#ZPElectionResults : कॉंग्रेस-राष्ट्रवादीने केले नागपूर झेडपी काबीज

Congress-NCP seizes Nagpur ZP
Congress-NCP seizes Nagpur ZP

नागपूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने भाजपचा धुव्वा उडवत सुमारे साडेसात वर्षांनंतर जिल्हा परिषदेत जोरदार पुनरागमन केले. कॉंग्रेसने सर्वाधिक 30 तर राष्ट्रवादीने 10 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. सत्ताधारी भाजपला फक्त 15 जागांवर समाधान मानावे लागले. या निकालाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मोठा धक्का बसला आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आपल्या सावनेर मतदारसंघातील सर्व 9 जिल्हा परिषद व 18 पंचायत समिती जागांवर विजय मिळवून आपली ताकद दाखविली. दुसरीकडे स्वतंत्र लढणाऱ्या शिवसेनेची मात्र वाताहत झाली.

सुनील केदार यांनी त्यांच्या सावनेर मतदारसंघासह रामटेक व कामठी मतदारसंघाची जबाबदारी घेतली होती. या निवडणुकीसाठी त्यांनी संपूर्ण जिल्हा पालथा घातला. त्यात अपेक्षित यश मिळाले आहे. सावनेरसह ते कळमेश्‍वर, रामटेक, पारशिवनी, कामठी, मौदा व नागपूर ग्रामीणमध्ये कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर ग्रामीण तालुक्‍यात कॉंग्रेसने सहापैकी पाच जागांवर विजय मिळविला. अध्यक्षपदासाठी राखीव असलेले दोन जिल्हा परिषद सर्कल याच तालुक्‍यात आहेत. याशिवाय रामटेक, पारशिवनी, मौदा तालुक्‍यात तीन तर कामठी तालुक्‍यात दोन जिल्हा परिषद सर्कलमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. सावनेर व कळमेश्‍वरमध्ये एकही जागा कॉंग्रेस वगळता इतर पक्षाला मिळविता आली नाही. केळवदमधून माजी विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी भाजपचे गिरीश मोवाडे यांचा पराभव केला. वलनी सर्कलमधून प्रकाश खापरे विजयी झाले, त्यांनी भाजपचे अरुण सिंग व राष्ट्रवादीचे किशोर चौधरी यांचा पराभव केला.

उमरेड मतदारसंघात कॉंग्रेसचे आमदार राजू पारवे व जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी प्रचार केला होता. कॉंग्रेसला उमरेडमध्ये तीन, भिवापूरमध्ये दोन जागा मिळवीत कॉंग्रेसने शक्ती दाखवून दिली. महाआघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला कुही तालुक्‍यातील मांढळमधून विजय मिळवला. कुही तालुक्‍यात बंडखोरीचा फटका कॉंग्रेसला बसला. येथील तीन जागा कॉंग्रेसला गमावाव्या लागल्या. नरखेड तालुक्‍यातील जलालखेडा येथून कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याने माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांचेही वजन कायम राहिले.

काटोल तालुक्‍यातील राष्ट्रवादीने एक जागा शेकापसाठी सोडली होती. येथून शेकापचे समीर उमप निवडून आले. मात्र, कोंढाळीची जागा राष्ट्रवादीकडून भाजपने हिसकावली. कोंढाळीत राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर बंडखोरी झाली होती. राष्ट्रवादी 2 व शेकाप 1 अशा तीन जागा काटोलमध्ये आघाडीच्या खात्यात आल्या. नरखेड तालुक्‍यात तीन जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आल्याने चारही जागा आघाडीकडे आहेत.
कुही तालुक्‍यात भाजपने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करून तीन जागा जिंकल्या. येथील बंडखोरी शमविण्यासाठी बावनकुळे यांनी पुढाकार घेतला होता. भाजपचे सावनेर, कळमेश्‍वर, नरखेड, हिंगणा, नागपूर ग्रामीण तालुक्‍यात नुकसान झाले. बेला सर्कलमधून अपक्ष वंदना बालपांडे विजयी झाल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत कॉंग्रेसला 11 जागा तर राष्ट्रवादीला तीन जागांचा फायदा झाला आहे. भाजपला सहा जागांचे नुकसान झाले. तर शिवसेनेला 7 जागा गमवाव्या लागल्या. सेनेचा एकच सदस्य निवडून आला आहे. बसपने यावेळी जिल्हा परिषद निवडणूक लढविली नाही. मागील निवडणुकीत बसपच्या तीन जागा होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com