गडचिरोली - शासनाने सन २००५ पासून जाहीर केलेल्या शरणागत योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे..त्याचबरोबर शरणागत माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे तसेच माओवादविरोधी अभियानाच्या अतिशय प्रभावी अंमलबजावणीमुळे आजपर्यंत एकूण ७१६ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर शरणागती पत्करली आहे.तसेच सन २०२२ ते आतापर्यंत एकूण ६७ जहाल माओवाद्यांनी शरणागती पत्करलीअसून सन २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण ३४ माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. या शरणागत माओवादी सदस्यांचा सर्वंकष विकास होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामिल होणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलिस दलाकडून वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जात असतात..याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने गडचिरोली जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शरणागत माओवाद्यांसाठी साक्षरता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.प्रोजेक्ट संजीवनीअंतर्गत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली शरणागत माओवाद्यांना शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार मिळवून देऊन त्यांचा सर्वागीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जात असतो..याच उपक्रमाअंतर्गत गडचिरोली पोलिस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनी तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (एम.एस.एस.डी.एस.) यांच्या अंर्तगत देण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षणांकरिता किमान शैक्षणिक अर्हता ५ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.मात्र यापैकी बहुतेक माओवादी चळवळीत सामील होण्यापूर्वी ४ थी - ५ वी पर्यंतचे शिक्षणसुद्धा पूर्ण केलेले नव्हते व काही शरणागत माओवादी शालेय शिक्षणापासून पूर्णपणे वंचित राहिले होते. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने या अनुषंगाने जागतिक साक्षरता दिन ८ ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमादरम्यान एकूण १०६ शरणागत माओवाद्यांना साक्षरतेचे धडे देण्यात आले..या प्रशिक्षणामध्ये अक्षर ओळख, शब्दरचना, अंकगणित या सारख्या मूलभूत विषयांसोबत डिजीटल साक्षरतेचे धडेदेखील देण्यात आले. यासोबतच शरणागत माओवाद्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक विविध गोष्टींचे ज्ञानदेखील देण्यात आले.या कालावधीमध्ये साक्षतेचे धडे घेणाऱ्या १०६ शरणागत माओवाद्यांपैकी एकूण ४२ शरणागत माओवाद्यांची साक्षरता चाचणी रविवार (ता. २१) पोलिस मुख्यालय येथील एकलव्य हॉल येथे घेण्यात आली. या चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतर शरणागत माओवादी सदस्यांना साक्षरता प्रमाणपत्र देण्यात येऊन ते ५ व्या आणि ८ व्या वर्गाच्या परीक्षेकरिता पात्र होणार आहेत..या साक्षरता मोहिमेच्या माध्यमातून या शरणागत माओवादी सदस्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी निर्माण होऊन त्यांच्यासाठी रोजगार आणि स्वंयरोजगाराचे नवीन मार्ग तयार होणार आहेत. याव्यतिरिक्त ८ वी व १० वी वर्गाच्या परीक्षेकरिता पात्र माओवादी सदस्यांकरिता स्वतंत्र शिक्षण वर्गाचेदेखिल आयोजन करण्यात येणार आहे..या उपक्रमासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे शिक्षक, शरणागत शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे व सर्व पोलिस अंमलदारांनी सहकार्य केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.