झाडीपट्टीतील कलावंतांचे जगणे चितारणारा "झॉलिवूड'

natak
natak

नागपूर : पूर्व विदर्भासाठी अभिमानाची बाब मानली जाणारी "झाडीपट्टी रंगभूमी' नाट्यप्रेमींसाठी लोकप्रियच. शतकाची परंपरा झाडीपट्टी रंगभूमीला आहे. या रंगभूमीच्या इतिहासात असंख्य कलावंतांनी आपलं आयुष्य वेचलं. झाडीच्या कलावंतांनी पुर्वाधात लोकांचं मनोरंजन केलं आहे. परंतु आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र या "रंगभूमीसाठी त्याग करणारा सेवक' म्हणून नाते सांगणाऱ्या या कलावंतांना सरकारदरबारात कलावंतांला उपेक्षित राहावं लागतं. त्याच्या कलेसाठी जगण्याला नाकारलं जातं, हा धागा पकडून झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित "झॉलिवूड' हा चित्रपट तयार झाला आहे. लवकरच रसिकांच्या भेटीला तो येणार. आस्था व प्रेम असलेल्या खऱ्याखुऱ्या कलावंतांचे जगणे यातून चितारले गेले आहे.
"झॉलिवूड' या चित्रपटाचे दिग्दर्शन या रंगभूमीवरील कलावंत तृषांत इंगळे यांनी केले. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लॉंच करण्यात आले. पुर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया हा तसा मागासलेला भाग. परंतु या धानपट्ट्याला झाडीपट्टी रंगभूमीची समृद्ध अशा इतिहासाची किनार लाभली आहे. शेकडो कलावंतांचे जगवणारी ही रंगभूमी. या झाडीपट्टी रंगभूमीला झाडीपट्टी इंडस्ट्री करण्याच्या प्रयत्नातून कलावंतांचं जगणं त्यांच्या अभिनयानुसार समृद्ध झालं पाहिजे हे तृषांत इंगळे यांच्या दिग्दर्शनातून पुढे येणार आहे.
"न्यूटन', "सुलेमानी किडा' असे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केलेले अमित मसूरकर चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत. विशबेरी फिल्म्स यांनी "झॉलीवूड' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे, शाश्वत सिंग चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. दिग्दर्शक तृषांत यांनी या रंगभूमीबद्दल आस्था व प्रेम असल्याने झाडीपट्‌टी रंगभूमीचा विकास व्हावा या हेतूने झॉलिवूडची निर्मिती केली असून या प्रयत्नातून ही रंगभूमी आधुनिकतेच्या दिशेने प्रवास करेल असा विश्‍वास आहे, असे सांगितले.

कलावंतांच्या नावावर विकतात तिकिट

झाडीपट्टी रंगभूमीचा रसिक अतिशय चोखंदळ आहे. गावखेडयातील साध्या वाटणाऱ्या या रसिकांना नाटकातील संवाद पाठ असतात. एखाद्या गावात जुन्या संगीत नाटकाचा प्रयोग सुरू असताना एखादं पद चुकलं, किंवा एखादा प्रवेश बाद केला तर रसिक ओरडून सांगतात. कलावंतांचं काम आवडलं तर त्याला डोक्‍यावर घेतात आणि एखाद्याची भूमिका आवाडली नाही, तर नाटक संपल्यानंतर लगेचच तुमचा रोल जमला नाही भाऊ' असे थेट बोल सुनावतात. झाडीपट्टी रंगभूमीवर हसवणाऱ्या, रडवणाऱ्या कलावंतांच्या नावावर तिकिटं विकली जातात.
 कलावंतांची इंडस्ट्री
मी स्वतः झाडीपट्टीच्या नाटकांतून बालकलाकार म्हणून काम केलं आहे. विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. झाडीपट्टी रंगभूमी ही खऱ्या अर्थाने कलावंतांची इंडस्ट्री आहे. यामुळेच झॉलिवूड चित्रपट निर्मितीचा हा प्रयत्न केला. 16 व्या वर्षी मुंबई गाठल्यानंतर लेखन, कास्टिंग आणि दिग्दर्शनाचा अनुभव घेत "झॉलीवूड' हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अलिकडे झाडीपट्टीची व्यथा अनेक सांगतात. ही स्थिती बदलून झाडीपट्‌टी रंगभूमीचे वैभवशाली दिवस जुने दिवस परत यावे.
-तृषांत इंगळे, "झॉलिवूड' चित्रपटाचे दिग्दर्शक.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com