वाळूच्या एका टिप्परसाठी मोजा 32 हजार...गोंदियात वाळूची बेभाव विक्री

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

वाळूमाफिया खुलेआम नदीघाटांवरून वाळू उपसा करून चढ्या भावाने त्याची विक्री करीत आहेत. वाळू तस्कर एक टिप्पर वाळूसाठी 32 हजार रुपये घेत आहेत. मात्र, महसूल विभागात कार्यरत अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे घरबांधकामासाठी वाळू खरेदी करणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेरचे झाले आहे.

गोरेगाव (जि. गोंदिया) : तालुक्‍यात वाळूमाफिया वाळू घाटांवरून सर्रास वाळूची चोरी करीत असून तिची बेभाव विक्री करीत आहेत. त्यामुळे घरबांधकामासाठी वाळू खरेदी करणे आता सर्वसामान्यांच्या
आवाक्‍याबाहेरचे झाले आहे. पंतप्रधान घरकुल योजनेची बांधकामेसुद्धा यामुळे रखडली आहेत.

शासनाच्या वतीने 2019 या वित्तीय वर्षात वाळूघाटांचा लिलाव करण्यात आला होता. त्याचा कालावधी 30 सप्टेंबर 2019 रोजी समाप्त झाला. परंतु त्यानंतर जिल्ह्यात वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला नाही. त्यामुळे घरकुल बांधकाम करण्यापासून तर मोठमोठे कंत्राटी कामे थांबली होती. याचा गैरफायदा वाळूमाफियांनी उचलला. ते खुलेआम नदीघाटांवरून वाळू उपसा करून चढ्या भावाने त्याची विक्री करीत आहेत. वाळू तस्कर एक टिप्पर वाळूसाठी 32 हजार रुपये घेत आहेत. मात्र, महसूल विभागात कार्यरत अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत.

वाळूमाफिया गोरेगाव शहरात तिरोडा मार्गे वाळूची अवैध वाहतूक करतात. हा मार्ग वाळूमाफियांना सोयीचा असून विना रॉयल्टी वाळू भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी येथे वाहतूक केली जाते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक बसस्थानक चौकात पोलिस बंदोबस्त असतानाही त्यांचा माफियांवर कुठलाही परिणाम होत नाही. पोलिस या वाळू माफियांकडे का दुर्लक्ष करतात, असा सवाल नागरिक करीत आहेत.

महसूल विभागाचे दुर्लक्ष कायम

वाळू भरलेले टिप्पर तहसील कार्यालयासमोरून सुद्धा जातात, मात्र ते सुद्धा यावर आळा घालीत नाही.
एकीकडे आपल्या घराचे बांधकाम करण्याकरिता पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे वाळू माफिया चढ्या दराने वाळू विक्री करीत आहेत. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर आळा घालावा, महसूल अधिकाऱ्यांनी जप्त केलेली वाळू पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वाजवी दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जाणून घ्या : Video : वर्ध्यात घडली चिड आणणारी घटना; सैतान युवकाचे चिमुकल्याशी अनैसर्गिक कृत्य अन्‌...

 

वाळूटिप्परवर कारवाई केली
तिरोडा मार्गावरून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करण्यात आली आहे. टिप्परच्या मालकांकडून 2 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला असून यापुढेही अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर आळा घालण्यात येईल.
- एन.टी. वाघचौरे, प्रभारी तहसीलदार, गोरेगाव.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 32 thousand for a one tipper sand