इंस्टाग्रामवरील प्रेमासाठी अल्पवयीन मुलीने सलग दोन दिवस केला ९०० किमीचा प्रवास; मोबाईलवरून मिळायचे निर्देश

young girl from Katol left the house for boyfriend
young girl from Katol left the house for boyfriend

नागपूर : इंस्टाग्रामवर बिहार येथील तरुणासोबत अल्पवयीन मुलीची मैत्री झाली. तरुणाला भेटण्यासाठी मुलगी घर सोडून बिहारला निघाली. काटोल पोलिसांनी समयचुकता दाखवित १३ वर्षीय मुलीला उत्तरप्रदेशातील गोंडा येथून ताब्यात घेतले. तिचे समुपदेशन करून कटोलला परत आणले व  पालकांच्या स्वाधीन केले. मुलगी घरी परतल्यानंतर कुटुंबीयांनी काटोल पोलिसांची मनापासून आभार मानले.

काटोल तालुक्यातील छोट्याशा गावात ही अल्पवयीन मुलगी राहते. मुलीला ऑनलाईन शिक्षणासाठी आई-वडिलांनी दोन महिण्यांपूर्वी स्मार्टफोन घेऊन दिला होता. फावल्या वेळेत मुलगी सोशल मीडियाचा वापर करीत होती. एकदिवस इंस्टाग्रामवर बिहार येथील तरुणाशी तिची ओळख झाली. मुलीच्या अज्ञानतेचा फायदा घेत तरुणाने २५ जानेवारीला बिहार येथे बोलावले.

याच दिवशी दुपारी तीन वाजता मुलगी बिहारसाठी रवाना झाली. काटोल बस स्थानकावरून नागपूर, नागपूर येथून येरणकुलम एक्सप्रेसने येरणकुलमसाठी रवाना निघाली. रात्री उशिरापर्यंत मुलीचा शोध घेऊनही दिसून न आल्याने पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ठाणेदार महादेव आचरेकर यांनी मुलीजवळ असलेल्या मोबाईलचे ‘लाईव्ह लोकेशन’ घेऊन वडिलांसह चमूला मुलीच्या शोधार्थ हुशंगाबाद येथे पाठवले.

मोबाईल लोकेशनच्या आधारावर पोलिस मुलीचा पाठलाग करीत होते. मध्येच तिचा मोबाईल फोन बंद झाल्याने लाईव्ह लोकेशन पोलिसांना मिळने बंद झाले. त्यामुळे पोलिस बेचात पडले. मात्र, अडीच तासांनंतर पुन्हा मोबाईल सुरू होताच पाठलाग सुरू केला. आचरेकर यांनी दुसरी चमू तयार करून नागपूर येथून बिहारला जाणाऱ्या रेल्वेची माहिती काढली. या रेल्वेमधील एका डब्यात अल्पवयीन मुलगी प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली.

रेल्वेगाडीचे लोकेशन काढले असता तिचा पुढील थांबा हा उत्तरप्रदेशातील गोंडा हे असल्याचे समजले. तोच तेथील रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून मुलीचा शोध घेण्यास कळविण्यात आले. रेल्वे पोलिसांनी बोगीची तपासणी केली असता अल्पवयीन मुलगी प्रवास करीत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांसह पालकांचा जीव भांड्यात पडला.

तरुण देत होता सूचना

मुलगी सलग दोन दिवस व ९०० किमीचा प्रवास बिहार येथील मुलाच्या सूचनेवरून करीत होती. तरुणाने तिला बिहार येथील समस्तीपूर येथे बोलावले होते. घर सोडल्यापासून तर पोलिसांनी ताब्यात घेतपर्यंत ही मुलगी त्याच्याच सूचनांचे पालन करीत होती. मात्र, काटोल पोलिसांनी समचसुचकता दाखवून उद्भवणारा धोका वेळीच संपविला. मुलगी पालकांच्या स्वाधीन करण्यात आले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रृ तरळत होते.

पालकांनो, व्हा सावधान

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळांनी ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा स्वीकार करून ऑनलाईन अध्यापणाचे काम केले. त्यामुळे केजीपासून ते पीजीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग मोबाईलवरच भरले. यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातात मोबाईल आला. दिवसभर मोबाईल हातात राहत असल्याने समाजमाध्यमाची चटक लागली. या समाज माध्यमातून अल्पवयीन मुलांच्या फसवणुकीचे गुन्हे घडत आहे. पालकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com