तुझ्या मित्रासोबत अनैतिक संबंध नाहीत, पत्नी वारंवार सांगायची; परंतु याच्या डोक्‍यात वेगळाच विचार, एक दिवस... 

अनिल कांबळे
सोमवार, 13 जुलै 2020

प्रमोद उदापुरे मूळचा भंडारा जिल्ह्यातील धनोळ या खेड्यातील आहे. तो कामधंदा शोधण्यासाठी नागपुरात आला होता. तो गेल्या वर्षीपासून कळमना मार्केटमध्ये हमाल म्हणून काम करीत होता. त्याच्यासोबत आरोपी सतीश ऊर्फ दादू वाघमारे (वय 25) साहिल आणि अंकित यांच्याशी ओळख झाली.

नागपूर : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने एकाने दोन मित्रांच्या मदतीने शेजाऱ्याचा खून केला. त्याला रेल्वेच्या पुलावरून रेल्वे रूळावर फेकले. ही थरारक घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजता कळमन्यात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. प्रमोद तेजराम उदापुरे (वय 35, रा. चिखली झोपडपट्टी, कळमना) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद उदापुरे मूळचा भंडारा जिल्ह्यातील धनोळ या खेड्यातील आहे. तो कामधंदा शोधण्यासाठी नागपुरात आला होता. तो गेल्या वर्षीपासून कळमना मार्केटमध्ये हमाल म्हणून काम करीत होता. त्याच्यासोबत आरोपी सतीश ऊर्फ दादू वाघमारे (वय 25) साहिल आणि अंकित यांच्याशी ओळख झाली. चौघेही मजूर असल्यामुळे एकमेकांसोबत कामाला जात होते. तिघांनाही दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे सायंकाळी मजुरीचे पैसे हातात पडल्यानंतर त्यांची पावले थेट दारूच्या गुत्थ्याकडे वळत होती. 

ठळक बातमी - आई रडत रडत म्हणाली, बाळा पब्जी नको खेळू रेऽऽ नाही तर तू पण...
 

प्रमोद आणि सतीश एकमेकांच्या शेजारी राहत होते. प्रमोदची सतीशच्या पत्नीशी मैत्री होती. त्यामुळे दोघेही नेहमी बोलत होते. तीच बाब सतीशला खटकत होती. मात्र, तिने प्रमोदशी अनैतिक संबंध नसल्याचे अनेकदा पतीला सांगितले. परंतु, सतीशचा विश्‍वास बसत नव्हता. प्रमोदची पत्नीसोबत असलेली मैत्रीपूर्ण संबंध या खटकू लागले. याच कारणावरून गेल्या महिन्याभरापूर्वीच दोघांत वाद झाला होता. त्यावेळी प्रमोदने सतीशवर कैचीने हल्ला केला होता. चिडलेल्या सतीशला प्रमोदचा बदला घ्यायचा होता. 

शनिवारी रात्री दहा वाजेपर्यंत आरोपी सतीश, अंकित, साहिल आणि प्रमोद यांनी दारू ढोसली. प्रमोदशी वाद उफाळून काढला आणि त्याच्यावर अचानक दगडाने हल्ला केला. अर्धमेल्या अवस्थेत प्रमोदला दुचाकीने कळमन्यातील रेल्वे ब्रीजवर नेले. तेथे ब्रीजवरून प्रमोदला फेकून देत त्याने आत्महत्या केल्याचा देखावा केला. रविवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी प्राथमिक खबरीवरून आत्महत्या समजून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

 

वस्तीत कुजबूज आणि पोलिसांचा नेम

 
प्रमोद उदापुरे याने रेल्वे ब्रीजवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची खबर परिसरात पसरली. त्यामुळे अनेकांनी पाहण्यासाठी गर्दी केली. पीएसआय अनिल इंगोले यांनी वस्तीत फोटो दाखवून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. वस्तीत प्रमोदचा खून झाल्याची चर्चा रंगली होती. कळमना पोलिसांनी हाच धागा हेरला आणि वस्तीत हेर सोडले. दोन तासात प्रमोदचा खून झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल केला आणि आरोपी सतीशला अटक केली. 

 

कौर्याची गाठली सीमा 

प्रमोदवर दगडाने हल्ला करण्यात आला. तसेच तिन्ही आरोपींनी लाथाबुक्‍क्‍यांनीही मारले. प्रमोद अर्धमेल्या अवस्थेत खाली पडला. परंतु, त्याला ठार मारण्याचा उद्देश असल्याने त्याला अर्धमेल्या अवस्थेत दुचाकीने चिखली रेल्वे पुलावर नेले. तेथून धावत्या रेल्वेसमोर फेकण्याचा बेत केला. मात्र, रुळावर फेकून आरोपींन पळ काढला. 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The young man was killed and thrown from the railway bridge