दुर्दैवी! नागपुरातील युवा क्रिकेटपटूचं कोरोनानं निधन; विदर्भानं गमावला ऑल राऊंडर खेळाडू

सेंट झेव्हियर्स स्कूल हिंगण्याचा विद्यार्थी राहिलेल्या कुणालने उमेदीच्या काळात रामदासपेठ युथ स्पोर्ट्स क्लब तसेच सेंट्रल इंडिया स्पोर्ट्स फाऊंडेशन (सीआयएसएफ) कडून खेळताना स्थानिक स्पर्धेतील अनेक सामने गाजविले होते.
सेंट झेव्हियर्स स्कूल हिंगण्याचा विद्यार्थी राहिलेल्या कुणालने उमेदीच्या काळात रामदासपेठ युथ स्पोर्ट्स क्लब तसेच सेंट्रल इंडिया स्पोर्ट्स फाऊंडेशन (सीआयएसएफ) कडून खेळताना स्थानिक स्पर्धेतील अनेक सामने गाजविले होते.

नागपूर : विदर्भाच्या १५ वर्षांखालील संघाचे कर्णधारपद भूषविलेला माजी क्रिकेटपटू कुणाल शिरीष लोणकरचे कोरोनामुळे बुधवारी निधन झाले. तो केवळ ३३ वर्षांचा होता. त्याच्या पश्चात पत्नी व पाच वर्षांचा मुलगा आहे. दाभा येथील रहिवासी असलेला कुणाल कोरोनामुळे आठवड्याभरापासून आजारी होता.

सेंट झेव्हियर्स स्कूल हिंगण्याचा विद्यार्थी राहिलेल्या कुणालने उमेदीच्या काळात रामदासपेठ युथ स्पोर्ट्स क्लब तसेच सेंट्रल इंडिया स्पोर्ट्स फाऊंडेशन (सीआयएसएफ) कडून खेळताना स्थानिक स्पर्धेतील अनेक सामने गाजविले होते. मधल्या फळीतील फलंदाज व पार्टटाईम ऑफस्पिनर कुणालसाठी २००१ ते २००५ हा काळ चांगला राहिला होता. 

स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढल्यानंतर त्याला बीसीसीआयच्या स्पर्धेत पहिल्यांदा विदर्भाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत त्याने १५ व १७ वर्षांखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व केले. शिवाय २००३-०४ च्या मोसमातील पॉली उम्रीगर चषक स्पर्धेत विदर्भाच्या १५ वर्षांखालील संघाचे नेतृत्वही केले.

त्या स्पर्धेत कुणालने भिलवारा येथे यजमान राजस्थानविरुद्ध शानदार १४९ धावा ठोकून निवडकर्त्यांचे लक्ष वेधले होते. त्या आक्रमक खेळीच्या जोरावर शारजा येथे होणाऱ्या १५ वर्षांखालील आशिया चषकासाठी त्याची बंगळूर येथील भारतीय संघाच्या निवड चाचणीसाठी निवड करण्यात आली होती. चाचणीतही त्याने चांगली कामगिरी केली होती. दुर्दैवाने भारतीय संघात त्याला स्थान मिळू शकले नाही. त्यानंतर १७ वर्षे वयोगटातही त्याने विदर्भाचे प्रतिनिधित्व केले. 

वडिलांच्या निधनानंतर त्याची क्रिकेटमधील आवड कमी झाली. गझदर लीगमध्ये तो नवनिकेतन क्रिकेट क्लबकडून खेळायचा. कुणालच्या रुपात विदर्भाने युवा क्रिकेटपटू गमावला आहे. त्याच्या अकाली निधनाने क्रिकेट वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, व्हीसीएने क्रिकेटपटूंच्या खासगी उपचारासाठी पुढाकार घेऊन पॉलिसी सुरू करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com