झुंड'ने बदलला त्यांच्या आयुष्याचा कॅनव्हास

Jhund
Jhund

नागपूर : विशी-पंचविशीच्या उंबरठ्यावरची तरुण मुलं. व्यसनांच्या विळख्यात सापडलेली. रात्री चौकात बसून झिंगणारी मुलं. त्यांचं आयुष्य एका बंदिस्त चौकटीत होतं. परंतु नागपुरात नागराज मंजुळे दिग्दर्शित "झुंड' चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आणि चौका-चौकात "नाइट लाइफ' जगण्याचा मनसोक्त आनंद लुटणाऱ्या या मुलांना अभिनय करण्याची संधी मिळाली आणि यांच्या आयुष्याचा कॅनव्हासच बदलला. "बिग बी' अर्थात अभियनाचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या "झुंड' चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला.
"झुंड' येत्या मे महिन्यात रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यात कॉटनमॉर्केटमध्ये हातात बॅट, रॉड, स्टॅम्प घेऊन झोपडपट्टीतील मुलांची टोळी हमला बोलण्यासाठी जात असल्याचे सूचक दृश्‍य दाखवण्यात आले. नेमकं हेच खरं आयुष्य जगणारी मुलं या चित्रपटात काम करीत होती. नशिले पदार्थ सहज यांना उपलब्ध होत असत. फेवीबॉंड, कफ सिरप, व्हाइटनर, आयोडेक्‍स यासारख्या वस्तूंचा वापर नशा येण्यासाठी केला जातो, हे व्यसनांच्या विळख्यात सापडलेल्या मुलांपासून लपलेले नाही. यामुळे मुलं क्षणिक उत्साह, क्षणिक एकाग्रता मिळते म्हणून एकदा घेतात, यातून व्यसनाच्या विखळ्यात सापडतात. पुढे आयुष्य उद्‌ध्वस्त होते. हीच बाब तीन ते चार दशकांपूर्वी प्रा. विजय बारसे यांनी ओळखली आणि झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल खेळाची "नशा' देत जगण्याची एक नवी "दिशा' दाखविली

अल्पावधीतच फुटबॉलच्या माध्यमातून अनेक गरीब व झोपडपट्टीतील तरुणांचे आयुष्य बदलविणारे अशी ओळख प्रा. बारसेंना मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना ख्याती प्राप्त झाली. यातूनच "झुंड' चित्रपटाची घोषणा "सैराट'कार नागराज मंजुळे यांनी केली. या चित्रपटाच्या शुटिंगला 4 डिसेंबर 2018 रोजी सुरुवात झाली. नागपूरच्या मोहननगर परिसरातील शाळेत शुटिंगला सुरुवात झाली. या चित्रपटाच्या रूपाने नागपूरची ओळख बॉलिवूडध्ये प्रस्थापित करण्याचे श्रेय नागराज मंजुळे यांच्याकडे जाते. तसेच बिग बी यांची एक झलक बघायला मिळेल या अपेक्षेने तरुणाई गर्दी करते, त्या बिग बी सोबत झोपडपट्टीतील मुलांना "झुंड' चित्रपटात हातात चहाची केटली घेऊन पोहोचवण्याची, बसण्याची, उठण्याची, दगड भिरकावण्यापासून फुटबॉल खेळण्याची संधी नागराज मंजुळे यांनी दिली. विशेष असे की, एका एका मुलाला वेचून आणण्याचे काम मंजुळे यांनी केले. अमिताभसोबत अभिनय करण्याची, त्यांना बघण्याची संधी मुलांना मिळाली, यातूनच मुलांच्या मनात व्यसनामुळे आलेले नैराश्‍य पार दूर झाले आणि बेरोजगार मुले आता रोजगाराकडे वळली. काही मुलांनी तर नागपूरचं बस्तान थेट मुंबईत हलवलं आहे.

स्लम सॉकरचे प्रणेते : बारसे ते मंजुळे
प्रा. विजय बारसे यांनी क्रीडा विकास मंचच्या माध्यमातून झोपडपट्टीतील तरुणाईला फुटबॉल स्पर्धांतून उंच आकाश कवेत घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली. स्लम सॉकरचे प्रणेते अशी बारसेंची ओळख निर्माण झाली. तर बारसे यांच्या आयुष्यावर चित्रपट करताना याच गल्लीबोळातील वाईट मार्गाला गेलेल्या अनेक तरुणांना "झुंड' चित्रपटात अभिनय करण्याची संधी नागराज मंजुळे यांनी संधी दिली. यातूनच मोहननगर, गड्डीगोदाम, गिट्टीखदान, कश्‍मिरी गली, गोलबजार भागात कधीकाळी झिंगत असलेल्या विविध तरुण मुलांना जगण्याची नवीन दिशा मिळाली. यामुळेच बारसे आणि मंजुळे नागपुरातील झोपडपट्टीतील मुलांसाठी स्लम सॉकरचे प्रणेते ठरले, हे मात्र नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com