२२ वर्षीय युवकाची अनोळखी युवकांकडुन हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dnyaneshwar Budhwat

सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन येथे युवकाची हत्या झाल्याची घटना बुधवारी शेत शिवारात घडली.

२२ वर्षीय युवकाची अनोळखी युवकांकडुन हत्या

सिंदखेड राजा - सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन येथे युवकाची हत्या झाल्याची घटना बुधवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शेत शिवारात घडली. पोलीस व सैन्य भरतीची तयारी करीत असलेल्या युवकाची हत्या झाल्याने सावखेड तेजन येथे हळहळ व्यक्त होत आहे. सावखेड तेजन येथील युवक ज्ञानेश्वर मोहन बुधवत, वय २२ वर्ष हा गावातच राहून शेती करीत होता. गावापासून १ कि.मी. अंतरावर त्याचे शेत असल्याने तो नेहमी प्रमाणे शेतात होता. दरम्यान, दुपारी 4 वाजेच्या सुमारास तीन अनोळखी युवकांनी त्याच्या शेतात जावून, त्याचेशी वाद घालून, त्याच्या गळ्यावर चाकूने वार केला. या प्राणघातक हल्ल्यात ज्ञानेश्वर गंभीर जखमी अवस्थेत ओरडत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच गावातील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला गाडीत टाकून जालना येथे नेले. मात्र, अर्ध्या रस्त्यातच त्याचा मृत्यु झाला. ज्ञानेश्वर बुधवत याचा मृतदेह सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात आणल्या नंतर त्याचे पोस्टमार्टम करण्यात आले, असून रात्रीच त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली.

उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यमावार, पोलिस निरीक्षक केशव वाघ, सहायक पोलिस निरीक्षक मधुसूदन घुगे, युवराज राठोड यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा पूर्ण केला असून, अद्याप घटनेतील कोणत्याच संशयिताला ताब्यात घेण्यात आले नाही. या प्रकरणी सविस्तर तक्रार अद्याप दाखल नसल्याने पुढील कोणतीच कारवाई झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान सावखेड तेजन येथे या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. गावात शांतता असून पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे ठाणेदार केशव वाघ यांनी सांगितले. ही हत्या शेतातच वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी घटनेचा प्रत्येक अंगाने तपास केला जाणार असल्याने हत्येचे नेमके कारण समोर येणार आहे.

Web Title: 22 Year Old Youth Killed By Unknown Youths Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..