चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांचे स्थलांतरण करणार

 चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांचे स्थलांतरण करणार

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील जंगल हाउसफुल्ल झाल्याने आपसातील संघर्ष टाळण्यासाठी येथील काही वाघांना इतर व्याघ्र प्रकल्पांमध्ये पाठविण्यात येणार आहे. वाघांच्या स्थलांतरणाचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी मुख्य वनसंरक्षकांना दिल्या आहेत. प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून एका महिन्यात राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी परिसर वृक्षाच्छादित असून जैवविविधतेने समृद्ध असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाघ वास्तव्यास आहेत. त्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष वाढू लागल्याने येथील वाघांचे स्थलांतरण करण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. वाघांना सुरक्षित अधिवास निर्माण करून देण्यासाठी कॉरिडॉर तयार केले जात आहे. मात्र, वाढलेल्या वाघांना सुरक्षित अधिवास मिळावा या उद्देशाने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर वास्तव्यास असलेल्या वाघांचे रिलोकेशन अर्थात स्थलांतरासाठी आता वन विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. तीन वाघांचे या पूर्वीच रेडिओ कॉलर बसवून स्थलांतर केले आहे. नुकतेच मेळघाटमध्येही ब्रह्मपुरी येथे जेरबंद केलेल्या वाघाला सोडले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याने अजून काही वाघांना इतर व्याघ्र प्रकल्पांमध्ये पाठविण्याची तयारी सुरू केलेली आहे. चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी या परिसरातील वाघांचे स्थलांतरण्याचा प्रस्ताव तयार करण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेची मदत घेतली जात आहे. प्रारंभी 20 वाघांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार केला जाणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी राजस्थानमधील रणथंबोर नॅशनल पार्कमधील वाघ 2008 मध्ये सरिस्का व्याघ्र प्रकल्पामध्ये हलविण्यात आले होते. मध्य प्रदेशमधील कान्हा आणि बांधवगड व्याघ्र प्रकल्पातूनही पन्ना नॅशनल पार्कमध्ये वाघांचे स्थलांतर केले होते. यातील सरिस्काचा प्रयोग अयशस्वी ठरला असला तरी पन्नाचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. वाघांचे स्थलांतर हा त्यांच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या स्थलांतर केलेल्या वाघांवर चोवीस तास नजर राहणार असेल तर हा प्रयोग नक्कीच आपल्याबरोबर वाघांचे अस्तित्व असलेल्या इतर देशांसाठीदेखील मार्गदर्शक ठरू शकतो असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com