पूर्व विदर्भात तीन वर्षांत ९ हजार लोकांचा सर्पदंशानं मृत्यू, शासनाचे दुर्लक्ष

Snake
Snakee sakal

चंद्रपूर : पूर्व विदर्भात (east vidarbha) गेल्या तीन वर्षांत सर्पदंशाच्या नऊ हजार घटना घडल्या. यात मोठ्या संख्येने नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. सर्पदंशाच्या (snake bite death cases) घटना विशेषतः ग्रामीण भागात घडतात. यात शेतकरी, शेतमजूर हे मृत्युमुखी पडतात. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यातील वन क्षेत्रात व अतिदुर्गम भागात बाधित व्यक्तीला तातडीने उपचार मिळत नाहीत. अनेकदा अ‍ॅण्टी व्हेनम सिरम उपलब्ध नसल्याने तालुका रुग्णालयात जातपर्यंत रुग्णाचा मृत्यू होतो. कमावता व्यक्ती निघून गेल्यावर त्या पीडित कुटुंबावर आभाळ कोसळते. सरकारने तातडीने निर्णय घेऊन मदतीची घोषणा केली पाहिजे, अशी मागणी माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी केली आहे. (9 thousand people died due to snake bite in east vidarbha in last three years)

Snake
गोरेवाडा तलावात सोडले जातेय दूषित पाणी, अर्ध्या नागपूरला पाणीपुरवठा

वन्यजीव संरक्षण सुरक्षा कायदा सन 1972 मध्ये वन्य जीवाच्या यादीत 'साप' हा प्राणी वन्यजीव आहे. हा कायदा केंद्र सरकारचा असून संसदेने पारित केला आहे. महाराष्ट्रात वाघ या वन्य प्राण्यांनी मृत झालेल्या शेतकरी, शेतमजूर अथवा नागरिकाच्या कुटुंबास 14 लाख रुपये आर्थिक अनुदान देण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे. इतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास चार लाख रुपये अनुदान देण्याचा शासन निर्णय आहे. साप पकडल्यास अथवा मारल्यास दोन वर्षाची शिक्षा आहे. परंतु, साप चावून मरणाऱ्या ‍माणसाला कसलीही मदत मिळत नाही. देशात पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त मृत्यू सर्पदंशाने होतात. त्यातही पूर्व विदर्भात जास्त पाऊस पडतो. दाट जंगल आहे. मोठ्या प्रमाणावर जंगलाशेजारी शेती अतिक्रमण करून केली जाते, तर काही भागात वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती केली जाते. शेतकरी व शेतमजुरांना रात्री-अपरात्री शेतावर जावे लागते. शिवाय धानाच्या शेतात शेतकरी, शेतमजूर व नागरिकांचा सतत संपर्क येतो. शेतकरी शेतमजूर यांच्याबरोबर शेतकऱ्यांची संपत्ती असलेल्या पशुधनाचाही साप चावून मृत्यू होतो. महाराष्ट्रातही जास्तीत जास्त मृत्यू हे शेतकरी, शेतमजूर व पशुधनाचे होतात.

दुर्दैवाने विदर्भात आतापर्यंत पाच वनमंत्री झाले आहेत. आतापर्यंत छेदीलाल गुप्‍ता (गोंदिया), सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर), संजय राठोड (दिग्रस), दादासाहेब देवतळे (वरोरा), आबासाहेब पारवेकर (यवतमाळ) हे वनमंत्री होते. दुर्दैवाने हे विदर्भाचे सर्व मंत्री 1972 रोजी हा कायदा पारित झाल्यानंतर झाले. देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचे नेते पाच वर्ष मुख्यमंत्री होते. एवढा गंभीर प्रश्न असूनही वन्य प्राण्यांमुळे जीव गमावणाऱ्या शेतकरी, शेतमजूर व पशुधनासाठी साप चावून मरण्याच्या बाबतीत निर्णय झाला नाही. या गंभीर प्रश्नासाठी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शेतकरी संघटनेचे प्रमुख दशरथ बोबडे यांनी वणी येथे उपविभागीय कार्यालयापुढे साप चावून मरणाऱ्या माणसाच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळावी, म्हणून आमरण उपोषण केले होते. तेव्हा अॅड. वामनराव चटप यांनी हा विषय राज्य शासनाकडे नेला होता. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी समिती नेमली होती. त्यांनी इतर राज्यांमध्ये साप चावून मरणाऱ्या माणसाच्या कुटुंबास काय आर्थिक मदत दिली जाते, याची माहिती मागितली होती. शेतकरी संघटनेने अनेकदा या प्रश्नासाठी आंदोलनही केले होते. मात्र, मुख्यतः शेतकरी व शेतमजुरांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

साप चावून मरणाऱ्याच्या कुटुंबास इतर वन्य प्राण्यांप्रमाणे आर्थिक मदत द्यावी. महाविकास आघाडी सरकारने या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन साप चावून मरणाऱ्या व्यक्ती व पशुधनास इतर वन्य प्राण्यांप्रमाणे तात्काळ मदत जाहीर करावी. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात येणार आहे.
-अॅड. वामनराव चटप, माजी आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com