योगाभ्यासाने करा कोरोना संकटावर मात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जून 2020

नवीन बदलांशी जुळवून घेताना अनेक आव्हाने समोर येत आहेत. कोरोना संकटावर योग क्रियेतून कशा पद्धतीने मात करता येऊ शकते याबाबत योगतज्ज्ञ डॉ. अंजली जोशी यांनी मार्गदर्शन केले आहे.

नागपूर : कोविड 19 च्या प्रकोपामुळे प्रत्येकाचे आयुष्य प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभावित झाले आहे. लॉकडाऊन संपून आयुष्य पुन्हा रुळावर येताना, नवीन बदलांशी जुळवून घेताना अनेक आव्हाने समोर येत आहेत. कोरोना संकटावर योग क्रियेतून कशा पद्धतीने मात करता येऊ शकते याबाबत योगतज्ज्ञ डॉ. अंजली जोशी यांनी मार्गदर्शन केले आहे.
या काळात स्त्रियांसाठी घरकाम, सर्वांची काळजी घेणे, वर्क फ्रॉम होम, झूम मीटींग्स, आवश्‍यक सेवेत असल्यास कामावर जाणे, यामुळे हा काळ परीक्षा घेणारा ठरतोय. अशा परिस्थितीत भीती, मानसिक तणाव, नैराश्‍य, अनिश्‍चितता, राग, चिडचिड, गोंधळून जाणे हे सर्व स्वाभाविक आहे. या संकटाशी लढताना सुरक्षिततेसाठी आवश्‍यक निर्देश पाळण्याबरोबरच आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणं महत्वाचं आहे.
काय करता येईल?
शारीरिक व्यायाम, पुरेशी शांत झोप आणि पोषक आहार ही स्वस्थ जीवनाची त्रिसूत्री आहे. जिम बंद असले तरी घरच्या घरीच योगाभ्यास सहजपणे करता येतो. योगामुळे रोगप्रतिकारक शक्ती, आणि श्वसनसंस्थेची कार्यक्षमता वाढते. मानसिक तणाव, चिंता, असुरक्षितता, नैराश्‍य या समस्यांवर योग प्रभावी आहे.
संयुक्त राष्ट्र, हार्वर्ड युनिवर्सिटी आणि आयुष मंत्रालयाने कोरोना संसर्गापासून बचावासाठी योगाची शिफारस केली आहे. तसेच यातून बरे झालेल्या रुग्णांना उपचार सुरू असताना योगाचा खूप फायदा झाला असे दिसून आले आहे.
दररोज कमीतकमी तीस मिनिटे योगाभ्यास करावा. मात्र यासाठी योगशिक्षकांचे मार्गदर्शन घेणे आवश्‍यक आहे, कारण काही आसने आणि प्राणायाम पाठदुखी, उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा इतर आजार असल्यास अपायकारक ठरू शकतात.
उपयुक्त योगाभ्यास
सूक्ष्म व्यायाम करून शरीरातील स्नायू आणि सांधे मोकळे करावेत. ताडासन, तिर्यक ताडासन, कटीचक्रासन, अर्धचक्रासन, हस्तपादासन, पर्वतासन, मार्जारासन ही आसने केल्यास पाठीच्या कण्याची सर्व बाजूंनी हालचाल होते आणि उत्साह, कार्यक्षमता वाढते. भुजंगासन, धनुरासन, उष्ट्रासन या आसनांत छातीचा भाग ताणल्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. तसेच थकवा, मरगळ कमी होऊन उर्जा वाढते. सिंहासन आणि जिव्हाबंध केल्यामुळे घशाचे आरोग्य चांगले राहते. पवनमुक्तासन, सेतुबंधासन, मंडूकासन, नौकासन इत्यादि आसने शारीरिक क्षमतेनुसार करावीत. शशांकासन, पश्‍चिमोत्तानासन या आसनांमुळे मन शांत होते. आसनांच्या शेवटी शवासन, मकरासन करून विश्रांती घ्यावी.
शुद्धिक्रिया
जलनेती केल्याने श्वसनमार्ग स्वच्छ होऊन ऍलर्जी तसेच संसर्गापासून बचाव होतो. कपालभातीच्या अभ्यासाने श्वसनमार्गातील अडथळे दूर होतात.
प्राणायाम
भस्त्रिका प्राणायामाने शरीरातील घातक पदार्थ श्वासावाटे निघून जातात. दीर्घश्वसन केल्यास फुफ्फुसांची क्षमता वाढते. उज्जायी, अनुलोमविलोम, भ्रामरी प्राणायाम मन शांत करण्यासाठी लाभदायक आहेत.
ध्यान
रोज थोडा वेळ ध्यान अवश्‍य करावे. त्यामुळे चिंता, काळजी, नैराश्‍य दूर होऊन मनोबल, उत्साह आणि उर्जा वाढते. ओंकार जप केल्यास नकारात्मक विचार निघून जातात आणि मानसिक तणाव कमी होतो.
योगनिद्रा
यामुळे शरीराला आणि मनाला पूर्ण विश्रांती मिळते. मन विचलित करणाऱ्या घटनांमधून सावरण्यासाठी योगनिद्रा हा एक उपयुक्त अभ्यास आहे.

सविस्तर वाचा - उपराजधानीला मिळतेय ही नवी ओळख, वाचा हे जळजळीत वास्तव

दिवसभरात कधीही
विशेषत: संगणकावर किंवा फोनवर अधिक वेळ काम करीत असल्यास अधूनमधून ब्रेक घ्यावा. खुर्चीवर बसून थोडे स्ट्रेचिंग करावे. यामुळे पाठदुखीचा त्रास होणार नाही. डोळ्यांना विश्रांती द्यावी. डोळे बंद करून काही सेकंद फक्त श्वासांवर लक्ष द्यावे. मन शांत होऊ लागेल आणि मानसिक तणावही कमी होईल.
योगामध्ये कोलाहलातून शांततेकडे, अंधारातून प्रकाशाकडे, आणि वेदनेतून आनंदाकडे नेण्याचे सामर्थ्य आहे. हे संकट काही दिवसात निघून जाईल, अशा दृष्टिकोनासोबत योग स्वीकारल्यास कठीण परिस्थितीला धैर्याने तोंड देणे सहज शक्‍य आहे. त्यासाठी आता थोडा धीर ठेवला तर पुढे जीवन एक उत्सवच आहे, अशी आशा करायला हरकत नाही..!!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yoga for corona relief