esakal | शासकीय नोकरीचे आमिष पडले महाग, तब्बल १३ लाखांनी फसवणूक

बोलून बातमी शोधा

file photo
शासकीय नोकरीचे आमिष पडले महाग, तब्बल १३ लाखांनी फसवणूक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : सार्वजनिक बांधकाम विभाग व आरटीओ कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन सुशिक्षित बेरोजगारांची तब्बल 13 लाखांनी फसवणूक करण्यात आली. दोघांनी शहर कोतवाली ठाण्यात तक्रार केली. प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध फसवणूक, विश्‍वासघातप्रकरणी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा: पेटंट सादर करण्यात विदर्भातील विद्यापीठ पिछाडीवर, 'अभिमत' मात्र आघाडीवर

संभाजी सावंत (वय 55, रा. बदलापूर), मयूर गणेशकर (वय 40, रा. धरमपेठ, नागपूर), सुरेश प्रकाश डोंगरे (वय 40), अजय प्रकाश डोंगरे (वय 32), दिनेश प्रकाश डोंगरे (वय 35, सर्व रा. महागाव, जि. यवतमाळ) यांच्यासह दोन महिला, अशी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या सात जणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पवन पद्माकर केणे (वय 33, रा. काटसूर, मोर्शी) व त्याचा मित्र दुर्गेश डोईफोडे या दोघांकडून वर्षभरापूर्वीच शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 13 लाख रुपये टप्प्याटप्याने या लोकांनी घेतले. 12 ऑगस्ट 2020 ते 24 एप्रिल 2021 दरम्यानचा हा घटनाक्रम असल्याची तक्रार केणे यांनी शहर कोतवाली ठाण्यात दाखल केली. त्यात पवन व दुर्गेश या दोघांव्यतिरिक्त अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास सात बेरोजगार सुशिक्षित युवक, युवतींकडून या टोळीने विविध विभागात नोकरी लावण्याचे कारण सांगून त्यांच्याकडून लाखो रुपये लुबाडले. अशा सात जणांची नावे पवन केणे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. वर्षभराचा कालावधी लोटल्यावरही शासकीय नोकरी संदर्भातील कुठल्याच सकारात्मक हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे ज्यांना पैसे दिले, अशा लोकांकडून ते पैसे परत मागितले असता संबंधितांना पैसे परत मिळाले नाही. फसवणूक केल्याचे लक्षात येताच, पवन केणे यांनी शहर कोतवाली ठाण्यात तक्रार दिली.

शासकीय नोकरीसाठी लाखो रुपये घेतल्यानंतर बेरोजगारांना बनावट नियुक्तीपत्रही दिल्या गेली. ते तक्रारीसोबत तक्रारकर्त्यांनी जोडले असून चौकशी सुरू आहे.
-विवेकानंद राऊत, सहायक पोलिस निरीक्षक, शहर कोतवाली ठाणे.