esakal | 239 शिक्षकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह, 23 नोव्हेंबरपासून वाजणार शाळेची घंटा
sakal

बोलून बातमी शोधा

239 teachers found corona negative in dhamangaon railway of amravati

राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्यानुसार सर्व व्यवस्थापनाअंतर्गत येत असलेल्या शाळा, महाविद्यालये 23 नोव्हेंबरपासून शाळा इमारतीत भरवण्याची परवानगी देत असल्याचे नमूद केले आहे. हे वर्ग भरवताना शासनाने दिलेल्या विविध सूचनांचे पालन करावे लागणार आहे.

239 शिक्षकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह, 23 नोव्हेंबरपासून वाजणार शाळेची घंटा

sakal_logo
By
सायराबानो अहमद

धामणगाव रेल्वे ( जि. अमरावती ) :  नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू होत असून राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन शाळांसह विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे. दरम्यान, शुकवारी (ता.20) तालुक्‍यातील 32 शाळांतील 240 शिक्षकांची कोरोना चाचणी येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. यामध्ये 239 शिक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे, तर शहरातील एका शिक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा - ग्राहकांनो, तुमच्या घरी येणारे 'आरओ'चे पाणी कायमचे बंद होण्याची शक्यता, नाहरकत...

राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्यानुसार सर्व व्यवस्थापनाअंतर्गत येत असलेल्या शाळा, महाविद्यालये 23 नोव्हेंबरपासून शाळा इमारतीत भरवण्याची परवानगी देत असल्याचे नमूद केले आहे. हे वर्ग भरवताना शासनाने दिलेल्या विविध सूचनांचे पालन करावे लागणार आहे. त्यात प्रामुख्याने आरोग्यविषयक, स्वच्छता आणि अंतर ठेवून बैठक व्यवस्था या नियमांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्याची अंमलबजावणी करताना शाळेच्या शिक्षकांची तारांबळ उडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कोरोनाचे लॉकडाउन सुरू झाल्यापासून सर्व शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृह बंद आहेत. त्यामुळे जून अखेर शालेय सत्र सुरू झाले तरी प्रत्यक्ष वर्ग भरलेच नाही. खासगी शाळांनी ऑनलाइन वर्ग घेण्याचा प्रयत्न केला. तो केवळ शहरी भागातच यशस्वी ठरला. ग्रामीण भागात ऑनलाइन वर्ग यशस्वी झाले नाही. दरम्यान, येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी शिबिर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात कोरोना नियमावलींचे पालन करून शिबिर घेण्यात आले. या शिबिराला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वकार अहमद खान, प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप चव्हाण यांनी भेट दिली.

हेही वाचा - स्ट्रगलर असल्याचे भासविले, लग्न करून गंडविले 

आज शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची चाचणी -
शाळा सुरू होण्याआधी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे. ही चाचणी सरकारी रुग्णालयात मोफत करून देण्याची व्यवस्था राहणार आहे. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी (ता.21) शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांनी दिली.