90 टक्के शेतकरी पीक कर्जापासून वंचित; लक्षांक 1140 कोटी कर्ज वितरणाचे, मात्र...

अनुप ताले
शनिवार, 23 मे 2020

दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, किडींचा हल्ला व शेतमालाला कमी भाव इत्यादी कारणांनी, गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्याला सातत्याने नुकसान सोसावे लागत आहे.
 

अकोला : खरीप दोन आठवड्यावर येऊन ठेपला आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. या खरिपासाठी जिल्ह्यातील बँकांना 1140 कोटी पीक कर्ज वितरणाचे लक्षांत निर्धारित करण्यात आले होते. मात्र आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ दहा टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात आले असून, अजूनही 90 टक्के शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत.

दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, किडींचा हल्ला व शेतमालाला कमी भाव इत्यादी कारणांनी, गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्याला सातत्याने नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे आधीच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यात भर म्हणजे गेला खरीप तसेच रब्बी हंगाम अतिवृष्टी व अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केला.

आवश्यक वाचा - अरे वा! गावाच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत

आता कोरोना संकटात शेतमाल घरातच पडून असल्याने शेतकऱ्याकडे खरीप पेरण्यासाठी सुद्धा पैसा उरलेला नाही. अशा स्थितीत बँकांकडून पीक कर्ज मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित होते. परंतु अजूनपर्यंत केवळ 14 हजार 569 शेतकऱ्यांना 152 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले असून, 90 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळविण्यासाठी बँकांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.

1200 कोटी वितरणाचे लक्षांक
जिल्हा बँका, ग्रामीण बँका, राष्ट्रीयकृत बँका व इतर कर्ज वितरण संबंधित 227 बँकांना जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना 1200 कोटी पीक कर्ज वितरणाचे लक्षांक देण्यात आले आहे. परंतु, आतापर्यंत केवळ 14 हजार 569 शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यात आले असून, एक लाख 35 हजार 431 शेतकऱ्यांना अजूनही कर्ज मिळण्याची प्रतीक्षा आहे.

13,389 शेतकरी खातेदारांना 141.60 कोटी
आतापर्यंत नवीन तसेच ज्यांनी जुन्या कर्जाचा परतफेड करून खाते रिन्यू केले आहे, अशा 13 हजार 389 शेतकरी खातेदारांना 141.60 कोटी रुपये पीक कर्ज वितरण बँकांकडून करण्यात आले आहे.

25,605 खात्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी
राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बँकांकडून एक लाख नऊ हजार 630 पात्र शेतकऱ्यांची कर्ज खाती अपलोड करण्यात आली होती. त्यांच्यापैकी केवळ 74 हजार 619 खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, अजूनही 25,605 खात्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 90 per cent farmers are deprived of crop loans in akola district