esakal | साकोली विभागात 87 कोटींचे वीजबिल थकीत...लॉकडाउनमुळे थांबली वसुली
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गेल्या तीन महिन्यांपासून सर्वच क्षेत्रांत वीजबिलाची थकबाकी वाढत आहे. लॉकडाउनच्या काळात सरकारनेही वीजबिल भरण्यास ग्राहकांना मुभा दिली. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांच्या काळात साकोली उपविभागात थकीत वीजबिलाचा आकडा 87 कोटींवर पोहोचला आहे. वीज वितरण कंपनीच्या साकोली विभागात साकोली, लाखांदूर, लाखनी या तीन तालुक्‍यांचा समावेश आहे.

साकोली विभागात 87 कोटींचे वीजबिल थकीत...लॉकडाउनमुळे थांबली वसुली

sakal_logo
By
मनीषा काशिवार

साकोली (जि. भंडारा) : विजेचा वापर हा प्रत्येक वीजग्राहकांचा अधिकार आहे. परंतु, विजेच्या बिलाचा नियमित भरणा करणे, हेसुद्धा त्यांचे कर्तव्य आहे. तथापि, वापराच्या तुलनेत वीजबिलाचा प्रामाणिकपणे भरणा करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेकदा वीजवितरण कंपनीला सक्तीने वसुली करण्याची वेळ येते. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.

दरम्यान, लॉकडाउनच्या काळात सरकारनेही वीजबिल भरण्यास ग्राहकांना मुभा दिली. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांच्या काळात साकोली उपविभागात थकीत वीजबिलाचा आकडा 87 कोटींवर पोहोचला आहे.
वीज वितरण कंपनीच्या साकोली विभागात साकोली, लाखांदूर, लाखनी या तीन तालुक्‍यांचा समावेश आहे. 23 मार्चपासून संपूर्ण देशात कोरोना संक्रमणामुळे लॉकडाउन घोषित करण्यात आले. रोजगार, व्यापार व कामधंदे बंद असल्याने वीजग्राहक असलेले नागरिक आर्थिक संकटात सापडले. यावेळी सरकारनेसुद्धा वीजबिल भरण्यासाठी वीजग्राहकांना सवलत दिली. तसेच सक्तीने वीजबिल वसुली करू नये, असे आदेश दिले. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सर्वच क्षेत्रांत वीजबिलाची थकबाकी वाढत आहे.

ग्रामपंचायत, नगर परिषदेचे 2 कोटींचे वीजबिल थकले

मे 2020 पर्यंत साकोली विभागात थकबाकी 86 कोटी 90 लाख 75 हजार रुपये एवढी झाली आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर वीजभरणा केंद्रे बंद होती. यासाठी वितरण कंपनीने घरूनच ऑनलाइन वीजबिल भरण्याचे आवाहन केले होते. मात्र, मोजक्‍याच ग्राहकांनी बिल भरून प्रतिसाद दिला. घरगुती, कृषी, वाणिज्य क्षेत्रांतील ग्राहकांवर वीजबिल पेंडिंग असताना स्थानिक स्वराज्य संस्थांनीसुद्धा त्यात भर पाडली आहे. तालुक्‍यातील ग्रामपंचायती, नगर परिषद यांना दिवाबत्तीसाठी वीज आणि इतर उपक्रमासाठी वीजपुरवठा केला जातो. त्यांनीसुद्धा 2 कोटी 84 लाख 94 हजार रुपयांचे वीजबिल थकविले आहे.

थकबाकीचे आकडे वाढले

थकबाकीचे आकडे दिवसेंदिवस वाढतच असल्याने वीज वितरण कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे. मे 2020 च्याअखेरीस सर्व क्षेत्रातील ग्राहकांकडे असणाऱ्या थकबाकीची रक्कम 86 कोटी 90 लाख 75 हजार एवढी झाली. थकीत बिलाचा आकडा वाढत चालल्याने विद्युत वितरण कंपनीला आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे. वीजबिल माफ करण्याची मागणी होत असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिल माफ करणे शक्‍य नसल्याचे स्पष्ट केले आहे. ग्राहकांनी सुविधेनुसार महावितरणचे मोबाईल ऍप किंवा ग्राहकांना मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या एसएमएस सूचनेनुसार प्राप्त झालेल्या बिलाच्या रकमेनुसार महावितरणच्या अधिकृत वीज संकलन केंद्र किंवा ऑनलाइन सुविधेचा लाभ घेऊन बिल भरता येणार आहे.

जाणून घ्या : साकोली-लाखनीत पोलिसांचा रूटमार्च नेमका कशासाठी?

कृषी क्षेत्रातील आकडा अधिक

विविध क्षेत्रातील वीजवापरकर्त्यांवर थकबाकी असली; तर कृषी क्षेत्रातील ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीचा आकडा मोठा आहे. कृषिपंपासाठी वीज वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनी 78 कोटी 46 लाख 32 हजार रुपयांचे वीजबिल भरलेले नाही. घरगुती ग्राहकांवर तीन कोटी 47 लाख 32 हजार, वाणिज्यिक विभागात 39 लाख 36 हजार तर औद्योगिक विभागाची थकबाकी एक कोटी 25 लाख 22 हजार रुपये एवढी आहे. पाणी पंपासाठी दिलेल्या विजेची थकबाकी 34 लाख 47 हजार, कुक्कुटपालन क्षेत्रावर 1 लाख 26 हजार, सार्वजनिक सेवेसाठी देण्यात आलेल्या विजेची थकबाकी 11 लाख 33 हजार इतकी आहे.

हेही वाचा : भंडाऱ्यात क्षुल्लक कारणावरून झाला वादविवाद निघाल्या सळाखी आणि शेवटी...
 

ऑनलाइन वीजबिल भरा
ग्राहकांनी प्रत्यक्ष वीजबिलाची वाट न बघता, मोबाइलवर प्राप्त संदेशावरून महावितरणचे ऍप, अधिकृत वीज भरणा केंद्रावर वीजबिल वेळेवर भरून सहकार्य करावे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्राहकांना घरूनही ऑनलाइन वीजबिल भरणे सोयीचे आहे.
- स्मिता पारखी, कार्यकारी अभियंता, विद्युत महावितरण, विभाग साकोली.