
दारू पिण्याचे ज्यांना व्यसन आहे, अशा रुग्णांनी दारू पिण्याचे दुष्परिणाम जाणून जिल्ह्यात दारूबंदी कायम राहावी, अशी मागणी केली आहे. व्यसनमुक्त समाजासाठी दारूबंदी गरजेची असल्याचे मत व्यक्त करीत जिल्ह्यातील दारूबंदी उठवू नका,
गडचिरोली : जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. तर दुसरीकडे जिल्हाभरातील गाव दारूबंदी कायम राहावी, यासाठी ठराव घेत आहेत. या सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील 690 व्यसनी रुग्णांनी जिल्ह्यात दारूबंदी हवीच, असे आवाहन शासनाला केले आहे.
दारू पिण्याचे ज्यांना व्यसन आहे, अशा रुग्णांनी दारू पिण्याचे दुष्परिणाम जाणून जिल्ह्यात दारूबंदी कायम राहावी, अशी मागणी केली आहे. व्यसनमुक्त समाजासाठी दारूबंदी गरजेची असल्याचे मत व्यक्त करीत जिल्ह्यातील दारूबंदी उठवू नका, अशी मागणी रुग्णांनी शासनाला केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात 1993 मध्ये दारूबंदी लागू झाली. जिल्ह्यातील जनतेला, महिलांना दारूबंदीचा प्रचंड फायदा झाला.
अधिक वाचा - आता धावत्या मेट्रोत साजरा करा समारंभ; अवघ्या तीन हजार रुपयांत होणार ‘ग्रॅन्ड सेलिब्रेशन
इतर जिल्ह्याच्या तुलनेत गडचिरोलीत व्यसनाधीनतेचे प्रमाण देखील कमी आहे. ही दारूबंदी जिल्ह्यासाठी लाभदायक ठरली असूनही दारूबंदी उठविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात सहजतेने दारू उपलब्ध झाल्यास दारूचे व्यसन लागेल व वाढेल. व्यसनींना व्यसनापासून दूर करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आवश्यकच आहे.
शासनाने कोणत्याही स्थितीत दारूबंदी न उठविता कायम ठेवावी. तसेच दारूबंदीची कडक अंमलबजावणी करावी. हीच माझी व माझ्या कुटुंबाची मागणी शासनाला आहे, असे मत दारूचे व्यसन सुटावे म्हणून व्यसनासाठी उपचार घेणाऱ्या 690 व्यसनी रुग्णांनी लिखित निवेदनातून सादर केले आहे.
केडमरावासींचे समर्थन...
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील केडमरावासींनी दारूबंदीला समर्थन दर्शविले आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक दारूबंदी कायम ठेवण्याची मागणी गावकऱ्यांनी पत्रातून केली आहे. जिल्ह्यात शासकीय दारूबंदीनंतर शेकडो गावांनी आपल्या गावात दारूबंदी लागू केली. त्यामुळे दारूचा वापर कमी झाला. गावातील स्त्रिया व लोक संघटित होऊन गावाची दारूबंदी करीत आहेत. दारूबंदीमुळे स्त्रियांचा व जनतेचा प्रचंड फायदा झाला आहे.
सविस्तर वाचा - व्हॉट्सॲपमुळे पसरली प्रेमसंबंधाची माहिती; बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या
दारूबंदीला आमचे समर्थन आहे. महाराष्ट्र शासनाने कोणत्याही स्थितीत गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी उठवू नये. उलट दारूमुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी अधिक प्रबळ कृती करावी. चंद्रपूर जिल्ह्यात 2015 पासून दारूबंदी लागू झाली. तेव्हापासून सीमेवरून गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू येणे थांबले आहे. म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी अजिबात उठवू नये. उलट तिथेदेखील गडचिरोलीसारखे दारूमुक्तीचे यशस्वी अभियान शासनाद्वारे सुरू करण्यात यावे. अशी मागणी केडमरावासींनी केली आहे
संपादन - अथर्व महांकाळ