esakal | आई रडत रडत म्हणाली, बाळा पब्जी नको खेळू रेऽऽ नाही तर तू पण...
sakal

बोलून बातमी शोधा

Pubg victims increase in Nagpur

नागपुरात आजवर तब्बल नऊ जणांनी पब्जी गेमच्या वेळात आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काही पालकांशी यावर चर्चा केल्यानंतर हा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. चर्चेत पालकांच्या मनात असलेली भीती स्पष्टपणे दिसून आली. 

आई रडत रडत म्हणाली, बाळा पब्जी नको खेळू रेऽऽ नाही तर तू पण...

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : कोरोना आणि लॉकडाउन. यामुळे शाळा, महाविद्यालय बंद आहेत. काही सुरू झाले तरी पाल्यांना पाठवायला पालक तयार नाहीत. तसेच घराबाहेर पडण्यासही मनाई करण्यात आली आहे. यामुळे लहान मुलांना घरात राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दुसरीकडे कोरोनाच्या भीतीने युवकही बाहेर निघण्यास घाबरत आहेत. यामुळे टीव्ही आणि मोबाईलकडे त्यांचे सर्वाधिक लक्ष जात आहे. मोबाईल आणि आपण असेच त्यांचे समिकरण झाले आहे. यातही पब्जीची क्रेझ अधिकच वाढली आहे. पब्जी गेम खेळताना नैराश्‍यातून आत्महत्या करणाऱ्यांच्या घटनाही वाढल्या आहेत. यामुळे आई आपल्या मुलांना रडत रडत "बाळा पब्जी नको खेळू रेऽऽ नाही तर तू पण आत्महत्या करशील' असं म्हणत आपल दुख व्यक्‍त करीत असल्याचे दिसून आले. 

कोरोनामुळे घरात राहून राहून मुलांसह युवकळी कंटाळले आहेत. लॉकडाउन शिथिल झाले असले तरी वाढती रुग्ण संख्या पाहून अनेकजण घराबाहेर पडण्यास तयार नाहीत. यामुळे मोबाईल, टीव्हीवर सर्वाधित वेळ घालवला जात आहे. मात्र, मालिकांचे शूटिंग बंद असल्याने टीव्हीवरही पाहण्यासारख काही नाही. अशात एकच पर्याय उरतो तो म्हणजे मोबाईल...

हेही वाचा - या कॉंग्रेस नेत्यांची नवी पिढी राजकारणात सक्रिय

लहान मुलांना कोरोना विषाणूपासून वाचविण्यासाठी पालकही त्यांना मोबाईल देऊन घरातच राहण्यास सांगतात. आता तर टीकटॉकही बंद झाले आहे. यामुळे त्यांचा कल पब्जीकडे वळला आहे. पब्जी हा गेम धोक्‍याचा असल्याचे अनेकांना माहित नाही. गेम खेळताना नैराश्‍यातून अनेक मुलं आणि युवकांनी आत्महत्या केल्यानंतर पालकांनाही याची भीती वाटू लागली आहे. 

आता तर ते मुलांना "बाळा तू पब्जी तर खेळत नाही ना', असा प्रश्‍नच विचारत असल्याचे दिसून येत आहे. नागपुरात आजवर तब्बल नऊ जणांनी पब्जी गेमच्या वेळात आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काही पालकांशी यावर चर्चा केल्यानंतर हा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. चर्चेत पालकांच्या मनात असलेली भीती स्पष्टपणे दिसून आली. 

प्रकरण पहिले

रितिक किशोर ढेंगे (वय 20, जुना फुटाळा, अंबाझरी) हा पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेत होता. त्याचे शिक्षण शेवटच्या टप्प्यात होते. कोरोनाचा धोका असल्यामुळे पदवी सोडून तो नागपुरात आला होता. मात्र, रितिक एकाकी स्वभावाचा असल्यामुळे अनेकदा भावंडांसह गप्पा करण्याऐवजी एकटा रूममध्ये पब्जी खेळात रमायचा. अनेकदा तर रात्र रात्रभर त्याचा पब्जीचा गेम चालायचा. पब्जी खेळताना अनेकदा हार-जीत होत असल्याने तो मनाने खचत होता. त्यामुळे तो आठ-आठ दिवस नैराश्‍यात वागत होता. बुधवारी रितिकने सिलिंग फॅनला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

अधिक माहितीसाठी - अनिल देशमुख यांच्या बैठकीतून महिला सदस्याला बाहेर काढले अन्‌ प्रकरण पोहोचल अजित पवारांपर्यंत, काय असावा प्रकार...

प्रकरण दुसरे

फारीया निजाम पठाण (वय 19, रा. भोजापूर, ता. कुही) हिला काही दिवसांपासून मोबाईलचे वेड लागले होते. खेळता खेळता ती "पब्जी' गेम खेळायला लागली. त्यानंतर तिच्या वागणुकीत अचानक बदल व्हायला लागला. ती एकांतप्रिय झाली. तिचे पब्जीचे वेड वाढत गेले. घरच्या कुणालाही तिच्या या वेडाची कल्पना नसावी. ती सतत नैराश्‍यात राहायची. त्या नैराश्‍यातूनच तिने एक जुलैला दुपारी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता तिची प्रकृती बिघडली. आई-वडिलांनी तिला कुही ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता नेले. तेथील डॉक्‍टरांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तिला "रेफर' केले. तेथील डॉक्‍टरांनी फारियाला 2 जुलै रोजी मृत घोषित केले. 

प्रकरण तिसरे

निखिल पुरुषोत्तम पिल्लेवान (वय 22, रा. नेर, जि. यवतमाळ) हा स्व:भावाने अत्यंत शांत. तो पुणे येथील एका खासगी कंपनीत कामावर होता. बारावीपर्यंतचे शिक्षण गावाकडे पूर्ण करीत त्याने पुढील शिक्षण काम करून सुरू ठेवले होते. "लॉकडाउन'च्या आधी तो बी.ए. फायनलचे पेपर देण्यासाठी गावाकडे आला होता. तीन महिन्यांपासून हाताला कुठलेही काम नसल्यामुळे तो दिवस-रात्र पब्जी हा गेम खेळत होता. दररोज तब्बल सोळा सोळा तास तो मोबाईलवर गेम खेळायचा. या गेमच्या आहारी गेल्यामुळे त्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. पब्जी गेममुळे आत्महत्या केल्याची ही यवतमाळ जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

क्लिक करा - अमरावती शहरात सर्वत्र शुकशुकाट... नागरिकांमध्ये दहशत... काय आहे कारण

प्रकरण चौथे

शुभम लालाजी यादव (वय 24, रा. रमाईनगर, नारी रोड, कपिलनगर) हा बारावी झाल्यानंतर वडिलांना मदत म्हणून गॅरेजमध्ये काम करीत होता. सकाळी वडिलांसोबत गॅरेजमध्ये जाणे आणि त्यांच्यासोबतच घरी येणे, असा त्याचा नित्यक्रम होता. शुभमला मोबाईलवर पब्जी खेळण्याचे वेड होते. त्यामुळे वेळ मिळाल्यानंतर तो मोबाईलवर पब्जी खेळत होता. काही दिवसांपासून शुभम तणावात होता. मात्र, त्याकडे कुटुंबाचे लक्ष गेले नाही. अशातच त्याने गळफास लावून आत्महत्या केली. शुभम सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

प्रकरण पाचवे

साक्षी जांबुवंतराव शेंदेकर (वय 19, रा. श्‍यामनगर, हुडकेश्‍वर रोड, नागपूर) ही बिंझाणी कॉलेजमध्ये बी.ए. पदवीच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती. तिला लहान भाऊ बारावीत शिक्षण घेतो. घरी स्मार्टफोन विकत घ्यावा म्हणून दोघेही बहीण-भावाने वडिलांकडे तगादा लावला होता. मुलांच्या हट्टापोटी वडिलांनी महिनाभरानंतर घरात स्मार्टफोन घेतला. साक्षी आणि तिचा भाऊ आळीपाळीने मोबाईल वापरत होते. काही दिवसांपासून दोघे बहीणभावात मोबाईलसाठी भांडत सुरू होते. भावाला पब्जी गेम खेळायचा होता. त्यामुळे तो मोबाईल द्यायला तयार नव्हता. अशात बहिणीने विष प्राशन करून आत्महत्या केली. भावाला पब्जी खेळायचे असल्याने बहिणीचा जीव गेला.

जाणून घ्या - पावसाबाबत प्रादेशिक हवामान विभागाने दिला इशारा, वाचा काय होणार...

प्रकरण सहावे

9 नोव्हेंबर 2019 रोजी अर्पिता रजत गुप्ता (वय 19, रा. साईबाबानगर) या युवतीने पब्जीमधून नैराश्‍य आल्याने आत्महत्या केली होती. अनेकांना असलेले पब्जीचे वेड मानसिकतेवर परिणाम करणारे आहे. सतत मोबाईलमध्ये डोके खुपसून खेळण्यात येणाऱ्या पब्जीमुळे एका 17 वर्षीय मुलीचे डोळे खराब झाले होते. उपराजधानीत आजवर नऊ जणांनी आत्महत्या केली आहे. 

आता तर भीतीच वाटते 
शहरात पब्जी गेम खेळणारे मुलं आत्महत्या करीत असल्याचे भीतीच वाटते. मुलांना मोबाईल घेऊन तर दिले, आता मात्र कशाला घेऊन दिला असाच प्रश्‍न मनात घर करतो. काळी वेळ मुलगा दिसला नाही तर अनेक प्रश्‍न मनात उपस्थित होतात. काही वाईट तर झाले नसेल ना या विचाराने मन अस्वस्थ राहते. 
- संजय इंगोले 

मी तर मोबाईलच हिसकावून घेतला 
पब्जी गेम खेळणारे मुलं आत्महत्या करीत असल्याच्या बातम्या वर्तमान प्रत्रात वाचल्या. यामुळे मुलाला गेमच डिलिट करायला सांगितला होता. परंतु, काही दिवसांनी तो परत हा गेम खेळताना दिसला. मुलगा काही केल्या पब्जीपासून दूर जात नसल्याने मोबाईलच हिसकावून घेतला. आता थोड मनाला बर वाटत आहे. 
- राजेश पावणे

मुलांना अशा गेम्सपासून लांब ठेवा 
मोबाईलवरील ऑनलाइन विविध ऍप्स आणि गेम्स हे व्यक्तीला चटकन व्यसनात पाडणारे असतात. भावनिक जाळं निर्माण करून त्यांचा वास्तवाशी संपर्क तोडून टाकतात. या भावनिक गुंतवणुकीमुळे व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडते. भावनेच्या भरात तो अपघातांना बळी पडतो. त्याला दुसरे कामं सांगितल्यास चिडचिड करतो. त्यामुळे पालकांनी मुलांना अशा गेम्सपासून लांब ठेवावे. काही लक्षणे आढळल्यास त्याचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. जेणे करून मुलावर मानसिक परिणाम होणार नाही. 
- डॉ. राजा आकाश, 
मानसोपचार तज्ज्ञ.