चिमुकलीचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, 'माझे बाबा झिंगून घरात यावेत हे आदित्य दादांना रुचेल का?' 

टीम ई सकाळ 
Monday, 2 November 2020

चंद्रपूरमधील एका 8 वीच्या मुलीने दारुबंदीच्या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. 

चंद्रपूर : सध्या विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यांमध्ये दारुमुक्तीच्या लढ्याला व्यापक रुप आलं आहे. काही राजकीय नेत्यांनी या जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्यासाठी प्रयत्न सुरु केल्यानंतर येथील स्थानिक आदिवासी नागरिकांनी याविरोधात लढा पुकारला आहे. मात्र या लढ्यात आता लहान मुलंही मागे नाहीये. याचाच भाग म्हणून चंद्रपूरमधील एका 8 वीच्या मुलीने दारुबंदीच्या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. 

यात तिने 'माझे बाबा झिंगुन घरात यावेत हे आदित्य दादांना रुचेल का?' असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसेच या जिल्ह्यांमधील दारुबंदी न उठवता आहे ती दारुबंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - संशय अखेर ठरला खरा; कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या आकडेवारीतील घोळ सिद्ध

चिमुकलीचे परखड प्रश्न 

या 8 वीच्या मुलीने आपल्या पत्रात म्हटलं आहे, "माझे बाबा झिंगून घरात यावेत हे आदित्य दादांना रुचेल का? मद्यपी वाहनचालकाने निरपराध जनतेला चिरडून जावे किंवा माझ्या तेजस दादाच्या गाडीला धडक मारावी या विचारानेही अंग शहारते. आपण सर्व राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज आहोत आणि माँ जगदंबेची ओटी जनतेची कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या करातून आम्ही कशी काय भरणार?"

दारुबंदी उठवण्याचा आग्रह का? 

'माझे बांधव, माता भगिनी आनंदाने सुखाने नांदोत अशी मागणी आपणच आपले सर्वांचे दैवत पंढरीच्या विठोबांकडे करतो. मग दारुबंदी उठवावी हा आपल्या मंत्री महोदयांचा अनाठायी आग्रह का असावा?' असा सवालही या आदिवासी मुलीने केला आहे.

'आदिवासींनी अनवाणी पायांनी मुंबईला जाऊन दारुबंदी केलीय'

या आदिवासी विद्यार्थीनीने म्हटलं, "1993 मध्ये गडचिरोलीतील गावागावांमध्ये आदिवासी नागरिकांनी आपल्या परंपरेनुसार अनवाणी पायांनी मुंबईला जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शरद पवारांना दारुबंदीसाठी 6 वर्षे सुरु असलेल्या आंदोलनांची माहिती दिली आणि आपल्या भावना पोहचवल्या होत्या."

ही तर सरकारची जबाबदारी 

"आम्ही मुलांच्या चुका झाल्यास बाबा कान पिरगाळतात. शासनाने कायदे करणे आणि स्वनियंत्रण करणे या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कितीही समाजप्रबोधन केले तरीही कित्येक मद्यपी वाट चुकतात. अशांना समुपदेशनासह प्रसंगी कायद्याने योग्य वाट दाखविणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्यच आहे असे मी मानते," असंही या मुलीने आपल्या पत्रात नमूद केलं.

नक्की वाचा - कर्जबाजारी झाल्यामुळे युवकाने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी मैत्रिणीला बोलावले होते भेटायला

दारूबंदी उठवण्याचा कित्येकांचा प्रयत्न 

एकूणच काय तर गेल्या काही दिवसांपासून काही राजकीय नेत्यांचा आणि समाजातील काही व्यक्तींचा दारूबंदी उठवण्याचा प्रयत्न आहे असं दिसून येतंय. मात्र आदिवासी संगठना आणि शेकडो गावांचे ग्रामस्थ दारूबंदी कायम राहावी म्हणून निवेदन करत आहेत.  दारूबंदी उठवल्यामुळे किती नुकसान होणार आहे हे वारंवार सांगत आहेत.. आता या चिमुकलीच्या पत्रातून तरी दारूबंदी उठवू पाहणाऱ्यांचे डोळे उघडतात का हेच बघणं महत्वाचं असणार आहे.  

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8th standard girl wrote letter to udhhav thackeray asked tough questions