कापूस साठवणुकीवर नवीनच धोका; नक्की आहे तरी काय हे..वाचा

कृष्णा फंदाट
Wednesday, 15 April 2020

काही शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस दिला. काहींनी व्यापाऱ्यांना कापूस विकला तरीही 40 टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरातच आहे.

तेल्हारा (जि.अकोला) : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाउनचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. फेडरेशनला विक्री केलेल्या कापसाची शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही तर दुसरीकडे जमाव बंदीमुळे शेतकऱ्यांना कापसाची विक्री करता येत नाही. 40 टक्के कापूस हा विक्रीविना आहे. घरात साठवून ठेवल्याने त्यात सूक्ष्मजंतूंची निर्मिती झाल्याने नवीनच धोका निर्माण झाला आहे. एकूणच कोरोनामुळे पांढरे सोन्याची चमक कमी झाल्याचे दिसून येत आहे.

तेल्हारा तालुक्यातील शेती काळी कसदार असून सर्वच पिकांसाठी योग्य आहे. तरीही या परिसरातील शेतकरी सोयाबीन आणि कपाशी पिकाला प्राधान्य देतात. यावर्षी सर्वात जास्त कपाशीचा पेरा होता शेतकऱ्यांनी एकत्र पैसा मिळावा म्हणून घरात कापूस साठवून ठेवला. मार्च महिन्यामध्ये कापूस विकावा सर्वांचे देणे घेणे लग्नकार्य करण्याच्या कामात हा पैसा येईल, हा उद्देश असतो. काही शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस दिला. काहींनी व्यापाऱ्यांना कापूस विकला तरीही 40 टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरातच आहे. मार्च महिन्यात कापूस विकण्याची शेतकऱ्यांची तयारी होती. पण अचानक कोरोनाचे संकट पुढे आले. लॉकडाउन सुरू झाले. यामध्ये शेतकऱ्याच्या घरातील कापूस घरातच राहिला. 

आवश्यक वाचा - आयुर्वेदाची युक्ती वाढवेल रोगप्रतिकार शक्ती

ज्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विकला त्यांना अद्याप पैसे मिळाले नाही. घरातला कापूस विकल्या जात नसल्याने तेही शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहे. कारण हा कापूस विकून खरिपासाठी शेत तयार करणे वगैरेसारखी कामे करता येतात. पण आता पैसे नसल्याने खरीप हंगामाची तयारी कशी करावी असा प्रश्न कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झाला आहे. एकूणच पांढरे सोन्यावरील रया गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच घरात असणाऱ्या कापसावर विशिष्ट जीवाणू तयार झाल्याने त्यात कापसाचा स्पर्श जरी झाला तरी सर्वांगाला खाज सुटते. तेव्हा एकदा लाकडाउनचे लॉक उघडावे. घरातील कापूस विकला जावा. अशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

कापूस घरात अडकून पडला
कापूस एकत्र विकल्यावर एकत्र रक्कम येईल. मोठे काम होईल, या अपेक्षेने कापूस विकणे बाकी ठेवला. पण कोरोनामुळे लॉकडाउन सुरू करण्यात आल्याने कापूस घरात अडकून पडला. कापसाच्या रकमेवर खूप कामे करायचे आहेत. शिवाय खरीप हंगामासाठी शेतीदेखील तयार करायची आहे.
-अमोल गडम, शेतकरी, निंबोळी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40 percent of cotton in farmers own houses