घरी जायला निघाला, पण वाटेत नीलगायीचे शिंग घुसले गळ्यात; तरुणाचा मृत्यू

अनिल कांबळे
Tuesday, 24 November 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल डांगरकर हा गुरुवारी रात्री साडेआठ वाजता दुचाकीने घरी जात होता. लोणारा रोड, विटाभट्टीजवळून भरधाव जात असताना अचानक रस्त्यावर नीलगाय उभी झाली.

नागपूर : भरधाव दुचाकीस्वार तरुण रस्त्यावर उभ्या असलेल्या नीलगायीला धडकला. नीलगायीचे शिंग तरुणाच्या गळ्यात घुसले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. राहुल पुरुषोत्तम डांगरकर (३०, परदाशी, धापेवाडा, कळमेश्‍वर), असे मृत तरुणाचे नाव आहे. 

हेही वाचा - पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची शाळेला पाठ, कोरोनाच्या...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल डांगरकर हा गुरुवारी रात्री साडेआठ वाजता दुचाकीने घरी जात होता. लोणारा रोड, विटाभट्टीजवळून भरधाव जात असताना अचानक रस्त्यावर नीलगाय उभी झाली. राहुललाही काय करावे सुचले नाही. त्याने करकचून ब्रेक दाबले. परंतु ,तो नीलगायीवर जाऊन धडकला. नीलगायीने दुचाकीकडे मान केल्यामुळे तिचे शिंग राहुलच्या गळ्यात घुसले. त्याच्या गळ्यातून रक्त वाहत असतानाच मागून आलेल्या वाहनचालकांनी त्याला रुग्णालयात पोहोचवले. मात्र, सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास राहुलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

हेही वाचा - अमरावतीत मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती, तर...

पत्नीवर प्राणघातक हल्ला -
घराचे भाडे देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात पतीने पत्नीचे डोके फोडले. याप्रकरणी पोलिसांनी मिसाळ लेआऊट निवासी वर्षा बागडे (३५) च्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. आरोपी पती कन्हैया ध्रुवदास बागडे (३५) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घर भाडे देण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. बराच वेळपर्यंत दोघांची बाचाबाची सुरू होती. दरम्यान, कन्हैयाने घरात ठेवलेला दंडा उचलून वर्षावर हल्ला केला. डोक्यावर आणि हातावर मारून गंभीर जखमी केले. वर्षाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले. पोलिसांनी कन्हैया विरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth died in bike and nilgai accident in nagpur