
चंद्रपूर - आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असणारे चित्रपट अभिनेते मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हे देखील चंद्रपूरच्या जमिनीत उभे राहत असलेल्या मिशन शक्तीने प्रभावित झाले आहेत. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीमध्ये आमिर खान यांनी या मिशन शक्तीमध्ये सहभागी होण्याचे मान्य केले आहे. देशभक्तीच्या या अफलातून प्रयोगासाठी आपले सर्व पाठबळ देण्याचे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले आहे. लवकरच यासंदर्भातील कार्यक्रमासाठी आमिर खान ताडोबानगरी चंद्रपूरमध्ये येणार आहेत.
गुणवत्ता भरलेल्या चंद्रपूर गडचिरोली या भागातील आदिवासी, मागास व अन्य सर्व समाजातील दुर्लक्षित विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा व कला प्रकारात देशपातळीवर धडक दिली आहे. मिशन शौर्यमध्ये तर एव्हरेस्ट सर करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. अगदी पहिल्याच प्रयत्नात आदिवासी आश्रम शाळेतील सतरा-अठरा वर्षाचे विद्यार्थी एव्हरेस्टवर चंद्रपूरचा झेंडा फडकवून आले आहेत. नुकतेच ब्रम्हपुरी येथील येरमे बंधू आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपसाठी अॅथेन्स येथे रवाना झाले आहेत. या प्रदेशात मोठ्या प्रमाणात सैन्यामध्ये, अर्धसैनिक दलात, पोलिसात काम करणारे नवजवान आहेत .या प्रदेशाचा देशसेवेसाठी काम केल्याचा आपला स्वतःचा इतिहास आहे. मंगळवारी सिने अभिनेते आमिर खान आणि अर्थमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांच्या झालेल्या भेटी दरम्यान ताडोबाच्या पराक्रमी वाघांपासून तर या भागातील वन्यजीव, वनसंपदा आणि खाणीचे साम्राज्याची माहिती ना. मुनगंटीवार यांनी त्यांना दिली. यावेळी त्यांनी चंद्रपूरच्या ऑपरेशन शौर्यमध्ये सहभागी झालेल्या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पराक्रमाची गाथा त्यांना सांगितली. सध्या आशियाई स्पर्धा जकार्तामध्ये सुरू आहे हा धागा पकडून त्यांनी आशियाई स्पर्धा, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे काही विशिष्ट क्रीडाप्रकारांमध्ये पदक वाढविण्याची क्षमता या भागातील विद्यार्थ्यांमध्ये असल्याचे सांगितले.
चंद्रपूरमध्ये येत्या डिसेंबर पर्यंत सर्व तालुक्यातील क्रीडा संकुले तयार होत आहे. बल्लारपूर येथे तयार होणाऱ्या विशेष क्रीडा संकुलामध्ये अशा प्रकारच्या क्रीडा प्रकाराला चालना देण्याची तयारी केली जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. आमीर खान यांना हा प्रयत्न भावला असून त्यांनी अशा पद्धतीने एखादया भागात लोकप्रतिनिधी विशेष प्रकल्पासाठी काम करीत असल्याचे ऐकून आनंद झाल्याचे स्पष्ट केले. या भेटी दरम्यान आमिर खान यांनी ताडोबा परिसरातील वन्यजीव, वनसंपदा जिल्ह्यातील विपुल खनिज संपत्ती आणि खान पर्यटनाला असलेला वाव याबाबतही जाणून घेतले. या परिसराचा इतिहास जाणून घेताना त्यांनी चंद्रपूरला भेट देण्याचे मान्य केले असून मिशन शक्तीला पाठबळ देण्याचे जाहीर केले.
मुनगंटीवार यांनी मिशन शक्तीमध्ये सहा क्रीडा प्रकारावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये वेटलिफीटींग, धर्नुविद्या, नेमबाजी, जलतरण, अॅथेलेटिक्स, व्हॉलीबाल व जिम्नॉस्टिक्स या खेळाचा सहभाग असेल. ६ खेळाची निवड केली असून यासाठी चंद्रपूर व गडचिरोली परिसरातील सर्व समाज घटकातील गुणवान, काटक, चपळ व उच्च शारीरिक क्षमता असणाऱ्या मुलांची कडक चाचणीद्वारे निवड केली जाणार आहे. या सर्व मुलांना आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि संबंधित क्रीडाप्रकारातील जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची सोय केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील उद्योग-व्यापार जगतातील नामवंत व्यक्तींकडून आर्थिक मदत घेतली जाणार आहे. 2018मध्ये या विषयक प्रशिक्षणाला सुरुवात होणार असून ना. मुनगंटीवार यांनी यासाठी 2024 च्या ऑलंपिक क्रीडा स्पर्धेचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुढील सहा वर्षात या ठिकाणी ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू निर्माण होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय समाजामधील सामाजिक पुरुषार्थ वाढविणाऱ्या चित्रपट निर्मितीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या आमिर खान यांनी अशा घटनाक्रमांची नोंद आपल्या चित्रपटांमध्ये घेतली आहे. चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार करीत असलेल्या या प्रयोगाबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 4250 गावे पाणीदार करण्यासाठी आमिर खान आणि श्रीमती किरण राव यांनी घेतलेल्या पुढाकाराचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले. पाणी समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या प्रक्रियेत हा पुढाकार मैलाचा दगड ठरणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. पाणी फाउंडेशन आणि ग्रीन महाराष्ट्र यांच्या माध्यमातून संयुक्तपणे मोहीम राबविण्यास हरित महाराष्ट्र ही संकल्पना साकार होण्यास मदत होईल असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.