esakal | मलाही कलेक्टर व्हायचंय...
sakal

बोलून बातमी शोधा

8th standard student become a collector

माझं नाव पूनम प्रल्हाद देशमुख. जिल्हा परिषदेच्या पाडळी ता. बुलडाणा शाळेची इयत्ता 8 ब मधील विद्यार्थिनी.. आज माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा दिवस.. मला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेमुळे थेट जिल्हाधिकारी व्हायचा मान मिळाला.. मी आज दिवसभरात प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव घेणार आहे.. मलाही भविष्यात  कलेक्टरच व्हायचं आहे.. त्यासाठी अभ्यास करून कठोर परिश्रम घेण्याची माझी तयारी आहे.. ही प्रतिक्रिया आहे.. एका दिवसासाठी जिल्हाधिकारी बनलेल्या पूनम प्रल्हाद देशमुख यांची.

मलाही कलेक्टर व्हायचंय...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : माझं नाव पूनम प्रल्हाद देशमुख. जिल्हा परिषदेच्या पाडळी ता. बुलडाणा शाळेची इयत्ता 8 ब मधील विद्यार्थिनी.. आज माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा दिवस.. मला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेमुळे थेट जिल्हाधिकारी व्हायचा मान मिळाला.. मी आज दिवसभरात प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव घेणार आहे.. मलाही भविष्यात  कलेक्टरच व्हायचं आहे.. त्यासाठी अभ्यास करून कठोर परिश्रम घेण्याची माझी तयारी आहे.. ही प्रतिक्रिया आहे.. एका दिवसासाठी जिल्हाधिकारी बनलेल्या पूनम प्रल्हाद देशमुख यांची.


माझ्या मोठ्या बहिणीची जिल्हाधिकारी व्हायची इच्छा होती. मात्र कौटुंबिक परिस्थितीमुळे तिचे जिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. तिचे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. मला जिल्हाधिकारी होण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. सातत्यपूर्ण अभ्यास करून जिल्हाधिकारी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. मुलींनी चांगला अभ्यास करून आपली क्षमता सिद्ध करावी, असा मानसही पूनमने व्यक्त केला.  जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेतून आजपासून जिल्ह्यात 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने आंतरराष्ट्रीय महिला दिन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गुणवंत विद्यार्थिनीला जिल्हाधिकारी यांच्या खुर्चीत बसवून तिला प्रशासनाचा अनुभव देण्याचा उपक्रम आज राबविण्यात आला. तसेच महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी पिंक वुमेन सप्ताहही राबविण्यात येणार आहे. आज जिल्हा परिषदेच्या पाडळी येथील शाळेची विद्यार्थिनी पूनम देशमुख यांनी जिल्हाधिकारी बनून काम केले. पूनम देशमुख यांनी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व पिकांच्या नुकसानीसंदर्भात उपस्थित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांच्याकडून आढावा घेतला. त्यानंतर एक दिवसाच्या जिल्हाधिकारी पूनम देशमुख यांनी लोकशाही दिन कार्यवाहीचे कामकाज अनुभवले.  यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, भूषण अहिरे आदी उपस्थित होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक महिला दिनाच्या ’जनरेशन इक्वॅलिटी’ अर्थात ’माझी पिढी आहे समानतेची : जाणीव आहे मला स्त्री हक्काची’ या थीमनुसार हा महिला आरोग्य सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. तरी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या एक दिवसाकरीता जिल्हाधिकारी व महिला आरोग्य सप्ताह या उपक्रमांमुळे निश्‍चितच महिला सक्षमीकरणाला हातभार लागणार आहे.    

मुलींना प्रेरणा मिळण्यासाठी उपक्रम
आत्मविश्वास वाढावा, प्रशासनात येण्यासाठी मुलींना प्रेरणा मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी ’एक दिवसा साठी जिल्हाधिकारी’ हा उपक्रम राबविला आहे. हा उपक्रम इमरजन्स इन गव्हर्नन्स या संकल्पनेवर आधारित आहे.  या उपक्रमाबरोबरच पिंक वुमेन सप्ताह हा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.

सप्ताहनिमित्त कार्यक्रम
सप्ताहादरम्यान  प्राथमिक आरोग्य केंद्रांवर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. 3 मार्चला रक्तक्षय चाचणी शिबिर, 4 मार्चला गरोदर मातांची तपासणी करण्यासाठी मातृत्व संवर्धन दिन, 5 मार्चला महिलांमधील कर्करोगाची प्राथमिक तपासणी, 6 मार्चला वयोवृद्ध महिलांसाठी आरोग्य तपासणी, 7 मार्चला किशोरवयीन मुलींची मासिक पाळीतील स्वच्छता संवर्धन सभा, जागतिक महिला दिनी 8 मार्चला विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.