esakal | अकोल्यात 99 पैकी 62 जणांचे अहवाल निगेटिव्ह; 37 प्रलंबित

बोलून बातमी शोधा

corona .jpg

जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून 220 जणांची नोंद झाली आहे. त्यातील 58 जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत.

अकोल्यात 99 पैकी 62 जणांचे अहवाल निगेटिव्ह; 37 प्रलंबित
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात शनिवारी (ता.4) सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकही कोरोना विषाणू संसर्गित रुग्ण नाही. आज दिवसभरात (गेल्या 24 तासांत) आणखी २१ जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले. त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत 99 नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी 62 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, सर्वच्या सर्व निगेटिव्ह आहेत. तर 37 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. हे जण सध्या विलगीकरण कक्षात निरीक्षणात आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून 220 जणांची नोंद झाली आहे. त्यातील 58 जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत. तर 116 जणांचा गृह अलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर 37 जण विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत.

हेही वाचा - COVID19 : धक्कादायक : प्लास्टिक थैली घालून बजावताय कर्तव्य

वाडेगावच्या 17 जणांचे अहवाल निगेटिव्ह
या आकडेवारीत वाडेगाव येथे दिल्ली येथून आलेल्या 18 पैकी 17 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. त्याचाही समावेश आहे. तर एकाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान आज पुन्हा दिल्ली येथील निजामुद्दीन येथील तब्लिग जमातच्या मरकज येथे सहभागी झालेल्या अकोला जिल्ह्याशी संबंधित 14 जणांची यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. त्यांचा शोध प्रशासनाने लगेचच सुरू केला. त्यातील पाच व्यक्ती हे जिल्ह्यात नाहीत. पुणे, अमरावती व वाशीम येथे प्रत्येकी एक व्यक्ती असून दोघे राजस्थानचे आहेत. उर्वरित नऊ जणांशी प्रशासनाचा संपर्क झाला असून, त्यांना शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

11 जण अलगीकरण कक्षात
अद्याप तब्लिग जमात च्या कार्यक्रमाशी संबंधित आजची 14 जणांची यादी मिळून 29 जणांची यादी जिल्ह्यात प्राप्त झाली आहे. त्यातील नऊ जण भरती आहेत, तर उर्वरीत नऊ जणांशी संपर्क होऊन भरती करण्यात येत आहेत. उर्वरित 11 जण हे जिल्ह्याबाहेर आहे. यातील ज्यांचे ज्यांचे तपासणी अहवाल हे निगेटिव्ह आले, त्यांना सगळ्यांना पुढचे 14 दिवसांसाठी संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

पातूरमधील 13 जणांचे नमुने नागपूरला रवाना
वाशीम जिल्ह्यात एक व्यक्ती कोरोना संसर्ग बाधीत झाल्याचा पॉझिटीव्ह अहवाल आल्याचे स्पष्ट होताच या रुग्णाच्या संपर्कात अकोला जिल्ह्यातील पातूर व खेट्री येथील 13 जण आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. ही माहिती प्राप्त होताच त्या सर्व जणांशी संपर्क करून सायंकाळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या सर्व 13 जणांच्या कुटुंबियांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर या 13 जणांचे स्वॅब नमुने नागपूरकडे पाठविण्यात आले आहेत.