बापरे! पाच दिवसांत १२ बाधितांचा मृत्यू, जिल्ह्यात कोरोना ठरतोय कर्दनकाळ

दीपक फुलबांधे
Sunday, 20 September 2020

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकही चिंतित आहेत. गेल्या पाच दिवसांत कोरोनामुले १२ जणांचा बळी गेला. त्यामुळे कोरोनाचा प्रबाव सर्वसामान्य जीवनावर झाल्याचे दिन येते. जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे.

भंडारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांच्या वर गेली आहे. जिल्ह्यात दररोज बाधितांची संख्या वाढत आहे. तुमसर व भंडारा ही शहरे कोरोनाचे मोठे हॉटस्पॉट ठरले आहेत. आता दर पाच दिवसांत १२ पेक्षा अधिक मृत्यू होत असल्याने नागरिक चिंतेत आहेत. सामान्य जनजीवनावर कोरोनाचा प्रभाव होत आहे. त्यामुळे कोरोना कर्दनकाळ ठरत आहे.

देशात कोरोनाची लागण झाल्याने मार्चपासून लॉकडाउन व जमावबंदी लागू करण्यात आली होती. बसगाड्या व रेल्वेसेवा बंद असल्याने कामगार, विद्यार्थी परराज्यात व महानगरात अडकले होते. त्यानंतर ते मिळेल त्या वाहनाने गावाकडे परत आले. दरम्यान, एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला.

जुलैत झाला पहिला मृत्यू

परप्रांतातून व महानगरातून येणाऱ्यांमध्ये कोरोनाबाधित आढळत होते. त्यांना गावागावातील विलगीकरण केंद्रात ठेवले जात होते. त्यानंतर हळूहळू रुग्णांची संख्या वाढू लागली. १२ जुलैला जिल्ह्यातील पहिल्या कोरानाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर एक महिन्यापर्यंत मृतांची संख्या दोन होती. तेव्हा एकूण बाधित ४३४ होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात बाधित रुग्णांची व मृतांची संख्या झपाट्याने वाढली.

दररोज वाढत आहेत रुग्ण

भंडारा व तुमसर शहरात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. एक सप्टेंबरपर्यंत २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर १० दिवसांत २२ जणांचा आणि नंतरच्या १० दिवसांत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या प्रत्येक पाच दिवसांत किमान १२ जणांचा मृत्यू होत आहे.

जाणून घ्या : ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन

कर्मचाऱ्यांनाही लागण

जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांतही कोरोनाची लागण दिसून येत आहे. याचा परिणाम कार्यालयीन कामांवर व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर होत आहे. खासगी व राष्ट्रीयीकृत बॅंका, सहकारी संस्था, दुकाने व व्यवसातील कामगार-कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्याचा परिणाम सामान्य जनजीवनावर होत आहे.

अवश्य वाचा :  नातेवाईकांनी हात जोडून केली विनवणी; तरी डॉक्टरांनी रुग्णाला पाठवले घरी; मग झाला मृत्यू

पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

जवाहरनगर पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याला दोन ते तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. त्यांचा रविवारी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 corona positive victims died in five days at bhandara district