अमरावती : वाहनातून साडेतीन कोटींची रक्कम पकडली, सहा जण ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amravati

अमरावती : वाहनातून साडेतीन कोटींची रक्कम पकडली, सहा जण ताब्यात

अमरावती : पोलिस पथकाने (amravati police) गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत तब्बल तीन कोटी सत्तर लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली असून ही रक्कम हवालाची असल्याचा संशय आहे. अमरावतीमधील या रॅकेटचे तार अन्य काही राज्यांशी जुळल्याचे संकेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. (3 crore and 50 lakh cash seize from vehicle in amravati)

हेही वाचा: ...तर नागपूरचा होणार कोकण! 'या' आहेत धोकादायक वस्त्या

सोमवारी (ता.26) रात्री शहराच्या फरशी स्टॉप परिसरातील हरिगंगा ऑइल मीलच्या मार्गाने दोन स्कॉर्पियो मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती प्राप्त होताच राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यासह उपनिरीक्षक किसन मापारी, कॉन्स्टेबल दुलाराम देवकर, अतुल संभे, दानिश शेख, राहुल ढेंगेकार, अमोल खंडेझोड आदींनी या परिसरात सापळा रचला. दरम्यान दोन स्कॉर्पियो (क्रमांक एमएच 18 बीआर 1434 व एमएच 20 डीव्ही 5774) याच मार्गाने येताना दिसल्या. पोलिस पथकाने दोन्ही वाहने थांबवून त्यामधील शिवदत्त महेंद्र गोहिल (वय 30, रा. सिमर, जि. गिरसोमना, गुजरात), वाघेला सिलूजी जोराजी (वय 49, रा. चानसमान, गुजरात), रामदेव बबादूरसिंह राठोर (वय 24, रा. सिमर जि. गिरसोमना), नरेंद्र दिलीपसिंह गोहिल (वय 27, रा. राजुला, जि. अमरेली) यांना वाहनाखाली उतरवून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी पोलिसांनी सर्वांना वाहनासह पोलिस ठाण्यात आणले. राजापेठ ठाण्यात आणलेल्या वाहनांची तपासणी केली असता सीटखाली बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम आढळून आली. जप्त दोन्ही वाहनांतून पोलिसांनी जवळपास तीन कोटी 70 लाख 59 हजार 100 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. ताब्यात घेण्यात आलेल्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा फरशीस्टॉप परिसरातील वीणा अपार्टमेंटकडे वळविला. अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये छापा टाकून पोलिसांनी नीलेश भरतभाई पटेल (वय 27, ता. म्हैसाना, गुजरात), जिग्नेश राजेश गिरीगोसावी (वय 26, रा. म्हैसाना गुजरात) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून दीड लाख रुपये रोख, दोन पैसे मोजण्याच्या मशीन व तीन अ‍ॅण्ड्रॉइड मोबाईल, असा ऐवज जप्त केला. याप्रकरणी एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणाचे कनेक्शन अन्य काही राज्यांशी जुळल्याचे संकेत पोलिसांना मिळाले असून त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे. पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलिस उपायुक्त परिमंडळ शशिकांत सातव, सहायक पोलिस आयुक्त श्री. डुंबरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथकाने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले.

आयकर विभागाला दिली माहिती

जप्त करण्यात आलेल्या रकमेसंदर्भात पोलिसांनी स्थानिक आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असून त्यांनी नागपूरच्या आयकर विभागाशी संपर्क साधला आहे. आता नागपूरचे अधिकारी अमरावतीत येणार असून पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या चौकशीतच संबंधित रक्कम हवालाची आहे किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Amravati