यवतमाळ जिल्ह्यात कंटेन्मेंट झोनची सेंच्युरी; आठवडाभरात झपाट्यानं वाढले कोरोना रुग्ण  

राजकुमार भितकर 
Friday, 26 February 2021

नियमात शिथिलता मिळताच लग्न समारंभ, सण, उत्सव, सार्वजनिक ठिकाणचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला. याच कालावधीत ग्रामपंचायत निवडणूकही पार पडली. कोठेही सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर झाल्याचे दिसले नाही. परिणामी, हीच गर्दी कोरोनाचा संसर्ग वाढविण्यासाठी कारणीभूत ठरली

यवतमाळ : कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने मागील आठवड्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहे. आठवडाभरात एक हजार 394 जणांना कोरोनाची लागण झाली. वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात येत असून, जिल्ह्यात "सेंन्चुरी'पार आकडा गेला आहे.

मागील आठवडाभरापासून दररोज शंभर आणि दोनशेच्या घरातच बाधितांचा आकडा येत आहे. यापूर्वी कोरोनामुक्त झालेल्यांना पुन्हा लागण होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढत आहे. मार्च 2019 पासून जिल्हा प्रशासनासह नागरिक कोरोनाविरुद्घ लढाई लढत आहेत. वारंवार सांगूनही नियम पाळण्यात न आल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. 

हेही वाचा - बाप रे बाप! युवकाच्या घरात सापडल्या तब्बल २१ तलवारी; समोर आलं धक्कादायक सत्य 

नियमात शिथिलता मिळताच लग्न समारंभ, सण, उत्सव, सार्वजनिक ठिकाणचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला. याच कालावधीत ग्रामपंचायत निवडणूकही पार पडली. कोठेही सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर झाल्याचे दिसले नाही. परिणामी, हीच गर्दी कोरोनाचा संसर्ग वाढविण्यासाठी कारणीभूत ठरली. प्रशासनाकडून वारंवार काळजी घेण्याच्या सूचना करण्यात येत असताना नागरिक गांभीर्याने पालन करीत नसल्याचे वास्तव आहे. 

कोरोनाच्या विषाणूत जनुकीय बदल झाल्याचे यापूर्वी एका नमून्यात दिसून आले. काही महिने कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगला गुंडाळण्यात आले होते. पुन्हा कॉन्टॅक्‍ट ट्रेसींगवर भर देण्यात येत आहे. बाधिताच्या संपर्कात आलेल्यांची कोविड तपासणी केली जात आहे. संसर्ग रोखण्यासाठी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून, जिल्ह्यात त्याची संख्या 116 आहे. सर्वाधिक झोनची संख्या यवतमाळ शहरात 86 इतकी आहे. आठवडाभरात 1,394 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 18 फेब्रुवारीला 237, 19-126, 20-145, 21-75, 22-210, 22-210, 23-246, 24-215, 25-140, याप्रमाणे बाधितांची संख्या आहे.

हेही वाचा - अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्यांवर नागपूरच्या कंपनीचे नाव, कंपनींच्या...

भांबराजात 46 जणांना लागण

दोन हजार 700 लोकसंख्या असलेल्या भांबराजा येथे 46 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. लोकसंख्येच्या प्रमाणात लागण बघता प्रशासनाला चांगलीच धडकी भरली आहे. संपर्कातील व्यक्तींची चाचणी केल्यास हा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 plus containment zones in yavatmal