खोटारडेपणावर प्रतिमा उभी, तुकाराम मुंढेंवर केले हे गंभीर आरोप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जून 2020

शनिवारपासून रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेत गेल्या तीन दिवसांपासून आयुक्तांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्या स्थगन प्रस्तावावर सुरू आहे. सलग तिसऱ्या दिवशी सत्ताधारी बाकावरील दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी आयुक्तांवर जोरदार प्रहार केले.

नागपूर : महापालिका आयुक्त कोरोनाच्या उपाययोजना, प्रतिबंधित क्षेत्रात फिरणे, स्मार्ट सिटी, मोमिनपुरा, सतरंजीपुरा आणि आता बांगलादेश भागातील कोरोनाच्या वाढत्या संख्येवरून सातत्याने खोटे बोलत आहेत. खोटारडेपणावरच त्यांची प्रतिमा उभी आहे, असा घणाघात सत्ताधारी बाकावरील ज्येष्ठ सदस्य दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके यांनी केला. मात्र, त्याचवेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ सदस्य प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना आता नियम आठवत आहे काय? असा टोला लगावला. 

शनिवारपासून रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेत गेल्या तीन दिवसांपासून आयुक्तांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्या स्थगन प्रस्तावावर सुरू आहे. सलग तिसऱ्या दिवशी सत्ताधारी बाकावरील दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी आयुक्तांवर जोरदार प्रहार केले. सायंकाळी स्थगित करण्यात आलेल्या या सभेत दयाशंकर तिवारी यांनी साडेतीन तासांच्या भाषणातून आयुक्त खोटारडे असल्याचा आरोप केला. मोमिनपुरा, सतरंजीपुरा आणि बांगलादेशबाबत आयुक्तांनी कथा रचल्या. ते जसे सांगेल तसेच प्रसारमाध्यमापुढे मांडले. 

असे का घडले? - भीषण अपघात : ट्रकने दुचाकीस्वाराला पाचशे मिटर नेले फरफटत; अंगावरचे कपडेही...
 

आयुक्तांनी नियमाचीच नव्हे तर संविधानाचीही पायमल्ली केली. प्रतिबंधित भागातील नागरिकांची गळचेपी, ही एक काळी बाजूही आयुक्तांची असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. सोशल मीडियावर अफवा पसरविल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने काही नागरिकांवर गुन्हे दाखल केले. आयुक्तांनीही सतरंजीपुरा, मोमिनपुरा या प्रतिबंधित क्षेत्रात फिरल्याचे खोटी माहिती सोशल मीडियावरून दिली. स्वतःवरही त्यांनी गुन्हे दाखल करून घ्यावे, असे ते म्हणाले. जे पाच रुग्णालये सुरू करून आरोग्य यंत्रणेत सुधारणा केल्याचा दावा आयुक्त करतात, त्याच आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या आत्मविश्‍वासाला त्यांनी तडे दिले. एवढेच नव्हे आरोग्य यंत्रणा सुधारणेसाठी तरतूद केलेल्या निधीतही मोठ्या प्रमाणात कपात केल्याचे आकडेवारीसह तिवारी यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. 

आमदार प्रवीण दटके यांनी आयुक्त देशाचे संविधानही मानत नसल्याचा आरोप केला. पालकमंत्री, महापौरांच्या बैठकीत बसायला त्यांना कमीपणा वाटतो. आयुक्तपदाचे अधिकार मिळाले तर बादशाह झालो, ही गुर्मी आयुक्तांमध्ये आहे, असा प्रहार त्यांनी केला. स्थायी समितीचेही अधिकार त्यांना मान्य नाही. कोविड सेंटरसाठी त्यांनी काढलेल्या निविदांची चौकशी करावी, अशी मागणी करीत त्यांनी त्यांच्यावरील आतापर्यंतच्या अविश्‍वासावरही बोट ठेवले. नगरसेवक चोर असल्याचे बाहेर सांगितले जात असून प्रत्येक कामाला तसेच आर्थिक बाबीतही प्रशासनाचीच मंजुरी असल्याचे नमूद करीत स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनीही आयुक्तांवर शरसंधान साधले. 

सत्ताधाऱ्यांना आता लोकशाहीचे स्मरण 

गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी विरोधी पक्षाची गळचेपी करीत असल्याचे संपूर्ण शहराने पाहिले. आता त्यांना लोकशाहीची आठवण होत असल्याचा टोला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी लगावला. स्थायी समितीने सर्वाधिक निधी सत्ताधाऱ्यांना वितरित केल्याचा आरोप करीत गुडधे यांनी निधी वाटपात भेदभाव केल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मनपाने उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण न केल्याने आज निधीची चणचण होत असून कामे रखडल्याचा आरोप करीत त्यांनी अप्रत्यक्षपणे आयुक्ताचा बचाव केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Your image is false, Serious allegations have been made against Tukaram Mundhe