खातेदाराच्या बॅंक खात्यातून 28 हजार रुपये गायब होतात तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

गोरेगाव येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतील कर्मचाऱ्यांनी खातेदारांचा आधारकार्ड क्रमांक चुकीचा लिहिल्याने खात्यातील जमा रक्कम आधारकार्ड धारकाने काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गोरेगाव ( जि. गोंदिया) : लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या काळात सायबर क्राईम विभागात त्यासंबंधीच्या अनेक तक्रारीही दाखल झाल्या. त्यासंबंधीच्या बातम्याही प्रकाशित झाल्यात. मात्र बॅंक कर्मचाऱ्यांच्या चुकीने एखाद्या खातेदाराच्या खात्यातील रक्‍कम नाहीशी होण्याचा प्रसंग विरळाच. मात्र अशी घटना घडली आणि खातेदारासह बॅंक कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले.
गोरेगाव येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतील कर्मचाऱ्यांनी खातेदारांचा आधारकार्ड क्रमांक चुकीचा लिहिल्याने खात्यातील जमा रक्कम आधारकार्ड धारकाने काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आधार क्रमांक चुकीचा देण्यात आल्याने घरकुल योजनेतील थोडेथोडके नव्हे तर चक्‍क 28 हजार रुपयेच बॅंक खात्यातून नाहीसे झाले. हे कळल्यावर खातेधारकाच्या पायाखालची जमीनच सरकली. घटनेचा पाठपुरावा केल्यानंतर लक्षात आले की, हगरू रामलाल कोहळे यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत आवश्‍यक पुरावे देऊन खाते काढले. या बॅंक खात्याचा क्रमांक पंतप्रधान घरकुल योजनेतील अनुदान प्राप्त करण्यासाठी दिल्याने या बॅंक खात्यात हप्ता रक्कम जमा करण्यात आली.
टाळेबंदी असल्याने घरकुल बांधकाम बंद ठेवण्यात आले होते. आता लॉकडाउनमध्ये थोडी सूट मिळाल्याने बांधकाम करण्यासाठी हगरू कोहळे बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांच्या खात्यातून 28 हजार 500 रुपये काढल्याचे बॅंक कर्मचाऱ्यांनी कोहळे यांना सांगितले.

सविस्तर वाचा - मुंढे साहेब, सातशे जणांना क्‍वारंटाईन करण्याची वेळ कोणामुळे आली आता माफी मागा...
यावर शाखा व्यवस्थापकांना या संदर्भात तपासणी करण्याचा आग्रह कोहळे यांनी केला असता खातेदार कोहळे यांच्या आधार क्रमांकाऐवजी पालेवाडा येथील चंद्रशेखर या व्यक्तीचा आधार क्रमांक तेथे जोडण्यात आल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्या व्यक्तीने आधार क्रमांकावर 28 हजार 500 रुपये काढले असावे, असे शाखा व्यवस्थापकांनी सांगितले. ती रक्कम लवकरच खऱ्या खातेदारांच्या खात्यात वळती केली जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 28 thousand rupees vanish from bank account