काय? चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने 12 मुलांना विषबाधा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

  • दहेगाव येथील घटना 
  • खात केंद्रात डॉक्‍टर नसल्याने पालक नाराज 
  • प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल 
  • 12 पैकी चार मुलांची प्रकृती बरी 

मौदा (जि. नागपूर) : तालुक्‍यातील दहेगाव येथील प्राथमिक शाळेच्या परिसरात चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने बारा मुलांना विषबाधा झाली. ही घटना रविवारी (ता. 24) घडली. यानंतर सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे पाच ते बारा वर्षांची मुले गावातील प्राथमिक शाळेच्या परिसरात खेळण्यासाठी गेली होती. तेथे असलेल्या चंद्रज्योतीच्या झाडाला असलेली फळे या मुलांनी खाल्ली. यानंतर मुलांना उलट्या सुरू झाल्याने त्यांच्या पालकांनी विचारपूस केल्यावर त्यांनी झाडाच्या बिया खाल्ल्याची माहिती दिली. त्यातूनच त्यांना विषबाधा झाल्याचे लक्षात येताच सर्वांना लगेच खात प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भंडारा व नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

काही पालकांनी लगेच मुलांना चिंचोली येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. बातमी लिहिस्तोवर 12 पैकी चार मुलांची प्रकृती बरी असल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे, तर काही मुलांवर उपचार सुरू आहे. डॉ. हारोडे यांनी सर्व मुलांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. 

आरोग्य केंद्रात नव्हते कर्मचारी

खात येथे मुलांना दाखल केल्यावर येथे काही कर्मचारी हजर होते, तर काही उपस्थित नव्हते. कर्मचाऱ्यांनी डॉक्‍टर येत नसल्याची माहिती दिली. डॉक्‍टर व कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने या दवाखान्याचा उपयोग तरी काय, असा सवाल करीत पालकांनी नाराजी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 children poisoned