esakal | गडचिरोलीत तुटला दोनशे गावांचा संपर्क
sakal

बोलून बातमी शोधा

भामरागड - दुथडी भरून वाहत असलेली पर्लकोटा नदी.

जिल्ह्यात आज, मंगळवारी पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून अनेक मार्गांची वाहतूक बंद आहे. यात भामरागडजवळील पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड- आलापल्ली मार्गाची वाहतूक महिनाभरात सहावेळा बंद झाली असून पुराचे पाणी वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गडचिरोलीत तुटला दोनशे गावांचा संपर्क

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - जिल्ह्यात आज, मंगळवारी पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून अनेक मार्गांची वाहतूक बंद आहे. यात भामरागडजवळील पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड- आलापल्ली मार्गाची वाहतूक महिनाभरात सहावेळा बंद झाली असून पुराचे पाणी वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्याच्या अनेक भागांत आज पहाटेपासून पावसाला सुरवात झाली. भामरागड तालुक्‍यासह काही तालुक्‍यात दिवसभर संततधार सुरू असल्याने नदी-नाल्यांना पूर आला. पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड- आलापल्ली मार्गाची वाहतूक आज दुपारपासून बंद झाली. भामरागड ते आलापल्ली या मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी ठेंगणे पूल असल्याने नाले तुडुंब भरून वाहत आहेत. परिणामी वाहतूक ठप्प झाली. 

भामरागडपासून सहा किलोमीटर दूर असलेल्या कुमरगुडा नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने एका रुग्णवाहिकेसह अनेक पर्यटक या ठिकाणी अडकून पडले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या नाल्यांना पूर आल्याने मधे अडकलेल्या नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला.

गडचिरोलीलगतची कठाणी तसेच वैनगंगा नदीही आज सकाळपासून दुथडी भरून वाहत होती. सततच्या पावसामुळे कुरखेडा, आरमोरी, गडचिरोली, सिरोंचा, अहेरी व भामरागड तालुक्‍यातील २०० गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला आहे.

दोन मृतदेह सापडले; दोघांचा शोध सुरू
हिंगणघाट (जि. वर्धा) - येथील वणा नदीत गौरीविसर्जनाकरिता गेलेल्या दोन महिलांसह दोन बालके बुडाली होती. ही घटना सोमवारी (ता. दोन) घडली. यातील रिया भगत यांचा मृतदेह घटनेनंतर लगेच सापडला, तर तीनजण बेपत्ता होते. आज, मंगळवारी सकाळी अभय भगत याचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्‍यातील सोईट येथे सापडला. दीपाली भटे आणि अंजना भगत या दोघींचा शोध अद्याप सुरू आहे. दोघांचाही शोध एनडीआरएफ चमू व शासकीय यंत्रणा घेत आहे. आमदार समीर कुणावारही शोधपथकातील कर्मचाऱ्यांसह फिरत आहेत.

वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह आढळला 
सावली (जि. चंद्रपूर) - पोहण्यासाठी नाल्यात उतरलेला एक मुलगा सोमवारी (ता. २) वाहून गेला होता. त्याचा मृतदेह आज, मंगळवारी आढळून आला. मृताचे नाव खुशाल बंडू करकाडे (वय १५) आहे. अंतरगाव येथील खुशाल करकाडे सोमवारी गौरी विसर्जनादरम्यान पोहण्यासाठी नाल्यात उतरला होता. तेव्हा तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. शेखर भोयर यांनी पाण्यात उडी घेऊन खुशालला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. जिल्हा बचाव पथकानेही शोध घेतला पण त्यांनाही खुशाल सापडला नाही. आज, मंगळवारी भोई समाजबांधवांनी शोधले असता खुशालचा मृतदेह आढळून आला.

loading image
go to top