नागपूर पदवीधर निवडणूक : यंदा ६४ टक्के मतदान, वाढलेला टक्का कोणाच्या पथ्थ्यावर?

अतुल मेहेरे
Wednesday, 2 December 2020

वाढलेला टक्का कोणाला पहिल्या क्रमांकाची पसंती देतो, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. एकूणच पहिल्या पसंती क्रमाने विजयी होण्यासाठी उमेदवाराला सुमारे साठ हजार मतांचा कोटा पूर्ण करावा लागणार आहे. 

नागपूर : नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी झालेल्या मतदानात सकाळपासूनच मतदार उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यावेळी भाजप आणि महाविकास आघाडी, अशी थेट लढत झाली. त्यामुळे निकालाची उत्सुकता अधिक आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास २० टक्के अधिक मतदान झाल्याने सर्वच उमेदवार धास्तावले आहेत. वाढलेला टक्का कोणाला पहिल्या क्रमांकाची पसंती देतो, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. एकूणच पहिल्या पसंती क्रमाने विजयी होण्यासाठी उमेदवाराला सुमारे साठ हजार मतांचा कोटा पूर्ण करावा लागणार आहे. 

हेही वाचा - मानसिक त्रास असताना तिला दूर का लोटले? शीतल यांच्या सासूचे आमटे कुटुंबीयांना पत्र

पदवीधर निवडणुकीत सरासरी ६४ टक्के मतदान झाले असून भाजपचे उमेदवार संदीप जोशी, काँग्रेसचे अभिजित वंजारी, विदर्भवादी नितीन रोंघे, वंचित बहुजन आघाडीचे राहुल वानखेडे, विनोद राऊत, प्रवीण डेकाटे यांच्यासह १९ उमेदवारांचे भवितव्य सीलबंद झाले आहे. उद्या गुरुवारी सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण झाला नाही तर रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू राहू शकते. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत मतदानाची टक्केवारी अवघी ३७ टक्के इतकी होती. 

हेही वाचा - आई म्हणून जन्मदात्रीने आपले कर्तव्य पार पाडले; मात्र, मुलांनी सोडले वाऱ्यावर!

आजवर भाजपचा या मतदारसंघात पराभव झाला नाही. त्यामुळे भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्यासमोर विजयी परंपरा कायम राखण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे काँग्रेस महाआघाडीने यंदा प्रथमच अ‌ॅड. अभिजित वंजारी यांच्या रूपाने अधिकृत उमेदवार दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे बळ त्यांना मिळाले आहे. याशिवाय त्यांनी सुमारे दीड वर्ष आधीपासून या मतदारसंघात मशागत केली. वाढलेला टक्का हा वंजारी यांना खुणावत आहे. यंदा बसपाने आपला उमेदवार जाहीर केला नाही. वंचित बहुजन विकास आघाडीचा उमेदवार रिंगणात होता. असे असले तरी यंदा भाजप विरुद्ध काँग्रेस, असा थेट मुकाबला झाल्याचे पाहायला मिळाला. त्यामुळे मतविभाजनाचा धोका टळला आहे. दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्क्यांच्या आसपास असलेल्या मतदानात शेवटच्या तासांत वाढीव मतदानामुळे आणखी पाच ते सात टक्के भर पडली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 60 percentage voting in nagpur graduation constituency election