तुम्हीच सांगा जी...निदानच झाले नाही तर उपचार कसे होणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

मेंदूतील सूक्ष्म आजारांचे निदान करण्यासाठी मेडिकलच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून रुग्णांना "सीटी स्कॅन' किंवा "एमआरआय' तपासणीसह सोनोग्राफी किंवा एक्‍स रे काढण्यासाठी येथील 86 क्रमांकाच्या खोलीत अर्थात एक्‍स रे विभागात रेफर करतात. मेडिकलशी संलग्नित असलेल्या एक्‍स रे विभाग, ट्रॉमा केअर युनिट आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अशा तीन ठिकाणी तीन सीटी स्कॅन यंत्र आहेत. तिन्ही यंत्र सुरळीत सुरू आहेत. यातील एखादे सीटी स्कॅन बंद असेल तर इतर दोन यंत्रावर तपासणी होणे अपेक्षित आहे.

नागपूर :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दीड महिन्यापूर्वी वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी धडक दिली होती. यावेळी येथील एक्‍स-रे विभागात असलेली प्रतीक्षा यादी संपवण्याचे आदेश दिले. सीटी स्कॅन, एमआरआयसाठी आलेल्या रुग्णांचे तत्काळ सीटी किंवा एमआरआय होणे आवश्‍यक आहे, परंतु संचालकांच्या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. बाह्यरुग्ण विभागातून सीटी स्कॅनसाठी रेफर केलेल्या रुग्णांना 20 दिवसांनंतरची तारीख दिली जाते. यामुळे संतप्त झालेले नातेवाईक म्हणतात, असो वैद्यकीय संचालक महोदय, आता तुम्हीच सांगा, निदानच झाले नाही, तर उपचार होतील कस? हा तर आमच्या जीवाशी खेळ आहे, यावर प्रशासनाजवळ उत्तर नाही.

ब्रेकिंग - पती-पत्नीने घेतले विष आणि...

मेंदूतील सूक्ष्म आजारांचे निदान करण्यासाठी मेडिकलच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून रुग्णांना "सीटी स्कॅन' किंवा "एमआरआय' तपासणीसह सोनोग्राफी किंवा एक्‍स रे काढण्यासाठी येथील 86 क्रमांकाच्या खोलीत अर्थात एक्‍स रे विभागात रेफर करतात. मेडिकलशी संलग्नित असलेल्या एक्‍स रे विभाग, ट्रॉमा केअर युनिट आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अशा तीन ठिकाणी तीन सीटी स्कॅन यंत्र आहेत. तिन्ही यंत्र सुरळीत सुरू आहेत. यातील एखादे सीटी स्कॅन बंद असेल तर इतर दोन यंत्रावर तपासणी होणे अपेक्षित आहे. परंतु, डॉक्‍टरांकडून इतरत्र तपासणीसाठी टाळाटाळ केली जाते. त्यातच मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात तपासण्यात आलेल्या रुग्णांना 20 दिवसांची तर वॉर्डात भरती असलेल्या रुग्णांना 7 दिवसांनंतर सीटी स्कॅन काढण्याची तारीख दिली जाते. एवढ्या मोठ्या कालवधीनंतर "सीटी स्कॅन'ची तारीख दिल्यानंतर या रुग्णावर अचूक उपचार सुरू कधी करणार अशी विचारणा संबंधित रुग्णांनी केली आहे.

वैद्यकीयमंत्र्यांनी घ्यावा पुढाकार

दीड महिन्यापूर्वी वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी या विभागात भेट दिल्यानंतर येथील अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने उपाययोजना करून प्रतीक्षा यादी संपवण्याचे आदेशही दिले होते. परंतु, प्रतीक्षा यादी संपण्याऐवजी ती वाढत आहे. यामुळे मेडिकल प्रशासनाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संचालकांनी प्रत्येक रुग्णांना सीटी स्कॅनचे अहवाल सीडीमध्ये देण्याची सूचना केली. परंतु, रुग्णांनी मागणी केल्यावरच सीडीतून अहवाल दिले जात आहे. जे अहवाल एचएमआयएसवर आहेत, ते बघता येतात, परंतु तेथे बघता येत नाही, अशा रुग्णांना सीडी देण्यात यावी. मात्र, यालाही हरताळ फासला आहे. आता वैद्यकीयमंत्री अमित देशमुख यांच्याकडे तक्रार करायची का? असा सवाल नातेवाइकांनी केला आहे.

प्रतीक्षा यादी संपवण्यासाठी प्रयत्न सुरू
वॉर्डातील रुग्णांचा गरजेनुसार तत्काळ वा दुसऱ्या दिवशी सीटी स्कॅन काढला जातो. मात्र, बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांना दहा ते पंधरा दिवस सीटी स्कॅन काढण्याची प्रतीक्षा करावी लागते. दोन ते तीन दिवस यंत्र तांत्रिक कारणाने बंद होते. प्रतीक्षा यादी संपवण्यासाठी प्रयत्न केले जातील. रुग्णांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.
प्रा. डॉ. आरती आनंद, विभागप्रमुख, क्ष-किरणशास्त्र विभाग, मेडिकल.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You tell me ... if you are not diagnosed, how will you be treated?