इथे गुण्यागोविंदाने राहतात "यंग सिनियर्स' 

नरेंद्र चोरे  
सोमवार, 6 जानेवारी 2020

एकाकी कुंठत आयुष्य जगणाऱ्या ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याच्या उद्देशाने 22 वर्षांपूर्वी (1997 मध्ये) हुकूमचंद मिश्रिकोटकर, प्रदीप डोंगरे व अन्य ज्येष्ठ नागरिकांनी सहकारनगर ज्येष्ठ नागरिक मंडळाची स्थापना केली.

नागपूर : आयुष्यभर अपार कष्ट केल्यानंतर उत्तरार्ध आनंदात व सुखात जावा, अशी प्रत्येकच ज्येष्ठ नागरिकाची इच्छा असते. मात्र, सर्वच ज्येष्ठ नागरिक याबाबतीत नशीबवान ठरत नाही. घरातील कलह व भांडणामुळे अनेकांच्या वाट्याला शेवटच्या क्षणापर्यंत दु:ख, कष्ट अन्‌ दारिद्य्र येते. अशा ज्येष्ठांसाठी सहकारनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ आधार व आशेचा किरण ठरले आहे. येथील विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून शेकडो ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद व आशेची नवी पहाट उजाडली आहे. येथील कौटुंबिक वातावरण आणि गुण्यागोविंदाने रात्रंदिवस एकत्र राहणारे "यंग सिनियर्स' पाहून तरुणाईलाही हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही.
 
एकाकी कुंठत आयुष्य जगणाऱ्या ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याच्या उद्देशाने 22 वर्षांपूर्वी (1997 मध्ये) हुकूमचंद मिश्रिकोटकर, प्रदीप डोंगरे व अन्य ज्येष्ठ नागरिकांनी सहकारनगर ज्येष्ठ नागरिक मंडळाची स्थापना केली. कालांतराने एकेक जण मंडळाशी जुळत गेला आणि पाहता पाहता हे छोटेसे रोपटे वटवृक्षात रूपांतरित झाले. सध्याच्या घडीला 110 महिलांसह साडेपाचशेच्यावर या मंडळाचे सदस्य आहेत.  

माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या फंडातून येथे बांधण्यात आलेल्या नागपुरातील पहिल्यावहिल्या विरंगुळा केंद्राने या मंडळाला नवी ओळख दिली. प्रशस्त पटांगण, वाचनालय, शंभर आसनक्षमता असलेली बैठक खोली, आदी वैशिष्ट्य असलेल्या या मंडळातर्फे ज्येष्ठांच्या कल्याणासाठी वर्षभर विविध कौटुंबिक व सामाजिक उपक्रम नियमितपणे राबविले जातात. 

जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन असो किंवा मंडळाच्या ज्येष्ठांचे वाढदिवस. आरोग्य शिबिरे असोत किंवा विदर्भभर सहली. ज्येष्ठांच्या मनोरंजनासाठी विविध कौटुंबिक कार्यक्रमांचे येथे आयोजन केले जाते. फावल्या वेळात परिसरातील ज्येष्ठ मंडळी कॅरम, बुद्धिबळासह विविध खेळ खेळून स्वत:चे मनोरंजन करीत असतात.

नाटके, ऑर्केस्ट्रा, गीत-संगीताच्या कार्यक्रमांसह विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिन, दिवाळी पहाट, चर्चासत्र, सल्ला व मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिरे आदी कार्यक्रमांचा यात प्रामुख्याने समावेश असतो. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी वेळोवेळी तज्ज्ञ मान्यवरांकडून आरोग्य तपासणी व "काउन्सलिंग' केले जाते. तसेच तज्ज्ञ मान्यवरांना आमंत्रित करून चांद्रयान मोहीम व कलम 370 सारख्या विषयांवरही ज्येष्ठांना माहिती दिली जाते. 

केवळ मनोरंजनपर कार्यक्रमच नव्हे, पर्यावरण व स्वच्छता अभियानासारख्या सामाजिक उपक्रमातही ज्येष्ठ मंडळी योगदान देत असतात. वेळप्रसंगी गोरगरीब विद्यार्थी व नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांनाही ज्येष्ठांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मंडळाचे सदस्य शुल्क नाममात्र 60 रुपये आहे.

सविस्तर वाचा - घरी सुरू होती लग्नाची तयारी अन् कोसळले दुःखाचे डोंगर

या पैशातून कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. समाजातील दानशूर व्यक्‍तींकडून मिळणाऱ्या सहयोग राशीचाही मंडळाला मोठा आर्थिक हातभार लागतो. इतकेच नव्हे, फेस्कॉमच्या माध्यमातून ज्येष्ठ सदस्यांच्या घरांतील भांडणतंटे किंवा समस्याही सामंजस्याने सोडविल्या जातात. त्यांच्या मध्यस्थीमुळे उद्‌ध्वस्त झालेले असंख्य संसार अन्‌ कुटुंबे एकत्र आली आहेत. 

इतरांसाठी ठरले आदर्श

 एकमेकांवर असलेला विश्‍वास, प्रामाणिकता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि सहकार्याच्या भावनेमुळे मंडळाचे सदस्य प्रत्येक अडचणीवर सहज मात करतात. शहरात मोजकेच विरंगुळा केंद्र आहेत. त्यात सहकारनगर पहिल्या क्रमांकावर आहे. उपराजधानीत जवळपास ऐंशीच्या वर ज्येष्ठ नागरिक मंडळे व विरंगुळा केंद्र आहेत. पण, अशाप्रकारचे आदर्श विरंगुळा केंद्र शहरात एकमेव आहे. त्यामुळेच येथील ज्येष्ठांची "सेकंड इनिंग' सुखात व आनंदात जात आहे. शहरातील इतरही मंडळांनी यापासून बोध घेण्याची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young seniors" news in nagpur