esakal | नातवंडांचा घाबरलेला आवाज येताच नाल्याच्या दिशेने धावले आजोबा.. नातवाचा वाचवला जीव पण, नातीला...  
sakal

बोलून बातमी शोधा

2 children are no more due to sinking in drain in Gondia

शेतात गेलेल्या नातवंडांपैकी एका नातीचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. आजोबाच्या लक्षात हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने त्यांना नातवाला वाचविण्यात यश आले. ही घटना म्हसवानी येथे शनिवारी (ता. 15) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. 

नातवंडांचा घाबरलेला आवाज येताच नाल्याच्या दिशेने धावले आजोबा.. नातवाचा वाचवला जीव पण, नातीला...  

sakal_logo
By
आर. व्ही. मेश्राम

सडक अर्जुनी (जि. गोंदिया) :  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी- नाल्यांना प्रचंड पूर आला आहे. शेतातील छोटे नाले तर दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे या नाल्यांना जीवघेणे स्वरूप प्राप्त झाले आहे. सडक अर्जुनी येथे अशाच दोन हृदयद्रावक घटना घडल्या आहेत. 

शेतात गेलेल्या नातवंडांपैकी एका नातीचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. आजोबाच्या लक्षात हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने त्यांना नातवाला वाचविण्यात यश आले. ही घटना म्हसवानी येथे शनिवारी (ता. 15) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. 

हेही वाचा - अरे देवा! वडीलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेला अन् डॉक्टरांनी दिले डेथ सर्टीफिकेट

कांचन शहारे तिचे दोन लहान भाऊ असे तिघेजण आपल्या आजोबांसोबत शेतात गेले होते. त्यांचे शेत नाल्याच्या किनाऱ्यावर आहे. आजोबा शेतातील गवत कापायला लागले. तेवढ्यात तिन्ही भावंडे जवळच्या नाल्यावर हातपाय धुण्यासाठी गेले. हातपाय धुताना बहीण व एक भाऊ नाल्यात बुडाले.

नातवाला वाचवले पण....

ही बाब लक्षात येताच तत्काळ आजोबा धावून आले. नातवाला किनाऱ्यावर बाहेर काढून ठेवले. पुन्हा नात कांचन हिला काढण्यासाठी गेले. परंतु, ती त्या जागेवर नव्हती. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. दरम्यान, या घटनेची माहिती गावात पोहोचताच गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठले. शोध घेतला असता ती बुडालेल्या स्थळापासून 50 फूट अंतरावर सापडली.  मात्र, ती मृतावस्थेत होती. कांचन विश्‍वनाथ शहारे (वय 10, रा. म्हसवानी) असे मृताचे नाव आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार एच. सी. धावडे करीत आहेत.

नदीपात्रात बुडून मुलाचा मृत्यू

वाहून गेलेली चप्पल काढण्याचा प्रयत्न करीत असताना एका मुलाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. 15) सकाळी 11 च्या सुमारास फुलेनगर गावाशेजारी घडली. मनीष सुभाष तोरणकर (वय 14,रा. फुलेनगर) असे मृताचे नाव आहे.

जाणून घ्या - शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले हे विधान...

डुग्गीपार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष तोरणकर हा आपल्या मित्रांसह गावाशेजारी असलेल्या नदीकडे फिरायला गेला होता. मनीषसह त्याच्या मित्रांनी नदीपात्रात हातपाय धुतले. याचवेळी मनीषची चप्पल वाहून गेली. त्यामुळे चप्पल काढण्यासाठी तो खोल पाण्यात गेला. यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील तपास ठाणेदार विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार हरिश्‍चंद्र शेंडे करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ