीचे नाव घालण्यास तसेच मुलाच्या नावामागे आईचे नाव हवे, अशी आग्रही भूमिका घेतली. आम्ही घराकरिता कष्ट करतो, मग संपत्तीतला वाटा नावावर का नको? मागणी मान्य झाली नाही तर जिल्हा पातळीवर तक्रार करू, त्यांनी थेट धमकीच त्या ग्रामसेवकाला दिली आणि त्याचा योग्य परिणाम झाला. कोरची ग्रामपंचायतीतील कागदपत्रात घरमालक म्हणून पत्नीचेही नाव पतीबरोबर नोंदवण्यात आले. कुमारीबाई जमकातन या यादीतील पहिल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman is still fighting the battle of existence